रशियात होणारे २०१८ फिफा वर्ल्ड कप सामने इसिसच्या निशाण्यावर असून फुटबॉल जगतातील स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि अर्जेन्टीनाचा कॅप्टन लियोनल मेसी यांचा शिरच्छेद करण्याची धमकी इसिसने दिली आहे. इसिसने लोन वुल्फ दहशतवाद्यांमार्फत हे कृत्य करणार असल्याचे सांगितले आहे. इसिसने यासंदर्भात एक फोटोशॉपद्वारे एडिट करण्यात आलेला फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये दहशतवाद्यांनी फुटबॉलच्याच मैदानात रोनाल्डो आणि मेसीला पकडून ठेवले आहे. हा फोटो शेअर करत इसिसने लिहिले आहे की, या दोघांच्या रक्ताने मैदान रंगून जाईल. इसिसकडून काही दिवसांपूर्वी आणखी एक पोस्टर शेअर करण्यात आले होते. त्यामध्ये मेसीच्या तुरुंगापलिकडे उभा असून त्याच्या डोळ्यातून रक्ताश्रू ओघळत असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यावर तुम्ही अशा राज्यासाठी लढत आहात. ज्याच्या शब्दकोशामध्ये अपयशाच नावच नाही, असेही लिहिले आहे.
रशियातील ११ शहरांमध्ये २०१८ फिफा वर्ल्ड कप सामने होणार आहेत. १४ जून २०१८ ला सुरू होणाऱ्या या स्पर्धेची सुरुवात रशिया विरुद्ध सौदी अरेबिया संघांमधील लढतीने होणार आहे. हा सामना मॉस्कोमधील लुजनिकी स्टेडियम मध्ये रंगणार आहे. इसिसने दिलेल्या धमकीमध्ये नावे घेतलेले खेळाडू हे फुटबॉल जगतातील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहेत. रशियातील रूसमध्ये रंगणारी ही स्पर्धा १४ जून ते १५ जुलैपर्यंत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये जगभरातून ३२ संघ सहभागी होणार आहेत.