पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नेहमीच मोठ्या संख्येने भेटवस्तू मिळत असतात. आता या भेटवस्तूंचा दुसऱ्यांदा लिलाव करण्यात येत आहे. लिलावात या भेटवस्तूंची किंमत २०० रुपयांपासून ते २ लाख ५० हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली आहे. गेल्या ६ महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचे ई-ऑक्शन करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधानांना दिलेल्या भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला होता.
या भेटवस्तूंची संख्या २ हजार ७७२ आहे. या भेटवस्तूंचे ई-ऑक्शन १४ सप्टेंबरपासून सुरु होणार असून ३ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांनी औपचारिक उद्घाटन केलं. ई-ऑक्शनमध्ये भेटवस्तूंवर अधिकाधिक बोली लावणाऱ्याला ती भेटवस्तू देण्यात येईल. भेटवस्तूंमधून मिळालेल्या पैशांचा उपयोग नमामि गंगे या प्रोजेक्टसाठी करण्यात येणार आहे.