तिसर्‍या आघाडीशी संबंध नाही- शरद पवार

वेबदुनिया

शुक्रवार, 3 एप्रिल 2009 (12:01 IST)
तिसर्‍या आघाडीतर्फे ओरीसात होणार्‍या मेळाव्याला जाणार अशी पुडी सोडून देत राजकीय तर्कवितर्कांना बळ देणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर आपण या मेळाव्याला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मात्र, मी फोनवरून या आघाडीच्या सभेत भाषण करेन असे त्यांनी सांगितले.

आमची आघाडी बीजू जनता दलाशी असून त्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण नक्की तिथे जाऊ. पण याचा अर्थ आमचा तिसर्‍या आघाडीशी काही संबंध आहे, असे नाही, असे सावध विधानही त्यांनी केले. 'कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस'च्या संबंधांत तिसरी आघाडी आल्याने 'दोघांत तिसरा आता सगळं विसरा' अशी कॉंग्रेसची स्थिती झाली आहे.

भुवनेश्वरला होणार्‍या या मेळाव्यात बीजू जनता दलासह डाव्या पक्षांचे काही नेतेही सामील होणार होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसशी ओरीसात बीजू जनता दलाची युती असल्याने या मेळाव्यात पवारही जाणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे पवार तिसर्‍या आघाडीशी लगट करून कॉंग्रेस व तिसरी आघाडी अशा दोन्ही आघाडींच्या डगरीवर पाय ठेवत असल्याचेही बोलले जात होते. मेळाव्याला जाणार नाही हे स्पष्ट करताना तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांशी संबंध 'गोड' रहातील याचीही पवारांनी काळजी घेतली.

या आघाडीच्या मेळाव्याला पवारांनी जाऊ नये असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी दिला होता. त्यावर चिदंबरम यांनी आपल्या मंत्रालयाचे काम करावे. राजकीय सल्ला देऊ नये, असा टोलाही पवारांनी त्यांना लगावला. त्याचवेळी डाव्यांचे आणि आमचे संबंध आजही चांगले आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही सरकार चालवले. फक्त काही मुद्यांवर आमचे मतभेद होते हे सांगताना आम्ही त्यांच्यावर नाराज नाही असे सांगून पवारांनी नव्या संबंधांविषयी तर्कवितर्क लढवायला जागा ठेवली आहे.

या निवडणुकीतही सत्ता कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीकडेच येईल व त्यात सर्व घटक पक्ष सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

वेबदुनिया वर वाचा