'पेन्शनी'त निघालेले नेते निवडणुकीबाहेर

लोकसभा निवडणुकीच्या महाकुंभमेळ्यात अनेक दिग्गज उतरले असले तरी अनेक दिग्गजांनी मात्र याकडे पाठ फिरवली आहे. अनेक वर्षे संसद गाजविणार्‍या या दिग्गजांच्या कर्तृत्वाला वयाचा अडसरही लागला आणि त्यांनी या लोकशाहीतल्या मोठ्या उत्सवाचे 'प्रेक्षक' म्हणून भूमिका स्वीकारणे पसंत केले.

भाजपचे नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यंदा प्रथमच निवडणुकीत नाहीयेत. वाजपेयींची तब्बेत साथ देत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. तिकडे पश्चिम बंगालमध्ये लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी यांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने निलंबित केल्यानंतर त्यांनी आता निवडणूक न लढविण्याचा फैसला केलाय. पश्चिम बंगालचे तब्बल दोन दशके मुख्यमंत्री राहिलेल्या ज्योती बसूंही निवडणुकीच्या रिंगणाबाहेर आहेत. ज्योतिबाबूंची पंतप्रधानपदाची बस १९९६ मध्ये पक्षाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे चुकली होती.

माजी पंतप्रधान व्हि. पी. सिंह व चंद्रशेखर व कॉंग्रेसी नेते ए.बी.ए गनी खान चौधरी या तिन्ही दिवंगत नेत्यांची अनुपस्थिती या निवडणुकीत जाणवते आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. आर. बोम्मई व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्माही निधन पावल्यामुळे या निवडणुकीत नाहीत.

याशिवाय नारायणदत्त तिवारी, बलराम जाखड, शिवचरण मातूर, नवल किशोर शर्मा, सय्यद सिब्ते रजी, रामेश्वर ठाकूर, आर. एल. भाटीया, एस. सी. जमीर व प्रभा राव या ज्येष्ठ कॉंग्रेस नेत्यांना कॉंग्रेसने पेन्शनीत काढून त्यांना राज्यपाल केले आहे. त्यामुळे हे नेतेही आता लोकसभेत दिसण्याची शक्यता नाही.

वेबदुनिया वर वाचा