चला दिल्ली जिंकायला- उद्धव

वेबदुनिया

रविवार, 5 एप्रिल 2009 (21:34 IST)
विरोधक म्हणतात शिवसेना भाजपकडे स्टार प्रचारक नाही, आता त्यांचे कसे होणार, परंतु मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन रणांगणावर पडलो असल्याने आता कोणीही आम्हाला रोखू शकणार नसल्याचे सांगत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सेना भाजपच्या निवडणुक प्रचाराचा बिगुल वाजवला. आता चला दिल्ली जिंकायला असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

देश भवितव्य ठरवण्यात व्यस्त असताना पंतप्रधान मनमोहन सिंग पुन्हा एकदा बाबरी मशीद प्रकरण काढत असून, जर लालकृष्ण अडवाणी यांनी मशीद पाडली हेच त्यांचे कर्तृत्व असल्याचे कॉग्रेस म्हणत असेल तर कॉग्रेस आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करावे असे आवाहन उद्धव यांनी केले.

दहशतवाद, केंद्र सरकारची धोरणं, आणि कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर उद्धव यांनी आपल्या भाषणातून तोफ डागली.

कसाबला वकील देण्याची चर्चा सुरू आहे. मुंबई हल्ल्यात अनेक पोलिस अधिकारी शहीद झाल्यानंतरही सरकार खोटारडेपणा करत असून कसाब आणि अफजल गुरुला पहिले फाशी द्या अशी मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.

अफजल गुरुला वकील द्यायलाही शिवसेनेचा विरोध नव्हता आणि कसाबला ही वकील देण्यास विरोध नाही परंतु न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही त्याची सरकार अंमलबजावणी करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आज देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्षे लोटल्यानंतरही देशाच्या सीमा सुरक्षित नसल्याचे ते म्हणाले.

रक्ताने बरबटलेल्या हाताला मतदान करू नका असे पवार साहेब म्हणतात, तर मी त्यांना विचारतो गेल्या आठ वर्षात पावणेदोन लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर मग सांगा पवार साहेब या शेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? त्यांच्या पत्नीच्या कुंकुने माखलेल्या हाताला जनतेने मते द्यावीत का असा प्रश्नही उद्धव यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केला.

कशासाठी सेनेच्या अंगावर येता असा इशारा देतानाच, देश चालवण्यासाठी एकट्या मुंबईतून अर्धा महसूल दिला जातो, या मोबदल्यात मुंबईला काही मिळत नसल्याचे सांगताना महाराष्ट्राला विसरू नका असे आवाहनही त्यांनी लालकृष्ण अडवाणींना केले.

मुंबईकरांनी मर मर मरायचं आणि अर्थसंकल्पात आम्हाला काही मिळत नसल्याने आपण पंतप्रधान झाल्यानंतर मुंबईला न्याय देण्याची विनंती त्यांनी अडवाणींना केली.

देशात मजबूत सरकार आले नाही तर देशात यादवी माजेल असेही उद्धव म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा