सोनियांची गोंदियात भाजपवर टीका

धर्मांध विष ओकणार्‍या जातीयवादी शक्ती आणि त्यांचे नेते यांना लोक ओळखून आहेत, अशा शब्दांत कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज भाजप नेते वरूण गांधी यांचे नाव न घेता टीका केली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार व नागरी वाहतूक मंत्री प्रफूल्ल पटेल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत सोनिया बोलत होत्या. सोनियांच्या या राज्यातील पहिल्या प्रचारसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही व्यासपीठावर होते. सोनियांनी यावेळी परंपरा मोडून कॉंग्रेसऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली.

धर्मांध शक्तींवर टीका करताना सोनियांनी कुणाचेच नाव घेतले नाही. पण त्यांचा रोख वरूण यांच्या दिशेनेच होता. धर्मांधता, जातीयवाद आणि प्रांतीयवाद करणारे पक्ष कोणते आहेत, याची देशाला कल्पना आहे. यांचेच नेते विद्वेषी वक्तव्य करतात आणि पकडलेल्या अतिरेक्यांना अफगाणिस्तानात पाहुण्यांसारखे घेऊन जातात, अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचेही सोनियांनी कौतुक केले. त्यांच्याकडे अनुभव आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता असल्यानेच कॉंग्रेस आघाडी पाच वर्षे स्थिर सरकार देऊ शकली याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

विदर्भात सोनियांनी घेतलेल्या सभेला मोठे महत्त्व आहे. विदर्भात गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसला नागपूर वगळता एकही जागा मिळू शकली नव्हती.

वेबदुनिया वर वाचा