कृष्ण-जीवनाचा सकारात्मक संदेश

WD
यदा- यदा ही धर्मस्य अर्थात जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करून धर्माची पुन:स्थापना करण्यासाठी मी पुन्हा-पुन्हा अवतार घेईन आणि दुष्टांचा संहार आणि सज्जनांचे रक्षण करीन असा जीवन संदेश देणारा, आश्वासन देणारा युगपुरुष श्रीकृष्ण होता. जगाला भक्ती मार्गापेक्षा कर्म मार्गाकडे प्रेरित करणारा अवतार म्हणजे कृष्ण अवतार. देवाच्या प्रत्येक अवताराची विशेषता आणि कार्य वेगवेगळे आहे. त्याचे स्वरूप वेगळे आहे.

विष्णूचे दश-अवतार अन त्याची भूमिका वेगवेगळी आहे. माझ्या मते कृष्ण जीवन एक परिपूर्ण जीवन आहे त्याच्या जीवनाचा प्रत्येक पैलू जीवनातील कर्तव्याशी जोडलेला आहे. एका संसारी व्यक्तीचे चिंतन कसे असावे. जीवन दर्शन कसे असावे हे आत्म दर्शन कृष्ण-चरित्र दर्शवते.

कृष्ण जन्म लहानांसाठी गोपाळ काल्याचा प्रसाद आहे तर वद्धांना भक्ती आणि मुक्तीचा मार्ग प्रशस्त करणारा, सुगम करणारा आहे. परंतु, जीवनाचा मधला टप्पा अतिशय महत्त्वपूर्ण असतो. उषा:कालाची लालिमा घेऊन जीवन प्रकाशमान व्हायचे असते. आपल्या यश किरणांनी, तेजाने दाही दिशा प्रकाशवान, स्फूर्तीवान करण्याचा काळ म्हणजे तारुण्य.

आजपर्यंत आपण गोपाल काला भरभरून खाल्ला, जागरण केलं, खूप लोणी खाल्लं. परंतु, जीवनाचा हा टप्पा वेगळा आहे. ज्या भूमीत आपण जन्म घेतला, तिथला धर्म, नीती आणि त्यामधून मिळणारा संदेश गाठी बांधून आपलं तारुण्य चमकावणे गरजेचे असते. जीवनाचा हा पाया जेवढा अधिक मजबूत असेल. तेवढाच भक्कम आधार जीवनाला देता येईल.

आजची तरुण पिढी निराशेची शिकार आहे. बदलत्या परिस्थितीत सकारात्मक विचार, आत्मचिंतन, ह्या गोष्टींचा अभाव झाला आहे. म्हणूनच जीवनात येणारा प्रत्येक प्रश्न त्यांना भंडावून सोडतो. त्यातून मार्ग काढणे त्यांच्या दृष्टीने अशक्य वाटते. आत्मबळ कमी असल्याने एका अनामिक भीतीच्या आधीन असतात, अशा वेळी पौराणिक कथा त्यांना आधार देतात.

समाधानाचा मोठा गुरू मंत्र आहे. जेव्हा आपण आपले कर्तव्य पूर्ण करतो, त्यावेळी मिळणारे आत्मिक समाधान यशस्वी जीवनाची गुरूकिल्ली आहे. हाच जीवन संदेश भगवान श्रीकृष्ण गीता या अलौकीक ग्रंथातून देतात. कृष्ण हे संसारी पुरुष होते. ते कधी तपश्चर्या करायला गेले नाही, की एकांतवासात बसले नाही. जिथे जेव्हा त्यांची आवश्यकता होती तेव्हा ते सदैव तत्पर अन हजर असत. जीवनाच्या प्रत्येक नात्याशी कस समरस व्हावं हे कृष्ण चरित्र सांगतं.

बालपणात माता यशोदेला भरपूर मातृत्व सुख दिले, मित्रांना लहान-मोठं, गरीब-श्रीमंत हा भेद न ठेवता मैत्रीय भरपूर सुख दिले. ज्या गावात आपण राहतो तिथे संकट येताच गोवर्धन पर्वत उचलला. कालिया मर्दन करून यमुना नदीचं जल निर्मळ केलं. दूध-दही खाऊन आपलं गोधन सुखी ठेवावं हा संदेश दिला. तरुणपणात राधाशी निष्काम मैत्री आणि अद्वितीय प्रेमाचं उदाहरण जगासमोर ठेवलं. आपले भाऊ पांडव ह्यांना संकटकाळी मदत करून आपल्या अधिकाराची जाणीव करून दिली. आपला अधिकार कसा प्राप्त करावा याचं उदाहरण जगासमोर ठेवलं. ह्या जगात जगण्यासाठी फक्त प्रेमाची भाषा नाही साम- दाम-दंड भेद ही नीतीसुद्धा आवश्यक आहे आणि ते करण्यात काही चूक नाही हा जीवन संदेश देणारे अवतार म्हणजे कृष्ण.

आम्ही ठरवू तो कायदा' हा कृष्ण नीतीचा अर्थ नाही. आपला उद्देश्य, निर्मळ असेल, आपल्या भावना शुद्ध असतील तेव्हाच परमेश्वर मदत करतो. आधी दुसर्‍यांना मुक्त हस्ताने द्या तर खरी तेव्हाच परमेश्वर दुसरा तुमच्याबरोबर राहील. जीवन देण्यासाठी आहे फक्त घेण्यासाठी नाही. हाच संदेश कृष्णाकडून मिळतो.

म्हणूनच या जन्माष्टमीला आपण निश्चय करूया. आधी कर्तव्यपूर्ती करू अन मग अधिकारासाठी जागरूक राहू. कर्म, वचन, ध्यान यांच्याशी एकनिष्ठ राहू. मग ताणतणावर रहाणार नाही आणि निराशाही नाही. सकारात्मक विचार मनात असला आणि देवाच्या अस्तित्वावर, न्यायावर विश्वास असेल तर जीवन खरंच काही कठीण नाही. 'जो सुखावे स्वजनोस सुपुत्र तोयी' हे मनात धरून विश्वासाने प्रगतीची एक-एक पायरी चढू. हा गुरुमंत्री घेऊन आपल्या यशस्वी जीवनाची वाट धरू.

वेबदुनिया वर वाचा