सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, ते अंदमानचं सेल्युलर जेल सध्या कसं आहे?

शुक्रवार, 28 मे 2021 (19:42 IST)
तेजाली शहासने
24 डिसेंबर. 1910 या दिवशी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
 
जूनमध्ये सावरकरांची रवानगी अंदमानला झाली, जिथे त्यांना 50 वर्षं काढायची होती. अंदमानच्या तुरुंगाबद्दल अनेक गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या, पण ज्यावेळी सावरकर तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी अंदमानवर काही ओळी सुचल्या :
 
मुहिब्बाने वतन होंगे हजारो बेवतन पहिले
 
फलेगा हिंद पीछे और भरेंगा अंदमन पहिले
 
अर्थात, या देशावर प्रेम करणारे खूप होतील पण आधी हजारोंना निर्वासित व्हावं लागेल. आपल्या भारताच्या भरभराटाची स्वप्न पूर्ण होईल पण त्यासाठी प्रथम अंदमान भरेल.
अंदमान आणि निकोबार या बेटसमूहाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरमध्ये सेल्यूलर जेल आहे. इथेच 50 वर्षं कारावासाची सावरकरांना शिक्षा सुनावण्यात आली होती, आणि इथेच त्यांनी अनेक यातनाही सोसाव्या लागल्या होत्या.
 
पण काळ्या पाण्याची शिक्षा हा भयावह प्रकार आज इथे नाही. मात्र ते जेल आजही शाबूत आहे. तेव्हाचं अंदमान थरकाप उडवणारं होतं. आजचं अंदमान कसं आहे?
आज अंदमान एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बनलं आहे. चेन्नईहून टेकऑफ करून पोर्ट ब्लेअरला आलं की विमानातून उतरताना समोरच लष्कराची अवाढव्य विमान आपलं स्वागत करतात.
 
नंतर जसंजसं आपण पुढे जातो, तसं आपण अंदमानच्या प्रेमात पडू लागतो. निळाशार समुद्र, स्वच्छ सागरीकिनारे, विपुल वनसंपदा, असा खजिना निसर्गाने भरभरून इथे ओतला आहे .
पण या सगळ्याची झिंग उतरते सेल्युलर जेलमध्ये आल्यावर. हल्ली या जेलचं सगळ्यांचंच पहिलं दर्शन संध्याकाळीच होत, कारण 5-6 च्या दरम्यान इथे लाईट अँड साऊंड शो असतो.
लोखंडी जाळीच्या दरवाज्यातून आपण अनेक बुरूज असलेल्या या किल्लावजा वास्तूमध्ये शिरतो. साधारणत: 20 पावलं पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक पिंपळाचं झाड आहे. या पिंपळाला इथलं 'कालपुरुष' मानलं जातं.
 
डाव्या बाजूला, काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या वीर सावरकरांचं स्मारक आहे, आणि एक तेवत राहणारी अमर ज्योत आहे. हे सर्व 10-15 पावलात आपण पार करतो आणि समोर दिसतं ते सेल्युलर जेल.
खरं तर, इतर अनेक वास्तूंप्रमाणे हे जेलही ब्रिटिशांच्या स्थापत्यकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. स्वातंत्र्याचा लढा लढणाऱ्या, भारतीय कैद्यांच्या रक्ता-मांसातून बांधलेलं हे काळ्या दगडाचं एक अजस्त्र तुरुंग आहे.
 
