गोकुळाष्टमी म्हणजे कृष्णभक्तांना चालून आलेली पर्वणी! हिरवगार वनश्रीने नटलेल्या श्रवणात प्रभू श्रीकृष्ण जन्मले! मुखी श्रीकृष्णनाम, हाती श्रीकृष्णकाम, हृदयात श्रीकृष्णप्रेम जर असेल, तर श्रीकृष्णभक्तास जिवंतपणी सुख व मेल्यानंतर श्रीकृष्णधाम निश्चित मिळेल! गीतेचा आचार व बासरी होण्याचा विचार जर प्रत्येकाच्या मनात आला तर त्याला श्रीकृष्णदर्शन होण्यास विलंब लागणार नाही! अन्न, वस्त्र, निवारा, शरीर, आत्मा आणि या सर्वाची प्राप्ती व उपभोग घेण्याचे सामर्थ्य देणारा ‘परमात्मा’ या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. तो आत्मा-परमात्मा म्हणजेच स्वयं ‘श्रीकृष्ण’ आहेत!
डोळ्यात गीता, हृदयात श्रीकृष्णसत्ता, बोलण्यात श्रीकृष्णगाथा व मनात श्रीकृष्ण चिंता असेल तर तो माणूस जन्मदरिद्री असला तरी कुबेर झाल्याशिवाय राहणार नाही! कौरवांजवळ सत्ता होती परंतु श्रीकृष्ण नव्हते. त्यांनी श्रीकृष्णाला सोडले व शकुनीला धरले त्यामुळे त्यांचा नाश झाला! पांडवांजवळची सत्ता गेल्याने ते निर्धन व वनवासी झाले! दुर्योधनाने त्यांना मारण्याचा अखंड प्रत्न केला परंतु त्यांच्याजवळ श्रीकृष्ण होते. त्यामुळे ते लाक्षागृहासारख्या अनेक संकटातून वाचले. जिवंत राहिले व सम्राटपदाचा उपभोग घेऊन मोक्षाला गेले!
पाच हजार वर्षापूर्वी श्रवणमासाची संपन्नता होती परंतु वद्य अष्टमीची काळकभिन्न रात्रही होती! कंसाचे राज्य म्हणजे अन्यायाची अष्टमी होती. त्याच्या राज्यात अन्यायाचे ढग, शिक्षेची कडाडणारी वीज, दु:खाचा प्रचंड पाऊस असल्यामुळे सामान्य माणसाला फार त्रास सहन करावा लागत होता! त्याचवेळी भक्तिप्रेमाच्या हृदयरूपी कैदखान्यात भगवान श्रीविष्णूने कृष्णरूपात जन्म घेतला आणि सर्वाचे दु:ख हरण केले!
गोपांचा कुत्न्या, यशोदेचा लल्ला, गोपींचा कान्हा तर विश्वरक्षणकर्ता श्रीकृष्ण. कधीच स्वैराचारी तरुण व चिंताग्रस्त वृद्ध झाले नाहीत! त्यांनी नृत्य केले, गालिये, बासरीचे स्वर काढले व गीतेचे तत्त्वज्ञान विश्वाला सांगितले. ते मोकळेपणाने म्हणाले, ‘जन्म कर्म च मे दिव्यम्’।। गीता ‘माझा जन्म व कर्म सारेच अद्भुत आहे. मी सर्वात आहे परंतु कोणातही नाही किंवा कुणाच्या कर्मात वा प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही तर सर्वाना स्वातंत्र्य देतो. मला हाक मारणार्या द्रौपदीसाठी मी वस्त्र घेऊन धावत येतो तर मला न विचारता द्यूत खेळणार्या युधिष्ठिराचे दु:ख मी निवारण करण्याच्या भानगडीत पडत नाही. कारण ते कर्म त्यांनी केले. त्याचे प्रायश्चित्त त्यांनी भोगले पाहिजे.
अनन्भावाने शरण येणार्या भक्ताला मी कधीही उपवासी वा उपेक्षित ठेवत नाही. धर्माला ग्लानी आली, सज्जनांना त्रास होऊ लागला तर मी जन्म घेतो व सज्जनांचे रक्षण करून दुर्जनांचा वध करतो.
‘यदा यदा हि धर्मस्य, ग्लानिर्भवति भारत। अभुत्थानम्धमर्स्य तदात्मानम् सृजाम्हम्। परित्राणाय साधूनां विनाशायाच दुष्कृताम्। धर्म संस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ।।’ (गी. अ.4) असे ते म्हणतात.
अर्थात ही त्यांनी स्वत:ची आत्मस्तुती केलेली नाही. अशा या श्रीकृष्ण प्रभूचा जन्म मधुपघ्न, मधुरा, मथुरा, मधुवन अशा मधुर नावांनी प्रसिद्ध असलेल्या नगरीत कंसाच्या बंदीगृहात झाला. बलरामाचा जन्म श्रीकृष्णाच्या पूर्वी दोन दिवस श्रवण वद्य 6 या दिवशी दुपारी स्वाती नक्षत्रावर गोकुळात झाला म्हणून बलराम हे श्रीकृष्णाचे ज्येष्ठबंधू. श्रवण वद्य अष्टमीला, रोहिणी नक्षत्र, बुधवार, चंद्र वृषभ राशीला असताना रात्री बारा वाजता भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्याने दुष्टांचा संहार करून, निस्तेज झालेल्या भरतभूमीला पुन्हा तेज:पुंज केले. अशा परम परमात्मच्या लीला आजही आपण कीर्तनातून ऐकत आहोत. श्रीकृष्ण जन्माचे कीर्तन आपल्याला परमसुख देऊन जाते.