मुस्लीम आणि बौद्ध धर्मीयांच्या वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत दहा दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. दोन धर्मीयांमधील वाद भडकू नये त्यावर नियंत्रण मिळवता यावे यासाठी श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेतील कँडी भागात धार्मिक दंगल उसळली. त्यानंतर हिंसा पसरवणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करणे हाच आणीबाणी लागू करण्याचा मुख्य उद्देश आहे असे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे.
बौद्ध आणि मुस्लीम धर्मीयांमध्ये गेल्या वर्षभरापासून संघर्ष आणि वाद सुरु आहे. बौद्ध धर्मीयांना जाणीवपूर्वक मुस्लीम धर्मांतर करण्यास भाग पाडत आहेत असा आरोप बौद्ध धर्मीयांनी केला आहे. तसेच बौद्ध धर्माचा वारसा असलेली धार्मिक स्थळे उद्धवस्त केली जात असल्याचाही आरोप होतो आहे. हा सगळा वाद चिघळल्यामुळे आणि शिगेला पोहचल्यामुळे श्रीलंकेत १० दिवसांची आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.