नेदरलॅन्ड हा भारताचा स्वाभाविक भागीदार

बुधवार, 28 जून 2017 (11:22 IST)
आर्थिक विकासाच्या बाबतीत नेदरलॅन्ड हा भारताचा स्वाभाविक भागीदार आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेदरलॅन्डबरोबरच्या संबंधांचा गौरव केला. नेदरलॅन्ड बरोबरच्या व्यापाराबाबतचे द्विपक्षीय संबंध आगामी काळात अधिक वेगाने वाढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मोदी आणि रुट यांच्यातील चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी वातावरण बदलाच्या करारातील सहभाग आणि नवीकरणीय उर्जेच्या विकासातील सहकार्याबाबतची बांधिलकी पुन्हा एकदा उद्‌धृत केली.
 
नेदरलॅन्डचे पंतप्रधान मार्क रुट यांच्याबरोबर झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये सामाजिक सुरक्षा, जल सहकार्य आणि सांस्कृतिक सहकार्याविषयीच्या तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. “मिसाईल टेक्‍नोलॉजी कंट्रोल रेजिम’मधील सदस्यत्वासाठी भारताला पाठिंबा दिल्याबद्दल रुट यांना धन्यवाद दिले. नेदरलॅन्डच्या सहकार्याशिवाय “एमटीसीआर’मधील भारताचा सहभाग शक्‍यच नव्हता, असे मोदी यांनी म्हटले आहे. भारताला “एमटीसीआर’मध्ये गेल्या वर्षी पूर्ण सदस्यत्व मिळाले. यामुळे भारताला उच्च तंत्रज्ञानाचे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान खरेदी करणे शक्‍य होणार आहे. तसेच रशियाबरोबरच्या संयुक्‍त उपक्रमामध्येही सहभागी होता येणार आहे.
 
भारत आणि नेदरलॅन्डदरम्यानचे संबंध शतकापासूनचे आहेत आणि दोन्ही देशांकडून हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न केले जातील. नेदरलॅन्ड हा भारतासाठी जगभरातील 5 व्या क्रमांकाचा गुंतवणूक भागीदार देश आहे. भारतामध्ये नेदरलॅन्डने गेल्या तीन वर्षात तिसऱ्या क्रमांकाची थेट विदेशी गुंतवणूक केल्याचेही मोदींनी सांगितले.
तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये मोदी नेदरलॅन्डच्या भेटीवर आहेत. आपल्या एकदिवसाच्या भेटीदरम्यान मोदी डच राजे विलेम अलेक्‍झांडर यांच्याशीही चर्चा करतील आणि महाराणी मॅक्‍झिमा यांचीही भेट घेणार आहे. महत्वाच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशीही ते भेट घेणार आहेत.
 
भारतासाठी युरोपाचा ‘एन्ट्री पॉईंट’
संयुक्‍त पत्रकार परिषदेमध्ये नेदरलॅन्डचे पंतप्रधान रुट यांनी भारताचे वर्णन भावी जागतिक महासत्ता असे केले. आर्थिक आणि राजकीय दृष्टीकोनातूनही भारतात होणाऱ्या विकासाचे त्यांनी स्वागत केले. नवीकरणी उर्जा क्षेत्रामध्ये आणि वातावरण बदलासंबंधीच्या पॅरिस कराराबाबत भारताच्या बांधिलकीबाबत रुट यांनी कौतुक केले. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता आहे आणि भारतीय बाजारपेठांमध्ये मोठी संधी आहे. भारतासाठी देण्यायोग्य अनेक गोष्टी नेदरलॅन्डकडे आहेत, असे रुट म्हणाले. “स्वच्छ भारत’ आणि “मेक इन इंडिया’सारख्या स्थायी पुढाकारांबाबतही रुट यांनी मोदी यांचे कौतुक केले आहे. नेदरलॅन्ड हा आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारताचा महत्वाचा भागीदार आहे. युरोप हा भारतासाठी व्यापारी भागीदार आहे. भारतातून युरोपात होणारी 20 टक्के निर्यात नेदरलॅन्डच्या माध्यमातून होते. त्यामुळे भारतासाठी नेदरलॅन्ड हा युरोपाचा “एन्ट्री पॉईंट’ आहे, असेही रुट यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा