'ढिगाऱ्याखाली मी बाळाला दूध पाजलं, त्याच्या धाडसामुळेच जिवंत राहिले'

सोमवार, 13 फेब्रुवारी 2023 (17:45 IST)
अलाइस कडी
समानडाग, तुर्की
 
तुर्की आणि सीरियात भूकंपाने हाहाकार माजला आहे पण नशिबाची दोरी बळकट असेल तर काहीही घडू शकते असे चमत्कारही घडत आहेत.
 
नेकला कॅम्यूझ यांनी 27 जानेवारीला बाळाला जन्म दिला. यागिझ असं त्याचं नाव ठेवलं. यागिझचा अर्थ होतो धाडसी.
 
दहा दिवसांनंतर तुर्कीतल्या हताय भागात पहाटे सव्वाचार वाजता नेकला बाळाला दूध पाजत होत्या. त्याचवेळी भूकंप झाला. भूकंपाने सगळे ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
 
समानडाग नावाच्या शहरात पाच मजली इमारतीत नेकला कुटुंबीयांसह दुसऱ्या मजल्यावर राहतात. आमची इमारत चांगली होती, कधीही असुरक्षित वाटलं नाही.
 
भूकंपाने सगळी परिस्थिती पालटली. इमारती भुईसपाट झाल्या आणि उरला ढिगारा.
 
"भूकंप झाला तेव्हा मला बाळाला घेऊन दुसऱ्या खोलीत जायचं होतं जिथे माझा नवरा होता. त्यालाही मी होते त्या खोलीत यायचं होतं.
 
"तो दुसऱ्या मुलाला घेऊन मी होते त्या खोलीच्या दिशेने निघाला वॉर्डरोब त्याच्या अंगावर कोसळलं. त्याला हलणंही अवघड झालं", असं नेकला सांगतात.
 
"भूकंपाची तीव्रता वाढतच गेली. भिंत कोसळली. अख्खी खोली कंप पावत होती. इमारत कलू लागली. जेव्हा भूकंप थांबला तेव्हा मी एक मजला खाली कोसळले आहे हे मला कळलंच नाही. मी नवऱ्याचं नाव घेऊन ओरडू लागले. मुलाचं नाव घेऊन ओरडू लागले. कोणाचंही काहीही उत्तर आलं नाही," नेकला सांगतात.
 
33वर्षीय नेकला तान्ह्या मुलासह खालच्या मजल्यावर कोसळल्या होत्या. बाळ त्यांच्या शरीरावरच होतं. त्यांनी हाताने बाळाला धरुन ठेवलं होतं. त्यांच्या बाजूला वॉर्डरोब कोसळला. काँक्रिटचा स्लॅब त्या वॉर्डरोबवर कोसळल्याने नेकला आणि बाळ वाचलं.
 
नेकला आणि बाळाला पुढचे चार दिवस ढिगाऱ्यातच राहावं लागलं.
 
पहिला दिवस
घरी पजामावर असणाऱ्या नेकला त्याच स्थितीत ढिगाऱ्याखाली अडकल्या. काळाकुट्ट अंधार सोडून काहीच दिसत नव्हतं. आजूबाजूला काय घडतंय, आपण कुठे आहोत हे समजून घेण्यासाठी त्यांनी ऐकण्यावर भर द्यावा लागला.
 
यागिझ म्हणजे त्यांचं बाळ व्यवस्थित श्वास घेत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
 
ढिगाऱ्यातल्या धुळीमुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता. पण थोड्यावेळाने परिस्थिती सुधारली, त्यांना श्वास घेता येऊ लागला. ढिगाऱ्यात त्यांना उबदार वाटू लागलं.
 
नेकला ज्या ठिकाणी अडकल्या होत्या तिथे त्यांच्या अंगाखाली लहान मुलांची खेळणी असल्याचं त्यांना जाणवत होतं पण त्या हालचाल करू शकत नव्हत्या.
 
कोसळलेला वॉर्डरोब, बाळाची नाजूक त्वचा, त्या दोघांनी परिधान केलेले कपडे याव्यतिरिक्त नेकला यांना काँक्रिट आणि ढिगारा जाणवत होता.
 
त्यांना थोड्या अंतरावर आवाज ऐकू येत होते. त्यांनी ओरडून लोकांना ठावठिकाणा सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी वॉर्डरोबवर वस्तू आदळवून प्रयत्न केला.
 
"कोणी आहे का? कुणाला माझा आवाज ऐकू येतोय का," असं त्यांनी विचारलं.
 
थोड्या वेळानंतर बाजूच्या ढिगाऱ्यातल्या काही गोष्टी त्यांनी उचलल्या. त्या उचलून त्यांनी वॉर्डरोबवर आपटल्या. नेकला यांना डोक्यावर काय होतं ते कळत नव्हतं. ते अंगावर कोसळेल याची भीती त्यांना वाटेल.
 
कोणीही उत्तर दिलं नाही. कोणी मदतीला येऊ शकणार नाही असं त्यांना वाटलं. "मी प्रचंड घाबरले होते," असं नेकला यांनी सांगितलं.
 
ढिगाऱ्याखालचं आयुष्य
अंधारात ढिगाऱ्याखाली नेकला यांनी किती वाजले आहेत ते कळलं नाही.
 
"बाळ जन्माला येतं तेव्हा तुम्ही अनेक गोष्टींचं नियोजन करता. ते सगळं राहिलं बाजूला, बाळासकट मी ढिगाऱ्याखाली अडकले. पण मला यागिझची काळजी घ्यायची होती. मी जिथे अडकले होते तिथे यागिझला दूध पाजू शकले."
 
प्यायला पाणी किंवा खायला-प्यायला काहीच मिळायची शक्यता नव्हती. अगतिक होऊन त्यांनी स्वत:चं दूध पिण्याचा प्रयत्न केला.
 
ढिगाऱ्याच्या वर काहीतरी हालचाल सुरू आहे याची त्यांना जाणीव झाली. लोक चालत आहेत, बोलत आहेत हे त्यांनी ऐकलं. पण ते आवाज हळूहळू दूर गेले. ते आवाज जवळ येत नाहीत तोवर शरीरातली ऊर्जा साठवूया असा विचार त्यांनी केला.
 
ढिगाऱ्याखाली असताना नवऱ्याचं काय झालं असेल, दुसरा मुलगा कुठे असेल याचेच विचार सतत त्यांच्या डोक्यात आहे.
 
घरातले बाकीचे, नातेवाईकांचं काय झालं असेल याचीही त्यांना काळजी वाटू लागली. ढिगाऱ्यातून बाहेर येऊ असं वाटलं नाही. पण यागिझ श्वास घेत असल्याने त्यांना आशादायी वाटू लागलं.
 
त्या झोपून गेल्या. यागिझ रडू लागायचा तेव्हा त्या दूध पाजायच्या.
 
सुटका कशी झाली?
ढिगाऱ्याखाली 90 तास काढल्यानंतर नेकला यांना कुत्री भुंकत असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. त्यांना आपण स्वप्न पाहतोय पाहतोय असंच वाटू लागलं.
 
भुंकण्यामागोमाग लोकांचा आवाज ऐकू येऊ लागला. "तुम्ही ठीक आहात का? असाल तर एखाद्या वस्तूने ठोका. तुम्ही कुठल्या इमारतीत राहता"?
 
ढिगाऱ्याखाली असलेल्या नेकला यांचा शोध बचाव तुकडीला लागला होता.
 
बचाव पथकाने काळजीपूर्वक ढिगारा उपसला. त्यांना नेकला आणि यागिझ दिसले. अंधार दूर करण्यासाठी त्यांनी बॅटरीचा वापर केला. बॅटरीच्या उजेडात त्यांना ते दोघे दिसले.
 
इस्तंबूल नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने यागिझ किती वर्षांचा आहे असं नेकला यांना विचारलं. नेकला यांना त्याचं नेमकं उत्तर देता येईना कारण तो वर्षांचा नव्हे अवघ्या काही दिवसांचा होता. त्याचा जन्म होऊन दहा दिवसही झाले नव्हते तोच हा भूकंप झाला.
 
यागिझ याला बचाव पथकाने हाती घेतलं. नेकला यांना स्ट्रेचरच्या माध्यमातून बाहेर काढलं. बाहेर प्रचंड गर्दी होती. त्यांना कोणाचाच चेहरा ओळखता येईना.
 
त्यांना रुग्णवाहिकेत नेण्यात आलं. दुसरा मुलगा नीट आहे याची त्यांनी चौकशी केली.
 
ढिगाऱ्यानंतर
नेकला यांना रुग्णालयात नेण्यात आलं. नवरा इरफान, तीन वर्षांचा दुसरा मुलगा यिगीत यांचीही बचाव पथकाने यशस्वी सुटका केल्याचं त्यांना समजलं.
 
पण त्यांना अदाना भागातल्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. कारण त्यांच्या पायाला गंभीर जखमा झाल्या होत्या.
 
नशिबाने नेकला आणि यागिझ यांना कोणत्याही गंभीर शारीरिक दुखापती झाल्या नाहीत. त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून 24 तास रुग्णालयात ठेवण्यात आलं. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं.
 
पण घरी जायला त्यांचं घरच उरलं नाहीये. एका नातेवाईकाने त्या दोघांना एका निळ्या तंबूत आणलं. लाकूड आणि तारापॉलिन पासून हा तंबू उभारण्यात आला आहे. 13 तंबू आळीपाळीने उभे करण्यात आले आहेत. घर गमावलेली माणसं अशा तंबूत राहत आहेत.
 
सगळी कुटुंबं एकमेकांना मदत करत आहेत. स्टोव्हवर कॉफी तयार करुन एकमेकांना देत आहेत. बुद्धिबळ खेळत आहेत आणि भूकंपातून कसे बाहेर आलो याबद्दल सांगत आहेत.
 
नक्की काय घडलं याचा नेकला विचार करत आहेत. यागिझने माझी जीव वाचवला असं त्यांनी सांगितलं.
 
माझं बाळ या सगळ्याचा सामना करण्याएवढं धैर्यवान नसतं तर मी एवढा काळ तग धरू शकले नसते.
 
अशा स्वरूपाच्या दुर्घटनेला त्याला आयुष्यात पुन्हा कधीला सामोरं जायला लागू नये असं नेकला यांना वाटतं.
 
"बाळ तान्हं आणि त्याला हे सगळं आठवणार नाही याचं त्यांना बरं वाटतं.
 
नेकला यांना कॉल येतो. इरफान आणि यिगिट रुग्णालयातून त्यांना कॉल करतात. व्हीडिओ कॉलमध्ये इरफान बाळाला विचारतात, "लढवय्या कसा आहेस मुला"? असं विचारतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती