21व्या आठवड्यातच जन्माला आलेलं सर्वांत कमी वजनाचं बाळ आता कसं आहे?

गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (17:03 IST)
अमेरिकेमध्ये एका महिलेनं 21व्या आठवड्यातच बाळाला जन्म दिला. हे बाळ जगातील सर्वांत कमी आठवड्यात जन्माला आलेलं बाळ (प्रीमॅच्युअर बेबी) ठरलं आहे.
 
या बाळाचं वजनही एक पौंड म्हणजे जवळपास अर्धा किलोच भरलं होतं. त्यामुळे हे बाळ जगातील सर्वांत कमी वजनाचं बाळ आहे.
 
कर्टिस मीन्सचा जन्म गेल्या वर्षी अलाबामामधील बर्मिंघमध्ये झाला होता. जन्माच्या वेळी या बाळाचं वजन केवळ 420 ग्रॅम होतं.
 
सर्वसाधारणपणे गरोदरपणाचा काळ हा किमान 40 आठवड्यांचा असतो. मात्र कर्टिसचा जन्म केवळ 21 आठवड्यातच झाला होता. सर्वसामान्य नवजात बाळांच्या तुलनेत कर्टिसचा जन्म 19 आठवडे आधी झाला आहे.
 
कर्टिसची आई मिशेल बटलर यांना 4 जुलै 2020ला प्रसव वेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसऱ्याच दिवशी दुपारी त्यांनी कर्टिस आणि सी'अस्या या जुळ्या मुलांना जन्म दिला.
 
दुर्दैवाने, एका दिवसाने सी'अस्याचा मृत्यू झाला.
 
इतक्या कमी आठवड्यात जन्माला आलेल्या बाळांच्या जगण्याची शक्यता कमीच असते. अशा परिस्थितीत जन्माला आलेल्या बाळांपैकी एक टक्क्यांहूनही कमी बाळं जगतात.
 
मात्र कर्टिसच्या बाबतीत डॉक्टर आणि त्याच्या पालकांनी धीर सोडला नाही. आयसीयूमध्ये असलेल्या कर्टिसची ते सतर्क राहून काळजी घेत होते.
 
जवळपास तीन महिन्यांनी कर्टिसचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं आणि 275 दिवस रुग्णालयात ठेवल्यानंतर त्याला सोडण्यात आलं.
 
पण सगळं काही ठीक झालं नव्हतं...अजून बरीच आव्हानं होती. डॉक्टरांना कर्टिसला तोंडाने जेवायला शिकवायचं होतं. डॉक्टरांनी त्याला तोंडाने श्वास घ्यायला आणि जेवण जेवायला शिकवलं.
 
मिशेल बटलर यांनी म्हटलं होतं, "कर्टिसला घरी घेऊन जाणं आणि माझ्या मोठ्या मुलांची त्यांच्या धाकट्या भावाशी भेट घालून देणं हा आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता.
 
कर्टिसला तीन मोठी बहीण-भावंडं आहेत.
कर्टिसला अजूनही सप्लिमेंटर ऑक्सिजन आणि एका फीडिंग ट्यूबची गरज लागते. मात्र, त्याची प्रकृती आता ठीक असल्याचं डॉक्टर सांगतात.
 
बर्मिंघमच्या अलाबामा विद्यापीठमध्ये नवजात शिशू विभागातील डॉक्टर ब्रायन सिम्स गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सशी बोलताना म्हटलं, "मी जवळपास 20 वर्षांपासून या व्यवसायात आहे, मात्र मी कधीच एखाद्या मुलाला इतकं खंबीर पाहिलं नाही. त्याच्यात काहीतरी खास होतं."
 
डॉ. सिम्स हेच कर्टिसवर उपचार करत होते.
 
याआधी सगळ्यांत जास्त प्रीमॅच्युअर बाळाचा जन्म 21 आठवडे दोन दिवसांच्या कालावधीत झाला होता. हे बाळ विस्कॉन्सिनमध्ये जन्माला आलं होतं. त्याचं नाव रिचर्ड हचिंसन होतं.
 
रिचर्डच्या आधी 34 वर्षांपर्यंत हा विक्रम ओटावामध्ये जन्माला आलेल्या एका बाळाच्या नावावर होता. त्याचा जन्म 21 आठवडे पाच दिवसांच्या कालावधीत झाला होता.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती