सामन्यातून योगी आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल

शनिवार, 24 नोव्हेंबर 2018 (09:37 IST)
राम मंदिर प्रश्नावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे. सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. ''सत्तेसाठी असंख्य वाल्यांना तुम्ही पवित्र केले, पण ज्या रामाने तुम्हाला राजकीय वैभव दिले तो राम वनवासातच आहे. महाभारत फक्त पाच गावांसाठी झाले, पण अयोध्येतील ‘महाभारत’हे एका राममंदिरासाठी सुरू आहे'', अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
सामना संपादकीयमधल ठळक मुद्दे 
-  राममंदिराची उशी करून जे झोपले होते त्यांचे डोळे उघडण्याचे काम शिवसेनेने नक्कीच केले आहे.  
- ‘‘जीवनात ‘राम’ उरला नाही’’असे जेव्हा म्हणतो तेव्हा हिंदू जनमानसातील ‘राम’किती महत्त्वाचा हे समजून घेतले पाहिजे. प्रचंड लढ्यानंतरही राममंदिर अद्याप उभे राहिलेले नाही ते झोपून राहिलेल्या कुंभकर्णांमुळे. राममंदिर उभारणीसाठी आम्हालाही झोपलेल्या कुंभकर्णांना जागे करायचे आहे. 
- निवडणुका आल्या आहेत म्हणून जागे होऊ नका. राममंदिर उभारणीसाठी जागे व्हा! प्रत्येक हिंदूची आता एकच गर्जना आहे, ‘‘आधी मंदिर, मग सरकार!’’
- तेव्हा झोपलेल्या कुंभकर्णांनो उठा, आता उठला नाहीत तर कायमचे झोपून जाल. 
- निवडणुका आल्या की, राम आठवतो. मग अयोध्येत राममंदिर  का बांधत नाही? हा सरळ प्रश्न आहे. ‘‘राम की रोटी?’’असा प्रश्न विचारला जातो. रोटी महत्त्वाची आहेच, पण रामाच्या नावाने सत्ता मिळवली ती ‘रोटी’देण्यासाठी. 
- प्रत्येक निवडणुकीत राममंदिराचे वचन दिले गेले; पण राममंदिरवाल्यांची सत्ता केंद्रात आणि उत्तर प्रदेशात येऊनही राममंदिर काही निर्माण झाले नाही आणि प्रभू रामचंद्र त्यांच्या अयोध्येतच वनवासी बनले. हाच सगळ्यात मोठा विश्वासघात आहे. 
- रामभक्त म्हणून जे सत्तेवर आले त्यांचा कुंभकर्ण झाला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती