लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज (19 एप्रिल) पार पडले. एकीकडे मतदानाचा पहिला टप्पा संपलेला असताना दुसरीकडे मात्र महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा वाद मिटलेला नाही. महायुतीतत नाशिक, पालघर, ठाणे, दक्षिण मुंबई या जागांवर अद्याप उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगराचाही समावेश आहे.
महाविकास आघाडीने याआधीच छत्रपती संभाजीनगरासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. या जागेवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खैरे यांना तिकीट मिळाल्यानंतर महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार, असे विचारले जात होते. शिवसेना-भाजप यांच्या युतीत हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे राहिलेला आहे.
यावेळी मात्र भाजपनेदेखील या जागेवर आपला दावा सांगितला होता. परिणामी या जागेवर महायुतीने उमेदवाराची घोषणा केली नव्हती. दरम्यान, आता संदिपान भुमरे यांच्या नावावर मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन शिवसैनिकांमघ्ये लढाई रंगणार आहे. 18 फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगरच्या उमेदवारीबाबत एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीतच संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. या निर्णयानंतर आता संदिपान भुमरे यांनीदेखील तयारी चालू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ते येत्या २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.