इस्रायल गाझा युद्ध: शतकानुशतकं अन्याय सहन करून असं वसलं आज दिसणारं 'गाझा' शहर
गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (14:56 IST)
-ओमेमा अल-शाजली
Israel Gaza War "इतिहासातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक.. एखादं शतक किंवा एखादं युग या शहराने पाहिलं असेल असं म्हणाल तर कित्येक पिढ्या या शहराच्या साक्षीदार आहेत. जेव्हापासून इतिहास ज्ञात आहे तेव्हापासून हे शहर अस्तित्वात असल्याचं म्हटलं जातं."
हा उतारा आहे 1943 मध्ये प्रकाशित झालेल्या जेरुसलेमच्या पॅलेस्टिनी इतिहासकार आरिफ अल-आरिफ यांच्या पुस्तकातील. या शहराचा संदर्भ याच पुस्तकात आढळतो.
या शहराबद्दल अरबी, इंग्रजी, फ्रेंच आणि तुर्की साहित्यात जे काही आढळलं ते त्यांनी या पुस्तकात शब्द बद्ध केलंय.
1907 मध्ये प्रकाशित झालेल्या अमेरिकन रब्बी मार्टिन मेयरच्या गाझाविषयीच्या पुस्तकात, अमेरिकन ओरिएंटलिस्ट रिचर्ड गॉथिल यांनी लिहिलंय की "इतिहासात रस असलेल्यांसाठी हे एक अद्भुत शहर आहे."
या शहराचं सामरिक महत्त्व समजावून सांगताना गॉथिल यांनी लिहिलं होतं की, "गाझा हे दक्षिण अरब आणि सुदूर पूर्वेकडून भूमध्यसागरीय समुद्रापर्यंत माल वाहून नेणाऱ्या काफिल्यांसाठी भेटीचं आणि विसाव्याचं ठिकाण होतं. या शहरामधून सीरिया, आशिया मायनर (तुर्कीये) आणि युरोपमध्ये मालाची वाहतूक केली जात असे. हे एक वाहतूक केंद्र आणि पॅलेस्टाईन - इजिप्तमधील दुवा होतं."
गाझा शहराची तीन तीन नावं
13 व्या शतकातील लेखक आणि प्रवासी याकूत अल-हमावी यांच्या विश्वकोश 'किताब मुजम अल-बुलदान' (देशांचा शब्दकोश) मध्ये गाझा नामक तीन शहरांचा उल्लेख आढळतो.
पहिलं नाव जझीरा अल-अरब होतं. प्रसिद्ध अरबी कवी अल-अख्तल अल-तघलीबी यांनीही या शहराबद्दल एक कविता लिहिली आहे.
अल-हमावीने दुसरं नाव 'इफ्रीकिया' असं दिलं आहे. हे ट्युनिशियाचे जुनं नाव आहे. अल-हमावी म्हणतात की या शहरातून कैरो दरम्यान प्रवास करण्यासाठी तीन दिवस लागतात.
गाझाचं वर्णन करताना अल-हमावी लिहितात, "गाझा हे इजिप्तच्या दिशेने लेव्हंटच्या सर्वात दूरच्या भागात वसलेलं शहर आहे. हे शहर पॅलेस्टाईन प्रदेशात अश्कलॉनच्या पश्चिमेला आहे."
प्राचीन काळापासून अरब जगतात या शहराला गाझा असंच म्हटलं गेलंय. इस्लामिक काळात, प्रेषित मोहम्मद यांचे आजोबा 'हाशिम बिन अब्द मनाफ' यांच्या संदर्भात या शहराला 'हाशेम यांचं गाझा' असं संबोधन वापरलं गेलं. याच शहरात त्यांचा मृत्यू झाला.
प्रसिद्ध इस्लामिक विद्वान आणि लेखक इमाम अल-शफी यांचा जन्म याच ठिकाणी झाला.
हिब्रू भाषेत याला 'अझा' असे म्हणतात कारण हिब्रूमध्ये अरबी अक्षर 'गेन' (ग) ऐवजी 'ऐन' (ए) किंवा 'हमजा' असं लिहिलं जातं.
अल-आरिफ यांनी आपल्या 'द हिस्ट्री ऑफ गाझा' या पुस्तकात लिहिलंय की, "काही समुदाय याला 'हजाती' म्हणायचे. तर प्राचीन इजिप्शियन लोक याला 'गाझातू' किंवा 'गदातु' म्हणत."
प्रत्येक कालखंडात गाझाला वेगवेगळी नावं देण्यात आल्याचा उल्लेख ग्रीक शब्दकोशातही आढळतो. या नावांमध्ये 'आयनी', 'मिनोआ' आणि 'कॉन्स्टेंटिया' या नावांचा समावेश होता.
