प्रेमाची धुंदी जेव्हा डोक्यात चढते, तेव्हा प्रेमवीर आपल्या प्रेयसींसाठी चंद्र तारे आकाशातून तोडून आणण्याचे वायदे करीत असलेले अनेकदा पाहायला ळितात. आपल्या प्रेमापुढे पैशाची काही किंमत न वाटणारे प्रेमवीर आपल्या प्रेयसीला भेटवस्तू देताना खिशाचा विचार करताना दिसत नाहीत. चीन देशातील अशाच एक प्रेमवीराने आपल्या प्रेयसीसाठी एक बहुमूल्य 'बुके' भेट म्हणून पाठविला. ह्या पठ्ठ्याने आपल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी असा काही कारनामा केला, की तो पाहणार्यांनी आणि त्याच्याबद्दल ऐकणार्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. ही घटना चीनमधील चोंगकिंग शहरातील असून, येथील एका आलिशान हॉटेलमध्ये एका व्यक्तीने आपल्या गर्लफ्रेंडला तिच्या वाढदिवसानिमित्त चक्क नोटांनी बनलेला भलामोठा बुके भेट दिला. ह्या बुकेचा आकार इतका मोठा आहे, की तो पाहून सर्वांचे डोळे आश्चर्याने विस्फारल्याशिवाय राहिले नाहीत. नोटांनी बनविल्या गेलेल्या ह्या बुकेमध्ये तब्बल पस्तीस लाख सत्तर हजार रुपये किमतीच्या नोटा आहेत. ह्या अनोख्या, बहुमूल्य बुकेने सगळीकडे धमाल उडवून दिली असून सर्वतोमुखी हाच विषय बोलला, ऐकला जात आहे. एकीकडे ह्या बुकेची चर्चा असताना दुसरीकडे पीपल्स बँकेच्या प्रतिनिधीने, ह्या व्यक्तीने मुद्रांकाचे नुकसान केले असल्याचे म्हटले असून त्याचे हे कृत्य बेकायदेशीर म्हटले आहे.