जीपीएसचा वापर करत असल्यास सावधान...

सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात अनेकजण अॅन्ड्रॉईड मोबाईलमुळं कुठंही जाण्यासाठी मोबाईलमधल्या GPS चा सर्रास वापर करतात. पण जीपीएसचा वारंवार वापर तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं, वैज्ञानिक संशोधनातून समोर आलं आहे. जीपीएसच्या वापरामुळं तुमच्या मेंदूमधील इतर मार्ग शोधण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होतो, असा निष्कर्ष वैज्ञानिकांनी नोंदवला आहे.
 
लंडनमधील विद्यापीठ कॉलेजच्या संशोधकांनी हा निष्कर्ष नोंदवला असून, यासाठी त्यांनी अमेरिकेतल्या 24 स्वयंसेवकांवर याचे संशोधन केलं आहे. या 24 संशोधकांना सेंट्रल लंडनमधील रस्ते शोधायचं काम दिलं होतं. यावेळी त्यांच्या मेंदूच्या क्रियावर बारकाईनं लक्ष देण्यात येत होतं. यामध्ये त्या स्वयंसेवकांच्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पस नावाच्या कार्यप्रणालीचं निरिक्षण करण्यात आलं. जो मेंदूमधील स्मारणशक्तीचं आणि नेव्हिगेशनचं काम करतो. याशिवाय मेंदूमधील नियोजन आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया करणाऱ्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचंही निरिक्षण करण्यात आलं.
 
या संशोधनावेळी या सर्व स्वयंसेवकांना लंडनमधील नागमोडी वळणाच्या किचकट रस्ते शोधायला सांगितलं होतं. ज्यातून त्यांचा मेंदू कशाप्रकारे काम करतो, हे समजून शकेल. या संशोधनाच्या निमित्तानं हे स्वयंसेवक लंडनच्या रस्त्यावर उतरले, त्यावेळी त्यांना सुरुवातीला जीपीएसचा वापर करण्यास मनाई करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पस आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स योग्य प्रकारे कार्यन्वित असल्याचं संशोधकांना आढळून आलं. पण जेव्हा जीपीएस वापर करण्याची त्यांना सूट देण्यात आली, त्यावेळी त्या स्वयंसेवकांच्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पस आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स कार्यन्वित नसल्याचं आढळून आलं.
 
या संशोधनासंदर्भात लंडनच्या विद्यापीठ कॉलेजचे ह्यूगो स्पायर्स यांनी सांगितलं की, जेव्हा  एखाद्या व्यक्तीला शहरातील रस्त्यांच्या जंजाळातून आपल्या इच्छित स्थळ शोधायचं असतं, तेव्हा त्यांच्यासमोर अनेक अडचणी असतात. त्यावेळी जर त्याच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध नसेल, तर तो त्याच्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पस आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्सवर अधिकचा जोर देतो. पण जेव्हा त्याच्याकडे तंत्रज्ञान उपलब्ध असते, त्यावेळी तो कोणत्याही अडचणींशिवाय त्या इच्छित स्थळी सहज पोहोचतो. पण यावेळी त्याच्या मेंदूमधील इच्छित स्थळांकडे जाणारे इतर मार्ग वापरण्यास टाळतो.
 
यापूर्वीही या विषयावर संशोधन झालं होतं.त्यामध्ये लंडनमधील टॅक्सी ड्रायव्हरच्या हिप्पोकॅम्पीमध्ये मोठी वाढ झाली होती. कारण त्यांनी सेंट्रल लंडनमधील तिथले लॅण्डमार्ग आणि प्रत्येक रस्ता चांगलाच लक्षात ठेवला होता. पण या नव्या संशोधनातून जे ड्रायव्हर सॅटेलाईट नेव्हिगेशनच्या निर्देशांचा वापर करत आहेत, ते आपल्या मेंदूमधील हिप्पोकॅम्पसचा वापर करत नाहीत. त्यामुळे शहरातील इतर रस्त्यांविषयीची त्यांची माहिती मर्यादित होते. नेचर कम्यूनिकेशन जर्नलमध्ये या संशोधनाचं वृत्त प्रकाशित करण्यात आलं आहे.
 

वेबदुनिया वर वाचा