चौथ्या शतकात सध्याच्या इस्रायलच्या कैझेरिया भागात जन्मलेल्या ख्रिश्चन धर्मशास्त्रज्ञ युसेबियसने गाझा म्हणजे अभिमान आणि शक्ती असल्याचं म्हटलं होतं.
प्रसिद्ध स्कॉटिश लेग्सिकोग्राफर सर विल्यम स्मिथ यांनीही 1863 मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या 'डिक्शनरी ऑफ द ओल्ड टेस्टामेंट'मध्ये गाझाचा उल्लेख केला आहे.
1910 मध्ये प्रकाशित झालेल्या 'डिक्शनरी ऑफ द न्यू टेस्टामेंट'चे लेखक सोफ्रोनियस म्हणाले होते की 'गाझा' हा फारसी शब्द आहे, ज्याचा अर्थ शाही खजिना आहे. परंतु या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतून झाली आहे असं अनेकांना वाटतं. ग्रीक भाषेत याचा अर्थ संपत्ती किंवा खजिना असा होतो. थोडक्यात फारसी आणि ग्रीक भाषेत गाझाचा अर्थ मिळता जुळता आहे.
असं म्हटलं जातं की, इराणच्या राजाने आपली संपत्ती गाझामध्ये लपवून ठेवली होती. त्यानंतर हा राजा इराणला परतला.
ही घटना रोमन काळात घडल्याचं सांगितलं जातं.
याकूत अल-हमावी यांनी असं नमूद केलंय की 'गाझा' हे टायर नामक व्यक्तीच्या पत्नीचं नाव होतं. याच नावावर फोनिशियन शहर टायरची निर्मिती झाली. हे शहर सध्या लेबनॉनमध्ये आहे.
गाझाची निर्मिती कोणी केली?
इंग्लिश पुरातत्वशास्त्रज्ञ सर फ्लिंडर्स पेट्री हे इजिप्त आणि त्याच्या सभोवतालच्या पुरातत्वशास्त्रातील तज्ञ मानले जातात.
ते सांगतात, ख्रिस्त जन्माच्या आधी तीन हजार वर्ष 'हिल अल-अजवाल' नावाच्या टेकडीवर प्राचीन गाझाची स्थापना झाली. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका हल्ल्यामुळे येथील रहिवासी शहर सोडून गेले होते.
हल्ल्यामुळे शहरातून विस्थापित झालेले लोक तीन मैल दूर स्थायिक झाले आणि त्यांनी गाझा हे नवीन शहर वसवलं.
सध्याचं गाझा याच ठिकाणी अस्तित्वात आहे. हा हल्ला इजिप्तमधील हिक्सोस राजघराण्याच्या कार्यकाळात झाल्याचं मानलं जातं. इसवी सन पूर्व 1638-1530 या 108 वर्षाच्या काळात हिक्सोस राजवंशाने इजिप्तवर राज्य केलं.
या काळात गाझावर या राजवंशाचा ताबा असावा, असं मानलं जातं.
प्राचीन गाझा
परंतु काही लोक आहेत या कथा नाकारतात. त्यांच्या मते, गाझा अजूनही त्याच प्राचीन ठिकाणी आहे जिथे ते पहिल्यांदा निर्माण झालं होतं.
या कल्पनेनुसार 'ताल अल-अजोल' हे गाझाचं व्यापारी बंदर होतं. काही लोकांच्या मते, अलेक्झांडर द ग्रेटने प्राचीन गाझा उध्वस्त केलं होतं. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी नवं गाझा शहर वसविण्यात आलं. सर पेट्री यांचंही हेच मत आहे.
अल-आरिफ आपल्या पुस्तकात लिहितात की, गाझा शहर मेनाइट्स जमातीने वसवलं होतं. मेनाइट्स हे अरब जगतातील सर्वात जुने रहिवासी होते. या लोकांनी इसवी सन पूर्व 1000 मध्ये संस्कृती वसवली.
अल-आरिफच्या मते, गाझा शहराला केंद्र म्हणून विकसित करण्यात या लोकांचा मोलाचा वाटा आहे.
इजिप्त आणि भारत यांच्यातील महत्त्वाचा व्यापारी दुवा असल्याने अरबांसाठी गाझाचं महत्त्व निर्माण झालं. लाल समुद्राच्या तुलनेत हे शहर त्यांच्यासाठी सर्वोत्तम व्यापारी मार्ग होता.
अरब जग आणि भारत
अरबी द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील येमेनमध्ये या भागातील व्यापार सुरू झाला. तिथे अरब जगत आणि भारत यांच्यातील व्यापार एकेकाळी भरभराटीला आला होता.
येमेन नंतर हा व्यापारी मार्ग उत्तरेकडे मक्का, मदिना आणि पेट्राकडे गेला आणि दोन शाखांमध्ये विभागला गेला.
दुसरी शाखा ताईम, दमास्कस आणि पालमायरा येथून वाळवंट मार्गाने भूमध्य समुद्राकडील गाझा येथे पोहोचली.
काही इतिहासकारांचा असा निष्कर्ष आहे की, मायन आणि शेबा या अरबी शासकांनी गाझा शहराची स्थापना केली.
अल-आरिफच्या म्हणण्यानुसार, अवीट आणि अनाकाइट हे पहिले दोन लोक होते जे गाझामध्ये स्थायिक झाले. त्यांना प्राचीन पॅलेस्टिनी देखील म्हणतात आणि ओल्ड टेस्टामेंटच्या पुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख आहे.
असं मानलं जातं की प्रेषित इब्राहिमचे वंशज डायनाइट्स आणि इडोमाईट्स, जे दक्षिण जॉर्डनच्या बेदुइन जमातीचे होते, ते देखील गाझामध्ये स्थायिक झाले.
कनानी संस्कृतीचे लोक
'द हिस्ट्री ऑफ गाझा' या पुस्तकात उल्लेख आहे की बुक ऑफ जेनेसिस (हिब्रू बायबल आणि ख्रिश्चन ओल्ड टेस्टामेंटचे पहिले पुस्तक) नुसार गाझा हे जगातील प्राचीन शहरांपैकी एक आहे.
बुक ऑफ जेनेसिसनुसार, हे शहर नोहाचा मुलगा हॅमचे वंशज, कनानी संस्कृतीतील लोकांनी वसवले होते. आणखीन एका उल्लेखात असं म्हटलंय की कनानी लोकांनी ते अमोरी जातींकडून जिंकलं होतं.
14 व्या शतकात ट्युनिशियामध्ये जन्मलेल्या इतिहासकार इब्न खलदुन यांच्या मते, कनानी हे अरब होते जे त्यांचा वंश अमालेकिया जमातीशी संबंधित असल्याचं सांगतात.
पण काहींच्या मते कनानी लोक खरे तर पर्शियन गल्फमधून आले होते. 5,000 वर्षांपूर्वी ते या भागात राहत असल्याचा इतिहासकारांचा अंदाज आहे.
ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ सर पेट्री यांच्या मते, शहराच्या भिंतीच्या मोठ्या भागात जे अवशेष सापडले ते कनानी काळात बांधले गेले होते. कनानी लोकांनंतर तिथल्या खोदणाऱ्यांना या आकाराचे मोठे दगड पुन्हा सापडले नाहीत.
वर्णमालेचा अविष्कार
इजिप्तच्या हिक्सोस राजघराण्याच्या ताब्यात असलेल्या कनानी शहराचे अवशेष आज देखील गाझा पट्टीच्या तेल अल-अझुल शहराच्या दक्षिणेस आहेत. तेथे थडगे सापडले आहेत. यांपैकी काही कांस्ययुगीन वर्ष इसवी सन पूर्व 4000 मधील असल्याचं सांगितलं जातं.
अल-आरिफ म्हणतात की, कनानी लोक गाझा परिसरात ऑलिव्हची लागवड करत असत. मातीकामापासून ते खाणकामापर्यंत बरीचशी काम ही जमात करायची.
कनानी संस्कृतीने वर्णमाला शोधली असं मानलं जातं. असं म्हणतात की ज्यूंनी या लोकांचे अनेक कायदे आणि तत्त्वे स्वीकारली होती.
इतिहासात, गाझावर इजिप्शियन, बॅबिलोनियन, अॅसिरियन, ग्रीक, इराणी आणि रोमन साम्राज्यांनी राज्य केलं. पॅलेस्टिनी इतिहासकार आरिफ अल-आरिफ यांनी गाझाचा इतिहास "वैभवशाली" असल्याचं म्हटलं आहे.
याचं कारण स्पष्ट करताना ते सांगतात, "गाझाने आपल्या जीवनकाळात सर्व प्रकारच्या आपत्तींचा आणि धोकादायक परिस्थितींचा सामना केला आहे. ज्यांनी हल्ले केले ते स्वतः पराभूत झाले किंवा इथून निघून गेले. त्यामुळे या उदाहरणाला काहीच अपवाद नाही."