मध्यभागी एक मनोरा, त्यातून निघणाऱ्या सात शाखा, अशी याची आखणी आहे. प्रत्येक शाखेला तीन मजले आणि प्रत्येक मजल्यावर एकवीस कोठड्या. म्हणजे एका भागातून दुसऱ्या भागात जायचं तर मधला मनोरा पार करूनच जावं लागणार.
प्रत्येक कोठडीची रचना अशी की खिडकीतून उजेड येईल पण बाहेरचा सूर्य दिसणार नाही. प्रात:विधी आटोपण्यासाठी कोठडीत एक भांडं ठेवलेलं. कोठडीची कडी भिंतीत जवळजवळ फुटभर आत गेलेली.
आणि प्रत्येक शाखा एकमेकीला पाठमोरी असल्यानं दुसऱ्या भागातल्या कैद्यांशी संपर्क शक्यच नव्हता. म्हणूनच तर आपले बंधू बाबाराव सावरकर दोन वर्षं अंदमानात असूनही स्वातंत्र्यवीर सावरकरांना, हे कळलं नव्हतं.
आत गेलं की आजूबाजूला छान हिरवळ आहे, सुंदर बागा फुलवण्यात आल्या आहेत. पण त्या काळी तिथे फक्त कोलूची कर कर, बारी साहेबाच्या आसुडाचे आणि कैद्यांच्या किंकाळ्याचे आवाजच होता.
 
"बारीसाहेब" म्हणजे डेव्हिड बारी, जे तेव्हा सेल्युलर जेलचे जेलर होते. आयरिश मूळच्या बारींचा धाक असा होता की त्यांना 'लॉर्ड ऑफ पोर्ट ब्लेअर' म्हटलं जात असे.
 
दुसऱ्या मजल्यावर सर्वांत टोकाला आहे तात्यारावांची कोठडी. त्या व्हरांड्यातून चालत जाताना शाळेतल्या धड्यांमधून, "जयोस्तुते" गाण्यातून मनावर ठसलेले सावरकर आठवतात.
त्या कोठडीजवळ पोहोचल्यावर, तिथून बाहेर नजर जाते ती थेट फाशी गृहावर. इंग्रजांनी मुद्दामहून सावरकरांना ही कोठडी दिली होती. 'रोज समोर फाशी जाणारे कैदी पाहून त्यांचं मनोधैर्य खच्ची होईल,' असं बारी साहेबांना वाटलं असावं.
नंतर मागे फिरून त्या मनोऱ्याचा जिना चढून आपण गच्चीवर येतो. या गच्चीवर आलं की तुम्हाला जे काही दिसतं त्याने तुम्ही फक्त आणि फक्त स्तिमित होता. कारण इथून तुमच्यासमोर अथांग पसरलेला निळाशार समुद्र उभा राहतो. त्याच्या अथांगतेला कोंदण देणारी हिरवीगार वृक्षराजी आणि सोबत असतो धुंद वाहणारा समुद्री वारा.
 
जेलच्या चार भिंतीतलं अत्यंत प्रतिकूल वातावरण, हाल अपेष्टा आणि अतिशय नाजूक तब्येत असतानाही याच काळकोठडीत सावरकरांनी 'कमला' सारखं अतिसुंदर महाकाव्य लिहिलं.
पुढे या महाकाय सेल्युलर जेलच्या अजस्त्र, थंडगार, काळ्या भिंती डोळ्यात साठवत आपण खाली उतरतो. तिथला कोलू, आसुडाचे फटके देण्याची जागा, फाशी गृह पाहताना खूप अंतर्मुख व्हायला होतं.
 
इथला प्रत्येक दगड एका फार मोठ्या स्थित्यंतराचा मूक साक्षीदार आहे.
सावरकर हे केवळ क्रांतिकारकच नव्हते तर ते साहित्यिकही होते. अंदमानमध्ये त्यांना कागद आणि पेन उपलब्ध नव्हतं. त्यावेळी त्यांनी जेलमधल्या भिंतींवर काट्यानं काव्य लिहिलं होतं.
आपल्या इतिहासाचं एक अबोल साक्षीदार राहिलेलं, असं आहे हे सेल्युलर जेल.
 
अंदमानच्या टूरदरम्यान कित्येक स्वच्छ किनारे, अथांग निळा समुद्र आणि हा भारावून नेणारा इतिहासाचा साक्षीदार आपण पाहतोच. या जेलच्या गच्चीवरून दिसणाऱ्या समुद्राच्या सौंदर्याने हरखून जातो, हरवून जातो. तिथला तो लाईट अँड साऊंड शो बघून भारावून जातो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती