दुर्मीळ ट्युलिप फुलाची किंमत घरापेक्षाही अधिक

रविवार, 14 ऑक्टोबर 2018 (00:01 IST)
एड्रियन पॉज्‌ हे एक अतिशय बलशाली डच व्यक्तित्त्व होते. डच इस्ट इंडिया कंपनीचा निर्देशक असेलला एड्रियन एका संपूर्ण शहराचा मालक होता. तसेच फ्रेंच राज्यदरबारामध्ये एड्रियन राजदूत म्हणून पाठविला गेला होता. आजही एड्रियनचे नाव अजरामर आहे, पण ते त्याच्याकडे असलेल्या संपत्तीमुळे किंवा त्याच्या यशस्वी कारकिर्दीमुळे नव्हे, तर त्याच्या संग्रही असलेल्या एका दुर्मीळ ट्युलिप फुलामुळे. सतराव्या शतकामध्ये नेदरलंडस्‌ येथील वैभवसंपन्न लोकांकडे ट्युलिप फुलांच्या प्रजाती असत. किंबहुना ट्युलिप फुले बगिच्यामध्ये असणे, हे मानाचे आणि संपन्नतेचे प्रतीक समजले जात असे. त्यामुळे बहुतेक सर्व धनाढ्य लोकांप्रमाणेच एड्रियनच्या संग्रही देखील ट्युलिप होतेच. एड्रियनने आपल्या बगिच्यामध्ये एक तंबूवजा कनात उभारून त्यामध्ये शेकडो ट्युलिप फुलविले होते. या कनातीच्या आसपास आरसे लावलेले असल्याने या ट्युलिपचे प्रतिबिंबही अतिशय मोहक दिसत असे. शेकडो ट्युलिप संग्रही असणे, हे म्हणजे वैभवाचे प्रदर्शनच होते, कारण एड्रियनच्या बागेमध्ये फुललेल्या ट्युलिपच्या एका 'बल्ब'ची किंमत एखाद्या घराच्या किमती इतकी होती. एड्रियनच्या बगिच्यामध्ये अनेक जातीचे ट्युलिप उमलले होते, पण त्यातील एक ट्युलिप अतिशय खास आणि दुर्मीळ असा होता. 'सेम्पर ऑगस्टस्‌' जातीचा हा ट्युलिप केवळ एड्रियनच्या संग्रही होता. आता ट्युलिपची ही प्रजाती अस्तिवात नसल्याचे म्हटले जाते. या मागे मुख्य कारण हे, की ही ट्युलिप फुले केवळ एड्रियनच्या संग्रही असून, त्याने या फुलांचे बल्ब विकण्यास साफ नकार दिला होता, तसेच त्याच्या नंतर देखील या फुलांचे बल्ब इतरत्र विकले जाणार नाहीत अशी व्यवस्था त्याने करून ठेवली होती. म्हणूनच ट्युलिपची ही प्रजाती दुर्मीळ आणि मौल्यवान ठरली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती