ChatGPTच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा चेहरामोहरा बदलणारी व्यक्ती कोण आहे?

शनिवार, 11 फेब्रुवारी 2023 (20:28 IST)
सॅम ऑल्टमन- जगभरात चर्चा असलेल्या चॅटजीपीटीचे संस्थापक. त्यांची कहाणी सुरू होते 2015 पासून. सॅम यांनी तेव्हा त्यांच्या 'ओपन-एआय' कंपनीची स्थापना केली आणि नंतर वेळ आली चॅटजीपीटी सारख्या प्रचंड वेगवान व्हर्च्युअल रोबोटची.
पण, चॅटजीपीटीलाच त्याच्या संस्थापकांबद्दल म्हणजे सॅम ऑल्टमन बद्दल विचारलं तर? असा विचार केला आणि सॅम ऑल्टमन कोण आहेत? असा प्रश्न आम्ही चॅटजीपीटीला विचारला.
 
त्यावर, 30 नोव्हेंबरला लाँच करण्यात आलेल्या या एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) सर्च इंजीननं पुढील उत्तर दिलं. "सॅम ऑल्टमन एक अमेरिकन उद्योगपती आणि टेक्नॉलॉजिस्ट आहेत. ते आधी 'लूप्ट' नावाच्या कंपनीचे सीईओ होते आणि आता 'ओपन-एआय' चे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध आहेत."

त्याशिवाय सर्च इंजिननं सॅमबाबत असंही सांगितलं की, ते तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील एक प्रसिद्ध आणि प्रभावशाली व्यक्ती असून आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित मुद्द्यांवर व्याख्यानं देतात.
 
चॅटजीपीटीकडे अशी सर्व माहिती ही तथ्य किंवा त्यांच्या सरलीकरणावर आधारित असते. "एखादं पात्र किंवा व्यक्तीबाबत काहीही सब्जेक्टिव स्टेटमेंट किंवा मत इथं व्यक्त केलं जात नाही," असं वर्णन या तंत्रानं स्वतःबाबत केलं आहे.
 
चॅटजीपीटीच्या या रिस्पॉन्सनंतर आम्ही इतर माध्यमांतून सॅम ऑल्टमन यांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. कारण, त्यांच्यामुळं, त्यांचं संशोधन आणि नव्या तंत्रज्ञानासाठीच्या पुढाकारामुळं आपलं वर्तमान अत्यंत वेगानं बदलणारेय. चॅटजीपीटी आणि इमेज जेनेरेटर DALL-E हे काही असेच प्रयत्न आहेत.
 
सर्वात आधी 'नॉन-आर्टिफिशियल' गोष्टी
आम्हाला सॅम ऑल्टमन यांनी 'न्यूयॉर्क टाइम्स' ला दिलेली एक मुलाखत सापडली. त्यात त्यांनी सांगितलंय की, "ते जेव्हा आठ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी अॅपलच्या सुरुवातीच्या काळातील संगणकांपैकी एक असलेल्या 'मॅकिन्तोश' चे सगळे पार्ट उघडून वेगळे केले होते. त्यातून त्यांनी कम्प्युटर प्रोग्रिमिंगमध्ये रस घ्यायला सुरुवात केली."
 
"स्वतःचं कम्प्युटर असल्यानं ज्या विषयावर बोललं जात नाही अशा लैंगिकतेसारख्या विषयाची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळं किशोर वयात त्यांना वेगवेगळ्या समूहांमध्ये चर्चा करणं सोपं झालं होतं," असंदेखील सॅम यांनी या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं.
वयाच्या 16 व्या वर्षी आई वडिलांना त्यांनी गे असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी शाळेतही गे असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं होतं.
 
शाळेनंतर सॅम यांनी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील प्रसिद्ध स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. त्याठिकाणीदेखील त्यांचा विषय होता-कम्प्युटर सायन्स. पण ते याठिकाणी पदवी पूर्ण करू शकले नाहीत.
 
मित्रांच्या साथीनं त्यांनी एक अॅप तयार करण्याचा निर्णय घेतला. आपलं लोकेशन इतरांना पाठवता येईल असं अॅप त्यांना बनवायचं होतं. 'लूप्ट' (LOOPT)हे तसंच अॅप आहे. हीच मित्रांसह सॅम यांची पहिली अनोखी कल्पना होती.
 
आपण चर्चा करत आहोत 2005 मधली. व्हाट्सअॅप येण्याच्या अनेक वर्षांपूर्वीची ही बाब आहे. याचकाळात जगभरात फेसबुकचा प्रसार सुरू झाला होता.
 
त्यावेळी 'लूप्ट' ला फार महत्त्वं मिळालं नाही. पण यामुळं सॅम यांच्यासाठी एक उद्योगपती म्हणून करिअर सुरू करण्याचा आणि त्यात बड्या गुंतवणुकीचा मार्ग खुला झाला होता.
 
'लूप्ट' ला सर्वात आधी 'वाय कंबीनेटर' (वायसी) नं सहकार्य केलं होतं. ही त्या काळात 'स्टार्ट अप्स' मध्ये गुंतवणूक करणाऱ्या मोठ्या कंपन्यांपैकी एक होती. त्यांनी 'एअरबीएनबी' आणि 'ड्रॉपबॉक्स' सारख्या अॅप्समध्ये गुंतवणूक केली होती.
 
सॅम ऑल्टमन यांनी त्यांचा पहिला प्रोजेक्ट 4 कोटी डॉलरमध्ये विकला. त्या पैशाचा वापर सॅम यांनी त्यांची आवड असलेल्या गोष्टीकडे लक्ष वाढवण्यासाह इतर आयडियाजमध्ये गुंतवणुकीसाठीही केला. यापैकी बहुतांश गुंतवणूक 'वायसी'च्या कल्पनांमध्ये केली. 2014 ते 2019 पर्यंत त्याचे ते अध्यक्षही राहिले.
 
त्याचदरम्यान त्यांनी इलॉन मस्क यांच्यासह 'ओपन-एआय' ची स्थापना केली. त्याच कंपनीच्या माध्यमातून त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात पाऊल ठेवलं. याबाबत त्यांना प्रचंड उत्सुकता होती, मात्र अनेक प्रकारच्या भीतीदेखील होत्या.
 
एआयची मानवी बाजू
'ओपन-एआय' एक रिसर्च कंपनी आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स संपूर्ण मानवजातीसाठी फायदेशीर ठरावं आणि त्यामुळं काही नुकसान होणार नाही,' याची खात्री करणं हे कंपनीचं मिशन आहे.
कंपनीच्या या उद्देशामध्येच सॅम ऑल्टमन यांची संपूर्ण भीतीदेखील पाहायला मिळते. "आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानव जातीसाठी एक 'घातक शस्त्र' देखील ठरू शकते," असं त्यांनी त्यात म्हटलं होतं.
 
2016 मध्ये 'द न्यूयॉर्कर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये त्यांनी असंही म्हटलंय की, भविष्यासाठी दोन्ही तंत्रज्ञानाचा मिलाप होणं गरजेचं आहे.
 
"एक तर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर ताबा मिळवू किंवा, आपण पूर्णपणे त्याच्या ताब्यात असू," असं सॅम ऑल्टमन यांनी म्हटलं होतं. ही कल्पना इलॉन मस्क यांनी त्यांच्याशी शेअर केली होती. मस्कदेखील 2018 पर्यंत 'ओपन-एआय' शी संलग्न होते.
 
पण त्यांची कंपनी टेस्लाशी संबंधित हितसंबंधांच्या कारणांमुळं ते त्यातून बाहेर पडले. पण तसं असलं तरी मस्क यांनी 'ओपन-एआय' आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर नियंत्रण मिळवणाऱ्या इतर प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक सुरुच ठेवली आहे.
 
त्यापैकी एक आहे 'न्यूरललिंक'. ते आपला मेंदू कम्प्युटरशी जोडण्याचा प्रयत्न करतं. ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांच्या मते, मानवाला याच पद्धतीनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सबरोबर ताळमेळ ठेवणं शक्य होऊ शकतं.
 
"आपल्या बोलण्याचा आवाज कम्प्युटर्सना अत्यंत हळूवार येईल, अगदी व्हेलच्या आवाजासारखा. त्यामुळं कम्प्युटर्सना माहिती टेराबाइट्समध्ये प्रोसेस करण्यात अडचणी येतील," असं मस्क म्हणतात.
 
एआयची सद्यस्थिती
भविष्याबाबत याच धोक्याच्या दृष्टीकोनातून मस्क आणि सॅम ऑल्टमन यांना आर्टिफिशियिल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली. चॅटजीपीटी आणि DALL-E चं धोरण ठरवण्यामागंही हाच दृष्टीकोन आहे.
 
टेक्नॉलॉजी वर्ल्ड आणि सिलिकॉन व्हॅलीच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या डेली न्यूज लेटरशी बोलताना सॅम ऑल्टमन यांनी काही आठवड्यापूर्वी याबाबत वक्तव्यही केलं होतं. "एक अशी गोष्ट ज्याबाबत अथ्यंत दृढ विश्वास आहे, ती म्हणजे ही यंत्रणा लोकांशी जोडण्याचा सर्वात उत्तम मार्ग , ती अगदी हळू-हळू सर्वांसमोर आणणं हा आहे."
"या पद्धतीमुळं आपल्याला लोक, संस्था आणि धोरण ठरवणाऱ्यांशी सहजपणे याची सांगड घालणं शक्य होईल. म्हणजे ते हे तंत्रज्ञान समजू शकतील, ही यंत्रणा काय करू शकते आणि काय नाही याचा त्यांना अंदाज येईल. अचानक एखादी अत्यंत शक्तिशाली यंत्रणा समोर आणणं हे योग्य नाही," असं सॅम यांनी म्हटलंय.
 
यूट्यूबवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सबाबत माहिती आणि त्याचं विश्लेषण करणाऱ्या 'डॉट सीएसव्ही' चॅनलनुसार या तंत्राबाबत हीच रणनीती उत्तर ठरलीये. गेल्या 20 वर्षांपासून मोठ-मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांनी याच धोरणानुसार काम केलंय.
 
सॅम ऑल्टमन यांच्या वक्तव्यांचंदेखील या चॅनलनं विश्लेषण केलंय. "आर्टिफिशिल इंटेलिजन्सचं नेतृत्व करणाऱ्यांची ही प्रवृत्ती सिलिकॉन व्हॅलीसारखी असते. त्यांचा उद्देश असतो वेगानं पुढं जाणं आणि बदल घडवणं. ही उत्साहात काम करण्याची अशी विचारसरणी आहे, ज्यात उत्पादनामुळं काय गुंता निर्माण होईल, याचा विचार न करताच ते लाँच केलं जातं," असं चॅनलनं म्हटलं होतं.
 
सॅमच्या प्रयत्नांबाबत बोलताना चॅनलनं जोर देत असंही म्हटलं की, "सॅम ऑल्टमनच्या प्रकरणात मात्र असं नाही. इथं घाईचा मुद्दा नाही, तर उत्पादन पूर्ण होण्यापूर्वी समोर आणणं हा आहे. यामुळं लोक हळू हळू त्याच्याशी अनुकूल बनतात."
 
चॅटजीपीटी आणि DALL-E च्या संदर्भातही हेच होतंय. शैक्षणिक आणि सृजनशीलतेच्या क्षेत्राशी संबंधित सर्व लोक यावर टीका करतायत.
 
"चॅटजीपीटी अविश्वसनीयरित्या मर्यादीत आहे. पण महानतेची खोटी प्रतिमा तयार करण्याच्या बाबतीत ते उत्तम आहे. सध्या कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टीबाबत याच्या माहितीवर विश्वास ठेवणं चुकीचं ठरेल," असं सॅम ऑल्टमन यांनी डिसेंबरमध्ये एका ट्विटमध्ये मान्य केलं होतं.
 
"ही भविष्यात होणाऱ्या प्रगतीची केवळ झलक आहे. याची सत्यता पडताळण्यासाठी आणि सिद्ध करण्यासाठी अजून बरंच काही करायचं आहे," असं म्हणत त्यांनी म्हणणं मांडलं होतं.
 
सॅम ऑल्टमन यांनी त्या ट्विटर पोस्टवर आलेल्या प्रश्नांच्या उत्तरांतही चॅटजीपीटीबाबत अशा गोष्टी लिहिल्या होत्या. या पोस्टवर आलेले बहुतांश प्रश्न चॅटबाबतच्या पूर्वग्रहांसंदर्भात होते.
 
"पूर्वग्रहांचा विचार करता चॅटजीपीटीमध्ये अनेक कमतरता आहेत. आम्ही ते सुधारण्याचं काम करत आहोत. याचं डिफॉल्ट सेंटिंग ठिक करण्याच्या आणि निष्पक्षता ठरवण्याच्या दिशेनं आम्ही काम करत आहोत. म्हणजे, याचा वापर करणाऱ्याला प्राधान्यक्रमानुसार रिझल्ट्स मिळू शकतील," असं सॅम यांनी मान्य केलं होतं.
सॅम ऑल्टमन असंही म्हणाले होते की, हे काम दिसतं तेवढं सोपं नाही. ते पूर्ण करण्यासाठी अजून बराच वेळ लागेल.
 
भविष्यात काय होईल?
सॅम ऑल्टमन यावर्षी एप्रिल महिन्यात 38 वर्षांचे होतील. नुकताच त्यांना त्यांचाच एक जुना मेसेज सापडला होता. त्यात त्यांनी 2025 पर्यंत तंत्रज्ञान क्षेत्रात काहीतरी महत्त्वाचं यश मिळवण्याची भविष्यवाणी केली होती.
 
या यशामध्ये न्युक्लिअर फ्युजनला प्रोटोटाइप स्केलवर प्रभावी बनवणं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सला इंडस्ट्रीतील सर्वांसाठी उपलब्ध करून देणं आणि लोकांवर सर्वाधिक परिणामकारक ठरणाऱ्या किमान एका गंभीर आजाराच्या उपचारासाठी नवीन जीन्स एडिटिंगचं तंत्रज्ञान विकसित करणं याचा समावेश आहे.
 
त्या ट्विटमध्ये सॅम यांनी न्युक्लिअर फ्युजनबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती.
 
ऑल्टमॅन यांनी स्वस्त वीजनिर्मितीबाबत संशोधन आणि साधनसंपत्ती वाढवण्यासाठी अनेक वर्ष 'हिलियन एनर्जी' नावाच्या कंपनीत गुंतवणूक केली. ही कंपनी पाण्याचा इंधन म्हणून वापर आणि स्वच्छ तसेच कमी खर्चात वीज निर्मितीच्या दिशेनं काम करतेय.
 
सॅम यांच्या तीन भविष्यवाणींपैकी किमान एक खरी ठरण्यासाठीदेखील अजून दोन वर्षांचा काळ शिल्लक आहे. पण त्यापैकी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आतापासूनच आकार घेत असल्याचं पाहायला मिळतंय. ते शक्य होतंय सॅम यांची कंपनी ओपन-एआयमुळं.
 
ही कंपनी सॅम ऑल्टमन यांनी अशा गोष्टींमध्ये यश मिळवण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी स्थापन केली होती, ज्या भविष्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या असतील असं त्यांना वाटत होतं. त्यासाठीच त्यांनी अनेक वर्षे तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी गुंतवणूक सुरू ठेवली.
ज्या भविष्याची कल्पना ते करतात त्याबाबत 'द न्यूयॉर्कर' मध्ये लिहिलेल्या एका लेखात सॅम यांनी असं लिहिलंही होतं की, "यातही आमची मूल्ये तीच असतील जी आज आहेत."
 
अमेरिकेच्या संदर्भात त्यांनी म्हटलं होतं, "माझं या देशावर अत्यंत प्रेम आहे. काळ कोणताही असला तरी लोकशाही ही अशाच अर्थव्यवस्थेत सुरक्षित असते, ज्यात विकास होत असतो."
 
याबाबत सॅम पूर्णपणे कटिबद्धही आहेत. "आर्थिक विकासाच्या लाभाशिवाय लोकशाहीत होणारा प्रत्येक प्रयोग हा अपयशी ठरेल," असं ते म्हणतात.
 
पण, हे शक्य होईल का?
करिअरच्या सुरुवातीच्या काळातच सॅम ऑल्टमन यांनी त्यांच्या प्रोजेक्ट्समध्ये गुंतवणुकीसाठी मोठ-मोठ्या गुंतवणूकदारांना आकर्षित केलं. विशेषतः 'वाय कंबिनेटर' च्या काळात त्यांनी स्वतःदेखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली.
 
त्यांच्या एकूण संपत्तीबाबत कोणालाही पुरेशी माहिती नाही. मात्र, नुकत्याच झालेल्या काही घोषणांमुळं त्यांचा प्रवास अब्जाधीशांच्या यादीकडं असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेत.
 
नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून काम सुरू केलेली 'ओपन-एआय' कंपनी आज मर्यादीत नफ्यासह एक हायब्रिड कंपनी बनलीय.
 
काही आठवड्यांपूर्वी 'द वॉल स्ट्रीट जनरल' नं एका लेखात कंपनीच्या कमाईबाबत उल्लेख केला होता. 'ओपन-एआय' अत्यंत कमी नफा मिळवत असूनही 2900 मिलियन डॉलरची स्टार्ट अप बनण्याच्या जवळ पोहोचली असल्याचं त्यात म्हटलं होतं.
त्यानंतर सॅम यांच्या कंपनीनं मायक्रोसॉफ्टबरोबर मोठा करार केला. अनिश्चित काळ आणि अब्जावधींच्या या करारांतर्गत पर्सनल कम्प्युटिंग, इंटरनेट, स्मार्ट डिव्हायसेस आणि क्लाऊडच्या क्षेत्रात मोठी कामं त्यामुळं आगामी काळात पाहायला मिळतील.
 
याच आठवड्यात अमेरिकेच्या चॅटजीपीटीचं सब्सक्रिप्शन व्हर्जन लाँच झालंय. प्रयोग म्हणून केवळ अमेरिकेतच ते सुरू करण्यात आलंय. त्याच्या एका महिन्याच्या सदस्यत्वासाठी यूझरला 20 डॉलर द्यावे लागतात.
 
या बदलांमुळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सची विश्वासार्हता आणि ते सुरक्षित ठेवण्याच्या कटिबद्धतेवर काहीही परिणाम होणार नाही.
 
मात्र, महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, तसं होऊ शकेल का? या अशा गोष्टी आहेत, ज्या आगामी काळात आपण चॅटजीपीटीलाच विचारू शकतो.
 
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती