नागपूरमधील नारायण भाऊराव दाभाडकर असे या 85 वर्षांच्या यौद्धाचे नाव आहे. दाभाडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. त्यांची ऑक्सिजन लेव्हल 60 पर्यंत पोहोचली होती. मुलगी आणि जावयाने त्यांना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. खूप प्रयत्नानंतर त्यांना बेड मिळाला होता. त्याचवेळी एक महिला आपल्या 40 वर्षीय पतीसाठी बेड शोधत होती. मात्र बेडअभावी रुग्णालयाने त्यांना दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. बेड मिळत नसल्याने ती महिला रडत असल्याचे दाभाडकर यांनी पाहिले होते. रडणाऱ्या महिलेला पाहून दाभाडकरांनी त्यांना आपला बेड देण्याचा निर्णय घेतला.
बेड स्वेच्छेने सोडत असल्याचं पत्र
“मी 85 वर्षांचा झालोय, आयुष्याचा भरभरुन उपभोग घेतला, जर त्या महिलेच्या पतीचे निधन झाले, तर तिची मुलं अनाथ होतील. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे. मी माझा बेड स्वेच्छेने दुसऱ्या रुग्णासाठी सोडत आहे”, असे पत्र त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.