लोकसभेच्या निवडणुका आता काही आठवड्यांवर आल्या असतांना 'द वीक' ने केलेल्या पाहणीत आगामी लोकसभेत कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळणार नाही. सर्वात जास्त 234 जागा संयुक्त पुरोगामी आघाडीला (संपुआ) मिळणार आहे. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 186 जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
कॉंग्रेस 144 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर भारतीय जनता पक्षाला 140 जागा मिळणार आहे. तिसरी आघाडी किंग मेकरची भूमिका बजविणार असून त्यांना 112 जागांवर विजय मिळणार आहे.
पंतप्रधान म्हणून भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांना सर्वात जास्त 15 टक्के मते मिळाली आहे. तर डॉ.मनमोहनसिंग यांना 14 टक्के मतदारांची पसंती आहे. 11 टक्के लोकांची पसंती सोनिया गांधींकडे तर 10 टक्के मतदारांची पसंती राहूल गांधी आहे. मायावतींना नऊ टक्के तर वाजपेयींना आठ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.
संपुआ आघाडीत कॉंग्रेस 144, समाजवादी पक्ष 32, राष्ट्रवादी कॉंग्रेस 13, डिएमके व सहयोगी पक्ष 13, तृणमूल कॉंग्रेस 11, राजद आणि लोकजनशक्ती पार्टी 15, युडीएफ दोन, नॅशनल कॉन्फरन्स तीन आणि झारखंड मुक्ती मोर्चास एक जागा मिळणार आहे.
भाजप नेतृत्वाखाली रालोओस 186 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यात भाजप 140, जनता दल (युनायटेड) 18, शिवसेना 12, आसाम गण परिषद पाच, अकाली दल पाच, आरएलडी चार आणि आयएनएलडीला दोन जागा मिळणार आहे.
तिसर्या आघाडीत डाव्या पक्षांना 33, बसपा 29, एआयएडीएमके आणि सहयोगी पक्ष 24, तेलगू देसम 14, बीजू जनता दल नऊ, जनता दल (संयुक्त) दोन, एचव्हीएम एक, चिरंजीवचा पक्षाला दोन तर इतरांना नऊ जागा दर्शविण्यात आल्या आहेत.
पाहणीनुसार 37 टक्के लोकांनी संपुआ चांगले सरकार देवू शकते, असे मत व्यक्त केले आहे. तर रालोओस 27 टक्के मते मिळाली आहेत. 14 टक्के लोकांची पसंती तिसर्या आघाडीला आहे.
21 टक्के लोकांनी जागतिक मंदीला महत्वाचा प्रश्न म्हटले आहे. तर 17 टक्के लोकांनी राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. 14 टक्के लोकांनी भ्रष्टाचारास प्राधान्य दिले आहे. महागाई रोखण्यात संपुआ सरकार अपयशी ठरल्याचे मत 32 टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. तसेच दशतवाद रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे मत 26 टक्के लोकांनी व्यक्त केले आहे.