पाकिस्तानच्या वायव्य खैबर पख्तूनख्वा प्रांतात बांधकाम सुरू असलेल्या मुलींच्या सरकारी प्राथमिक शाळेला अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात नुकसान झाले, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. पोलिसांनी सांगितले की, स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आला होता. स्फोटावेळी इमारत रिकामी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पोलिसांच्या माहितीनुसार, बन्नू जिल्ह्यातील बाका खेल पोलिस परिसरातील अझान जावेद प्राथमिक शाळेच्या आवारात दहशतवाद्यांनी स्फोटके ठेवली होती. या शक्तिशाली स्फोटामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी सांगितले की, एफआयआर नोंदवण्यात आला आहे आणि स्फोटस्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीम तैनात करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि हा परिसरातील शैक्षणिक विकासाला अडथळा आणण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.
2007 ते 2017 दरम्यान आदिवासी भागात 1,100 हून अधिक मुलींच्या शाळा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. या दरम्यान, महिला शिक्षिका आणि विद्यार्थिनींनाही लक्ष्य करण्यात आले आहे. 2014 मध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांनी सुरू केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईपूर्वी, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने स्वात जिल्ह्यातील त्यांच्या बालेकिल्ल्यातून आदिवासी भागात आणि वायव्य प्रांतातील इतर जिल्ह्यांमधील मुलींच्या शाळांवर शेकडो हल्ले केले होते. या कारवाईनंतर, टीटीपी दहशतवादी अफगाणिस्तानात पळून गेले आणि त्यांच्या नवीन लपण्याच्या ठिकाणांमधून सीमापार हल्ल्यांची योजना आखत होते.