लोकसभेचे निकाल लागले तेव्हा राज ठाकरे ह्यांनी दुपारी "अनाकलनीय" अशी ट्विट केली होती. त्यांच्या दृष्टीकोनातून ही घटना अनाकलनीय अशीच होती. पण सर्वसामान्य जनतेसाठी मात्र ही स्वाभाविक गोष्ट होती. या घटनेची आठवण होण्याचं कारण म्हणजे आज पहाटे खरोखरच अनाकलनीय घटना घडलेली आहे. सगळे गाढ झोपेत असतानाच देवेंद्र फडणव्विस ह्यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजितदादा पवार ह्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. लोक सकाळी उठले तेव्हा त्यांना कळलं की राष्ट्रपती राजवट संपली असून राज्याला मुख्यमंत्री लाभलेला आहे. मी पुन्हा येईन असं म्हणालेले देवेंद्र फडणविस पुन्हा आलेले आहेत. अर्थात अजून फ्लोअर टेस्ट बाकी आहे.
या सर्व घडामोडी घडण्याआधी श्रीयुत संजय राऊत फ्रंटला होते. युती तुटली याचे शिलेदार संजय राऊत आहेत. राष्ट्रवादी, कॉंग्रेस ह्यांच्यासोबत जी आघाडी झाली त्याचे शिलेदार संजय राऊत आहेत आणि जर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसला असता तर मुख्यमंत्रीपदाचे शिलेदारही संजय राऊतच होणार होते, जरी ते मुख्यमंत्री झाले असते किंवा नसते. पण सेनेचा मुख्यमंत्री होण्यामागे संजय राऊत ह्यांच्याच हात असता. बाळासाहेब आणि शरद पवार कधी एकत्र येऊ शकले नाहीत. पण संजय राऊतांनी हा चमत्कार करुन दाखवला होता. इतकंच काय तर त्यांनी कॉंग्रेसलाही एकत्र आणलं होतं. अर्थात शिवसेनेचा जन्मच मूळात कॉंग्रेसच्या गर्भातून झालेला आहे. पण पुलाखालून पुष्कळ पाणी वाहुन गेलंय. इतकी वर्षे शिवसेना हा कॉंग्रेससमोर विरोधी पक्ष म्हणूनच वावरत होती. पण संजय राऊतांनी या शत्रूला आपला मित्र बनलवलं. शत्रूचा शत्रू तो मित्र या तत्वाला धरुन त्यांनी आघाडी केली. अर्थात पाकीस्तानपेक्षा भाजप हा त्यांना मोठा शत्रू वाटतो. म्हणून जर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसला असता तर संजय राऊत ह्यांचे राजकीय वजन वाढले असते. शिवसैनिकांनी त्यांना चाणक्य म्हणून घोषितही केलं होतं. यावर शिक्कामोर्तब झाली असती. पण या चाणक्यांच्या डोक्यावर खरोखरचे चाणक्य बसले आहेत याचा सर्वांनाच विसर पडला. तुम्ही जर बारकाईने पाहिलं तर ज्या ज्या वेळी युती झालेली आहे तेव्हा संजय राऊतांना बाजूला ठेवण्यात आलं होतं. अर्थात संजय राऊत जे बोलत होते त्याला पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची संमती नसेल असे मुळीच नाही. बोल वह रहे है मगर शब्द पक्षप्रमुख के ही हैं. संजय राऊत जे बोलतात ते उद्धव ह्यांच्या मनात असतं इतकंच किंवा उद्धव ह्यांच्या मनातली गोष्टच राऊत बोलत असतात.
आता मात्र फडणविस आणि अजितदादा एकत्र आल्यामुळे उद्धव ह्यांच्या मुख्यमंत्रपदाला ग्रहण लागले आहे. उद्या जर मध्यावधी झाली तर शिवसेनेला आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार दाखवून बहुमताने जिंकता येणार नाही. मुळात शिवसेनेला कधीच बहुमत मिळालेलंही नाही. महाराष्ट्रातील जनतेने शरद पवार असो वा बाळासाहेब ठाकरे असो ह्यांना एकदिलाने स्वीकारले नाही. म्हणजेच बहुमताने त्यांना सत्ता दिलेली नाही. या दोन बड्या नेत्यांना जे करता आले नाही ते मोदी, शहा, फडणविसांच्या जमान्यात संजय राऊत करु शकतील असं शिवसेनेला वाटत होतं यातच सगळी कमाल आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे की अजून फ्लोअर टेस्ट बाकी आहे. त्यामुळे गेम अजून संपलेला नाही. पण अमित शहा आणि फडणविसांनी काहीतरी विचार नक्कीच केला असणार. मला काही शक्यता वाटतात त्या मी इथे मांडतो. आता अजितदादांना विधीमंडळ पक्षनेतेपदावर काढून टाकण्यात आले आहेत. मग आपण त्याच दृष्टीकोनातून विचार करुया. निवडणूकीचा निकाल २४ ऑक्टोबरला लागला. त्यानंतर ४ नोव्हेंबरला फडणविस दिल्लीत आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांना महायुतीचंच सरकार येणार असा विश्वास दिला. पण इतर वेळी फडणविस किंवा भाजपचे नेते गप्पच होते. वेट ऍंड वॉच हा त्यांच्या रणनितीचा एक भाग होता. योगायोग म्हणजे ज्या दिवशी फडणविस दिल्लीत होते, त्या दिवशी महाआघाडीच्या कामानिमित्त अजितदादाही दिल्लीत होते. तर भाजपचे सगळे नेते गप्प होते. मात्र संजय राऊत बेभानपणे बॅटिंग करत होते. क्षणाक्षणाला त्यांचे स्टेटमेंट्स येत होते. संजय राऊतांनी इथेच गडबड केली. राजकारणात प्रत्येक गोष्ट बोलून दाखवलीच पाहिजे असं नाही. पण राऊत सरांना मात्र स्टेटमेंट दिल्यावर वाघ झाल्यासारखं वाटतं. याला फार फार तर तोंडसुख म्हणता येईल.
आता घडलेल्या घटनेविषयी बोलूया. जर फडणविसांना अजितदादांसोबत सत्ता स्थापन करायची होती तर त्यांनी आधी का केली नाही. राष्ट्रवादीच फोडायची होती तर काही दिवस आधीही फोडता आली असती. आधी मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही बहुमत सिद्ध करु शकत नाही. मग शिवसेनेला निमंत्रण देण्यात आलं. शिवसेनेला दिलेल्या मुदतीत बहुमत सिद्ध करता आलं नाही. लोकांनी टिका केली की राज्यपालांनी सेनेला कमी वेळ दिला. पण युतीत तोडण्याचं पावित्र्य सेनेने घेतलं होतं आणि संजय राऊत खात्रीशीरपणे सांगत होते की मुख्यमंत्री सेनेचाच होणार. मग आधी बोलणी का केली नव्हती? बरं राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही ह्यांच्य बैठका संपत नव्हत्या. त्यामुळे सेनेला कमी वेळ मिळाला हा मुद्दा फोल ठरतो. फडणविसांनी आधी सत्ता स्थापनेचा दावा केला नाही याला दोन कारणं आहेत. एकतर त्यांना फ्लोअर टेस्टमध्ये बहुमत सिद्ध करण्यावर शंका होती आणि दुसरे कारण म्हणजे त्यांना शिवसेनेला जनतेसमोर उघडं पाडायचं होतं. कारण जनतेच्या समोर असं उदाहरण निर्माण झालंय की युती शिवसेनेने तोडली, युती तोडल्यावर फक्त राष्ट्रवादी नव्हे तर बाळासाहेबांनी ज्यांचा आयुष्यभर विरोध केला त्या गांधी परिवारासोबत आघाडी केली. कॉंग्रेस म्हणजेच गांधी परिवार. शिवसेनेचं इंदिराबाई, राजीवजी ह्यांच्याशी जुळत असलं तरी सोनियाबाईंशी जुळलेलं नव्हतं. त्यामुळे ते शिवसेनेचे राजकीय विरोधकच होय. आता महाशिवाआघाडीच्या ऐवजी महाविकासआघाडी अशी तडजोड शिवसेनेने केली. शिव या शब्दाचा बळी दिला. वरवर पाहता ही सामान्य घटना असली तरी जनतेत चुकीचा संदेश गेला. त्यात संजय राऊत सर्वधर्मसमभाववर प्रवचन देऊ लागले. पण राऊत सरांना एवढं कळलं नाही की या ढोंगी सर्वधर्मसमभाला कंटाळून जनता भाजपला जास्त मत देत आहे. मग अशाप्रकारे शिवसेनेची अब्रू वेशीवर टांगून, आता महाविकासआघाडीची सत्ता स्थापन होणार अशी मोहोर लागताच अचानक फडणविस आणि अजितदादांनी शपथविधी उरकून घेतला.
आता अजितदादांना विधिमंडळ पक्षनेतेपदावरुन जरी काढून टाकलं असलं तरी राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजितदादांच्या अध्यक्षतेखाली फडणविसांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे अजितदादांनी केलेलं व्हीप राष्ट्रवादीच्या आमदारांना बंधनकारक राहिल. जयंत पाटील आता विधिमंडळ पक्षनेत्याचं काम पाहणार आहेत. पण ३० नोव्हेंबरला सभापती बसेल त्याने जर अजितदादांनाच ग्राह्य मानलं तर? तर अजितदादांचं व्हीप इतर आमदारांना मान्य करावं लागेल. नाही मान्य केलं तर ते ग्राह्य धरलं जाणार नाही. जर आताच हरिभाऊ बागडे ह्यांना विधिमंडळ पक्षनेता बदललाय असं सांगितलं, पण हरिभाऊ निर्णय द्यायला उशीर करु शकतील आणि ३० नोव्हेंबरपर्यंत वाट पाहतील. ३० नोव्हेंबरला तसेही त्यांच्या हातात काही नसणार. त्यांच्या जागी जे कुणी येतील तेही भाजपच्या गटातलेच असतील याची खबरदारी फडणविसांनी १००% घेतली असणार. आता दुसरा विचार म्हणजे समजा फ्लोअर टेस्टमध्ये भाजप हरली तर काय होईल? राष्ट्रपती राजवट काढून टाकलेली आहे. राज्यपालांनी स्वतःची बाजू सेफ केलेली आहे. म्हणून भाजप जर फ्लोअर टेस्टमध्ये फेल झालीच तर मध्यावधी निवडणूका लागतील आणि निवडणूक लढलेले आमदार बिथरतील. कारण त्यांना पुन्हा खर्च करावा लागेल. यातून आमदार बंड पुकारतील. कदाचित पुन्हा निवडणूक होईल या भितीने ते फडणविसांना पाठिंबा देतील किंवा गैरहजर राहतील किंवा अजून काहीतरी होईल. पण आमदार पुन्हा निवडणूक नको असाच पवित्रा बाळगतील. जर मध्यावधी लागलीच तर त्याचे खापर आपोआप राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर फुटेल. आता तर अजितदादा फडणविसांच्या गटात आलेत. ते राष्ट्रवादी फोडतील, एकतर पक्ष ताब्यात घेतील किंवा दुसरा पक्ष स्थापून भाजपसोबत युती करतील. कदाचित त्या पक्षात शिवसेना व कॉंग्रेसचे काही नेते येऊ शकतील. त्यामुळे भाजपा फ्लोअर टेस्टमध्ये जिंकली काय किंवा हरली काय. महाविकासआघाडी स्थापन होणार नाही याची काळजी भाजपच्या चाणक्यांनी घेतलेली आहे. यात शिसेनेचा मुख्यमंत्री होणार असं सतत बडबडणारे संजय राऊत मात्र चेक मेट झाले आहेत. मी मागे एक पोस्ट केली होती की यावेली राजा नव्हे तर वजीर चेक मेट होतील. वजीर चेकमेट झालेला आहे आणि चेक मेट होताना या वजीराने शिवसेनेसाठी भलामोठा खड्डा खणून ठेवलेला आहे.