अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील एका मशिदीत शुक्रवारी झालेल्या भीषण स्फोटात किमान 10 जण ठार तर 20 जण जखमी झाले. तालिबानच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली. मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी शेकडो लोक नमाज अदा करण्यासाठी जमले होते आणि खलीफा आगा गुल जान मशीद खचाखच भरली होती असे स्थानिकांनी सांगितले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
गृह मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद नफी तकोर यांनी अधिक तपशील दिलेला नाही आणि सांगितले की तालिबानी सुरक्षा कर्मचार्यांनी परिसराला वेढा घातला आहे. त्यांनी सांगितले की, स्फोटाचे स्रोत लगेच कळू शकले नाही आणि अद्याप कोणीही या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाही. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, स्फोट इतका भीषण होता की मशिदीच्या आजूबाजूच्या इमारती हादरल्या.