भारतात कोणीही सुरक्षित नाही; गांगुलींच्या मुलीचे रोखठोक मत

गुरूवार, 19 डिसेंबर 2019 (16:11 IST)
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीमधील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर हिंसाचार भडकला. या हिंसाचारानंतर सोशल नेटवर्किंगवर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. या दरम्यान माजी क्रिकेटपटू आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची मुलगी सना गांगुली हिने चिंता व्यक्त करताना भारतात कोणीही सुरक्षित नाही, असे म्हटले आहे.
 
तिरस्कारावर आधारीत असलेली चळवळ ही केवळ लोकांच्या मनात भीती निर्माण करूनच जीवंत राहू शकते. आम्ही मुस्लीम किंवा ख्रिश्नचन नाही म्हणून स्वतःला सुरक्षित समजतात ते मूर्खांच्या जगात राहत आहेत.
 
भविष्यात असे प्रकार ज्या मुली तोकडे कपडे परिधान करतात, जे लोक मांसाहार करतात, मद्यपान करतात, परदेशी चित्रपट पाहतात, जय श्रीरामऐवजी हास्तांदोलन करून एकमेकांना भेटतात अशा लोकांच्या  विरोधातही घडू शकतात. भारतात कोणीही सुरक्षित नाही, अशा आशयाचा एक मेसेज सनाने आपल्या स्टेटसवर शेअर केला आहे. त्या खाली तिने हा मेसेज कोणत्या पुस्तकातील आहे, ते देखील लिहिले आहे.
 
दरम्यान, माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले होते की, राजकीय  आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत राहतील, पण 'जामिया मिलिया'च्या विद्यार्थ्यांबद्दल मी आणि माझा देश अधिक चिंतित आहे. समालोचक आकाश चोप्रा यानेही या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली. संपूर्ण देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये घडत असलेल्या भयावह प्रकाराचे व्हिडिओ पाहून खूपच चिंता वाटते. हे विद्यार्थी आपल्यातील एक आहेत. हे विद्यार्थी म्हणजे देशाचे भविष्य आहे. बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना गप्प केल्याने भारत कधीच महान होणार नाही. याउलट अशा प्रकारांनी हे विद्यार्थी देशाच्या विरोधात विचार करू लागतील, असे आकाश चोप्राने ट्विटमध्ये नमूद केले होते

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती