पवार नेमके कुणाबरोबर?

तिसर्‍या आघाडीशी 'गुप्तगू' करणारे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबरोबर आज गोंदियात सभा घेऊन आपण कॉंग्रेसच्याही जवळ असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी पवारांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतलेली नाही, असे स्पष्ट करत असताना, तिकडे मार्क्सवादी नेते प्रकाश करात यांनी पवार निवडणुकीनंतर तिसर्‍या आघाडीबरोबरच येतील, असा विश्वासही व्यक्त केला.

पवारांच्या या हालचालींनी भल्याभल्यांना गोंधळात टाकले आहे. पवार निवडणुकीनंतरही कॉंग्रेसबरोबर रहाणार की नाही, हा या घडीचा लाखमोलाचा प्रश्न आहे. त्याचे सकारात्मक उत्तर आज तरी मिळत नाहीये. ओरीसातील भुवनेश्वर येथे बुधवारी बिजू जनता दलाच्या नवीन पटनाईकांसह तिसर्‍या आघाडीच्या नेत्यांबरोबर एका व्यासपीठावर आलेल्या पवारांनी या नेत्यांशीही गुप्तगू सुरू केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्या पाठोपाठ आलेल्या मुलाखतीत त्यांनी निवडणुकीनंतर सगळे काही ठरेल, असे सांगत 'पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आपण अजूनही असल्याचे स्पष्ट केले.' तिकडे त्यांचे मार्क्सवादी साथी प्रकाश करात यांना पवार आपल्याबरोबरच येतील, असा ठाम विश्वास आहे. आणि गोंदियात राष्ट्रवादीच्याच उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या सोनिया गांधींना मात्र पवार निवडणुकीनंतरही आपल्याबरोबरच राहतील असा सध्या तरी विश्वास आहे. या सगळ्या गोंधळात्मक परिस्थितीनंतरही पवार कुणाबरोबर हे अजून स्पष्ट होऊ शकलेले नाही. पवारांनाही ते माहिती नसावे अशी चर्चा आहे.

वेबदुनिया वर वाचा