इन्स्टाग्राम रिलच्या नादात समाजाची 'ग्रीप' नीट ठेवणं हे 'चॅलेंज' झालंय का? धोकादायक रिल्स लोक का बनवतात?
मंगळवार, 25 जून 2024 (08:43 IST)
धबधब्याच्या उंच कड्यावरून दीपक माळी उडी मारताना दिसतात, तेव्हा ते रील पाहतानाही आपल्या काळजाचा ठोका चुकतो.मेट्रो स्थानकाला जोडणाऱ्या पुलावरुन ते शेजारच्या इमारतीवर उडी मारतात, तेव्हाही त्या कृतीचा व्हीडिओ पाहताना आपल्याला भीती वाटते.असे अनेक रिल्स दीपक माळींच्या सोशल मीडिया अकाऊंटवर दिसतात.
दीपक माळींचा असाही एक व्हीडिओ आहे, ज्यात ते पुण्यातल्या जांभूळवाडीजवळच्या हायवे वरच्या 'त्या इमारतीवरच्या कठड्याच्या टोकावरून ते सहज उडी मारताना दिसतात.
जांभूळवाडीजवळच्या हायवेवरील ही तीच इमारत आहे, ज्यावरुन लोंबकळलेल्या मुलीचा व्हीडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झालाय.
ग्रीप चॅलेंज म्हणून केलेला हा व्हीडिओ असून, त्यात एक मुलगी एका मुलाच्या हाताला धरून लोंबकळताना दिसतेय.
प्रचंड उंचीवर लोंबकळलेली ही मुलगी आणि त्याच्या खाली हायवेवरुन जाणाऱ्या गाड्या - असं हे रील व्हायरल झाल्यावर साहजिकच समाजातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
रील करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी झाली आणि त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला.
मीनाक्षी साळुंखे आणि मिहीर गांधी यांच्यासह ते रील शूट करणारी व्यक्ती अशा तिघांवर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. यामध्ये अगदी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याचाही, गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यात आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या कलमानुसारही कारवाई करण्यात आली आहे.
पण कोणत्याही समाजमाध्यमांवर दिसणारा असा हा स्टंटचा काही पहिलाच व्हीडिओ नाही.
असेच रिल्स, स्टंटचे व्हीडिओ पोस्ट करणारे दीपक माळी हे गेली 15-16 वर्ष या क्षेत्रात आहेत. पार्कर या खेळात प्रवीण असणारे माळी हे त्याचं प्रशिक्षणही देतात. आपण प्रोफेशनल अॅथलिट असल्याचं ते सांगतात.
असे स्टंट करुन त्याचे व्हीडिओ समाजमाध्यमांवर टाकण्याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना दीपक माळी म्हणाले, "मी रिल्स टाकायला सुरुवात केली, तेव्हा करिअर म्हणून मी स्टंट करत होतो. पार्कर हा खेळ आहे. सिनेमात दिसतात तशाच प्रकारचे हे स्टंट असतात.
"समाजमाध्यमांवर मी याचे रील टाकतो, तेव्हा त्यातून साहजिकच सिनेमा वगैरे लोकांशी जोडून घ्यायला मला मदत होते. कामं मिळायला मदत होते.
"मी कोणताही स्टंट करतो, तेव्हा काही काळजी घेतलेली असते. रेस्क्यू ऑपरेशन वगैरे करायचं असेल, तर ज्या पद्धतीच्या गोष्टी कराव्या लागतील, त्याचा अंदाज आपल्याला नुसतं पाहून किंवा विचार करून करता येत नाही. ते प्रत्यक्ष केलं गेलं पाहिजे.”
पण आता असे स्टंट करणारे तरुण बिघडलेले आहेत, अशीच मानसिकता आणि प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर दिसणाऱ्या या रिल्समुळे होत असल्याचं दीपक माळी नोंदवतात.
पुण्यातल्या व्हायरल रिलबद्दल बोलताना ते म्हणतात, "एखादा प्रोफेशनल असेल तर हरकत नाही. पण तसं नसेल तर ते अपलोड करणं चूक आहे. आताचं रील चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं. काही चुका होत असतील तर त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.”
संकेत देशपांडे हा देखील पार्कर आणि ट्रॅव्हल ब्लॅागिंगचे रिल्स आपल्या समाजमाध्यमावरच्या अकाऊंटवर टाकतो. फिटनेससाठीचा पर्याय म्हणून तो पार्कर हा खेळ शिकायला लागला.
आपण काही तरी शिकतोय ते लोकांना कळावं म्हणून हे रिल्स टाकले असल्याचं तो सांगतो. तर त्याच्या ट्रॅव्हल ब्लॅागिंगच्या यूट्यूब चॅनलवर लोकांनी यावं म्हणून तो त्याचे रिल्स करून इन्स्टाग्रामवर अपलोड करतो.
असे स्टंट करण्याबाबत बोलताना तो म्हणाला, "आम्ही प्रत्येक गोष्ट ही सुपरव्हिजन खाली करत होतो. उगाच रिस्क घेऊन काहीही केलं नाही. तुमची क्षमता आहे का ते तपासून, जमतंय का पाहून तेवढंच करा असं आम्हांला सांगितलं जायचं. पार्करचे मी टाकलेले हे व्हीडीओ मी काही नवं शिकतोय ते लोकांना कळावं यासाठीच होते.”
अर्थात रिल्स टाकत राहण्याबाबत मात्र तो म्हणतो, "तुम्ही एकदा ठरवलं असेल की आपले फॅालोअर्स वाढवायचे आहेत, रीच वाढवायचा आहे तर मात्र ते अडिक्टिव्ह आहे. तुम्हांला सातत्याने काही ना काही पोस्ट करत रहावं लागतं. मी माझे ट्रॅव्हल ब्लॅाग्ज करतो त्याचे रिल्स मी इतर माध्यमांवर टाकतो.”
तर अभिनेत्री आर्या घारे ही देखील नियमितपणे रिल्स अपलोड करतो. फॅालोअर्स मिळवायचे आणि टिकवायचे असतील तर नियमितपणे हे व्हीडिओ पोस्ट करावे लागतच असल्याचं तिचं म्हणणं आहे.
आर्या म्हणाली, “मी स्टंट करत नाही. उत्पन्न म्हणूनही आता या माध्यमांकडे बघत नाही. पण इंडस्ट्रीमध्ये काम मिळण्यासाठी मात्र या रिल्सचीच मदत होते. रिल्समुळे रीच वाढतो आणि त्यावरुन फॅालोअर्स. जास्त फॅालोअर्स, व्हारयल रिल्समुळे आता इंडस्ट्रीमध्ये निवड होतेय.”
पण यातून तरुणांमध्ये एक स्पर्धाही निर्माण होत असल्याचं ती नोंदवते.
"माझे इतके फॅालोअर्स आहेत, मी या लेव्हलला आहे, असं होतं. तसंच, इन्स्टाग्रामवरुन पैसे मिळत नसले तरी इतर माध्यमातून उत्पन्न मिळतं. 10 हजार फॅालोअर्स असताना मला कोलॅब आणि इतर मोजसारख्या प्लॅटफॅार्मवरुन 24 हजारांपर्यंत उत्पन्न मिळत होतं. अर्थातच यासाठी क्रिएटिव्हिटी दाखवावी लागते. वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तरुण मुलं याकडे उत्पन्नाचं साधन म्हणूनही पाहतात.”
तर पत्रकार, समीक्षक आणि आता काही काळापासून सातत्याने रीलमधले 'पुणेरी काका' म्हणून ज्यांची ओळख निर्माण झाली आहे, ते सुनंदन लेले म्हणतात, "रील, समाजमाध्यम ही एक काडेपेटी आहे. त्याने निरंजनही लावता येतं आणि त्याने घरही पेटवता येतं. तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. यामुळे असंख्य क्रिएटिव्ह लोकांना फायदा झाला आहे. मला स्वत:ला हा फायदा वाटतो की, चांगले रील पाहून तुम्ही दोन मिनिटं हसून ताण-तणाव कमी करू शकता.”
हे व्यसन आहे का?
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोळकर यांनी काही दिवसांपुर्वी विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या ताण-तणाव, नैराश्य आणि इंटरनेट अॅडिक्शनचा अभ्यास केला.
यासाठी त्यांनी पुण्यातल्या तीन शैक्षणिक संस्थांमधल्या जवळपास 1922 मुलांचा सर्व्हे केला. यात एकूण 541 मुली आणि 1381 मुलांचा समावेश होता, तर वयोगट होता साधारण 17 ते 20 वर्षांचा.
या अभ्यासात निघालेल्या निष्कर्षांनुसार, जवळपास 45.66 टक्के मुलींना सौम्य स्वरुपाचे इंटरटनेट अॅडिक्शन होते, तर 31.24 टक्के मुलींना मध्यम स्वरुपाचे अॅडिक्शन होते.
तीव्र स्वरुपाचे अॅडिक्शन असणाऱ्या मुलींची संख्या होती 1.11 टक्के, तर मुलांमध्ये हे प्रमाण सौम्य-47.72 टक्के, मध्यम 28.89 टक्के आणि तीव्र- 1.57 टक्के असे होते.
एकूण आकडेवारी पाहिली तर फक्त 16.29 टक्के मुलांमध्ये अजिबात अॅडिक्शन नसल्याचे दिसले.
बीबीसी मराठीशी बोलताना डॅा. दाभोळकर म्हणाले, "सध्या इंटरनेट अॅडिक्शन हे गंभीर स्वरुपाचे असून इतर अॅडिक्शनप्रमाणेच त्याला ट्रीट केले गेले पाहिजे, असंं जगभरात मांडलं जात आहे.
"आपण इतक्या लोकांपर्यंत पोहोचलो, आपण हे पाहिलं यातून एकप्रकारे किक मिळते. इतर अॅडिक्शनमध्ये मेंदूचं सर्किट जसं काम करतं, तसंच याबाबतही करत असल्याचं संशोधनातून दिसलं आहे. त्यातून आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे नवनवीन प्रकार केले जातात. अशा मुलांना शिक्षा करण्याऐवजी समुपदेशन आणि उपचाराची यंत्रणा तयार करायला हवी.”
तर सायबर क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या मुक्ता चैतन्य यांच्या मते, "जे रिल्स बनवतात त्यांचा ते पाहिलं जाणे, त्यातून येणारी एक्साईटमेंट याची पातळी वाढते.
"हटके, काही तरी वेगळं करायला भाग पाडले जाते. त्या मुलांनी केलेले रील हा त्याचाच भाग आहे. जेव्हा रील हा प्रकार नवा होता, तेव्हा ट्रेन समोरून जाण्याचे स्टंट केले जायचे. हे करणारा वयोगट साधारणपणे 25 च्या आतला आहे.
"या वयात थ्रील मिळवणं हे मेंदू, शरीर आणि हार्मोन्सची गरज असते. समाजमाध्यमांवर ते सहज मिळतंय. पुर्वी किल्ला चढणे, उंचावर जाणे अशा गोष्टी केल्या जायच्या. आता कष्ट न करता हे थ्रील मिळतं.”
"इन्स्टाग्रामवरून पैसे मिळत नाहीत. पण युट्युबचा शॅार्ट प्रसिद्ध झाला तर पैसे मिळतात. तुम्ही जेवढे प्रसिद्ध तेवढ्या जास्त संधी.
पैशांचं गणित आहेच, पण त्यापेक्षा ही जास्त हे थ्रीलचं गणित आहे. जेव्हा असं काही करता तेव्हा डोपामाईन रिलीज होतं. मेंदूतल्या रासायनिक प्रक्रिया घडतातच. पण त्याचा अप्पर लिमिट ठरवता आला पाहिजे. याला सेल्फ कंट्रोल हाच उपाय आहे.”