आता कावळे करणार साफसफाई!

शनिवार, 18 ऑगस्ट 2018 (00:25 IST)
फ्रान्समधील प्यू ड्यू फोयू या ऐतिहासिक पार्कमध्ये सध्या कावळ्यांना कचरा उचलण्याचं ट्रेनिंग दिलं जात आहे. आतापर्यंत सहा कावळ्यांनी ही कला उत्तमरीत्या अवगतही केली आहे. पार्कातील सिगारेटचे तुकडे आणि इतर कचरा हे कावळे सहजपणे वेचतात. पार्कातील व्यवस्थापकांसाठी हे काम थोडं कठीण होतं. निसर्गाच्या स्वच्छतेकडे जर माणसाने दुर्लक्ष केले व पर्यावरणाची देखभाल केली नाही, तरीदेखील पर्यावरण व निसर्ग आपली देखभाल स्वतः करू शकतो. हे यातून लोकांना दाखवून द्यायचे आहे, असे पार्काच्या व्यवस्थापकांनी सांगितले. या पार्कातील केअरटेकर निकोलस डिविलयर्स यांनी सांगितले की त्यांचे वडील फिलिप डिविलियर्स यांनी 1977 साली या पार्काची स्थापना केली होती. सुरुवातीच्या काळात या पार्काचे 600 सदस्य होते. आता या सदस्यांची संख्या वाढून 3650 झाली आहे. हा फ्रान्समधील सर्वात प्रसिद्ध पार्क आहे. निकोलस यांनी सांगितले, पार्कातील साफसफाईचे काम हे केवळ 'रुक' प्रजातीच्या कावळ्यांनाच शिकवले जात आहे. तसेच यात 'कॅरियन क्रो', 'जॅकडॉ' आणि 'रावेन' या प्रजातीच्या कावळ्यांचाही समावेश आहे. हे कावळे खूपच हुशार असतात. 
 
मानवी भाषा त्यांना कळते. हे कावळे माणसांशी मैत्रीही करतात. ऑस्ट्रेलियन मॅगपाइस हा कावळ्यासारखाच दिसणारा पक्षीदेखील खूप हुशार मानला जातो. 
 
या पक्षांनादेखील साफसफाईचे काम शिकवण्याचा सध्या विचार सुरू आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती