भारतीयांना घेऊन जाणारं विमान अचानक फ्रान्समध्ये उतरवलं, मानवी तस्करीचा संशय

शनिवार, 23 डिसेंबर 2023 (14:02 IST)
303 भारतीय प्रवाशांना घेऊन जाणारे विमान मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समधील व्हॅट्री या विमानतळावर उतरवण्यात आले आहे.
 
शुक्रवारी (22 डिसेंबर) फ्रान्समधील मीडिया रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली आहे.
 
एअरबस A340 हे विमान संयुक्त अरब अमिरातीहून निकारागुआची राजधानी मॅनागुआला जात होते.
 
या प्रवासादरम्यान गुरुवारी (21 डिसेंबर) विमानाचा पूर्व फ्रान्समधील व्हॅट्री विमानतळावर इंधन भरण्यासाठी एक थांबा होता.
 
त्याचवेळी या विमानातून मानवी तस्करी होत असल्याची पोलिसांना निनावे टीप मिळाली.
 
या कारवाईनंतर अनेक प्रवाशांना विमानतळावरच बंदिस्त करून ठेवण्यात आले आहे.
 
स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे लोक कोणत्या कारणासाठी आणि कशासाठी प्रवास करत होते? तसंच त्यांच्या ओळखपत्रांची कसून चौकशी सुरू आहे.
 
फ्रान्समधील संघटित गुन्हेगारी विरोधी पथक (JUNALCO) या प्रकरणाची चौकशी करत आहे.
 
प्राथमिक माहितीनुसार या विमानातील काही प्रवासी हे ‘बेकायदेशीर स्थलांतरित’ असल्याच सांगण्यात येत आहे.
 
तर आतापर्यंत दोन प्रवाशांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
 
विमानतळाच्या कार्यालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांना सुरुवातीला विमानातच राहण्याची परवानगी देण्यात आली होती, पण नंतर विमानतळाच्या लाऊंजचे बेडसहित व्यवस्था करण्यात आली.
 
फ्रान्समध्ये मानवी तस्करी प्रकरणात दोषी आढळल्यास 20 वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो.
 
हे विमान रोमानियन चार्टर कंपनी लीजेंड एअरलाइन्सच्या मालकीचे आहे.
 
या कंपनीच्या वकिलांनी AFPला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने यात कोणताही गुन्हा केलेला नाही आणि ते फ्रेंच अधिकार्‍यांशी या तपासात पूर्ण सहकार्य करत आहेत.
 
Flightradar या वेबसाईटनुसार या कंपनीची एकूण 4 विमाने आहेत.
 
भारताने काय म्हटलं?
दरम्यान, या घटनेवर फ्रान्समधील भारतीय दूतावासाने प्रतिक्रिया दिली आहे.
 
सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, "दुबईहून निकारागुआकडे जाणाऱ्या विमानाला फ्रान्समध्ये थांबवण्यात आले आहे. यातील 303 प्रवाशांपैकी बहुतेक लोक हे भारतीय वंशाचे आहेत, असं फ्रान्स सरकारने आम्हाला सांगितल आहे."
 
तसंच, भारतीय दूतावासाची एक टीम संबंधित विमानतळावर पोहोचली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला आमचं प्राधान्य राहील, असंही भारतीय दूतावासाने म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती