इम्रान खान यांचा कंटेनरवर गोळीबार, माजी पाक पंतप्रधानांच्या पायाला गोळी लागली

गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (17:33 IST)
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी मीडियाच्या वृत्तानुसार, या गोळीबारात इम्रानसह किमान 4 जण जखमी झाले आहेत. डॉन न्यूज टीव्हीने गुरुवारी वृत्त दिले की वजिराबादमधील अल्लाह हो चौकाजवळ पीटीआय अध्यक्ष इम्रान खान यांच्या कंटेनरवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात इम्रान खान थोडक्यात बचावले असले तरी त्यांना दुखापत झाली आहे. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, इम्रान खान देखील जखमी झाले असून त्यांच्या पायाला गोळी लागली आहे. त्यांच्या उजव्या पायावर पट्टी दिसते. हल्ल्यानंतर इम्रान खान यांना कंटेनरमधून बाहेर काढून बुलेट प्रूफ कारमध्ये नेण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
पीटीआयचे फारुख हबीब यांनी पक्षाचे प्रमुख इम्रान खान गोळीबारात जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. इम्रान खान यांच्या कंटेनरजवळ झालेल्या गोळीबारात पीटीआयचे नेते फैसल जावेद हेही जखमी झाले आहेत. तेहरीक-ए-इन्साफच्या (पीटीआय) निषेध मोर्चाचा गुरुवारी सातवा दिवस आहे.
 
इम्रान खान लाहोर ते इस्लामाबाद पदयात्रा काढत आहेत. या मोर्चादरम्यान ते ज्या कंटेनरमध्ये होते त्या कंटेनरजवळ गोळीबार झाला आहे. या हल्ल्यानंतर इम्रान खान यांना कंटेनरमधून काढून गाडीत बसवण्यात आले. हल्लेखोरांना पकडण्यात आले असले तरी अन्य 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
 
इम्रान खान यांच्यावरील या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात पुन्हा एकदा रक्तरंजित खेळ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यावरही एका रॅलीत आत्मघातकी हल्ला झाला होता ज्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या आणि त्यांचा मृत्यू झाला होता. सध्या त्यांचा मुलगा बिलावल भुट्टो हे पाकिस्तान सरकारमध्ये एकमेव परराष्ट्र मंत्री आहेत, ज्यांच्या विरोधात इम्रान खान यांनी आंदोलन सुरू केले आहे. 

Edited by : Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती