शिया मुस्लिमांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर बंदूकधाऱ्यांचा प्राणघातक हल्ला, 50 ठार

शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024 (20:06 IST)
पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा येथे शिया मुस्लिमांना घेऊन जाणाऱ्या एका प्रवासी वाहनावर बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला, ज्यात 50 लोक ठार झाले. यामध्ये अनेक महिलांचाही समावेश आहे. या हल्ल्यात 20 जण जखमीही झाले आहेत. अलीकडच्या काळातला हा सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे. पोलिसांनी ही माहिती दिली. 
 
खैबर पख्तूनख्वा प्रांताचा भाग असलेल्या कुर्रम जिल्ह्यात हा हल्ला झाला. या जिल्ह्यात अलीकडे शिया आणि सुन्नी मुस्लिमांमधील जातीय घटना वाढल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पाराचिनारहून पेशावरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवासी वाहनांवर गोळीबार केला. पोलीस अधिकारी अजमत अली यांनी सांगितले की, मृतांमध्ये सहा महिलांचाही समावेश आहे आणि दहा प्रवाशांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, हे भ्याड आणि अमानवी कृत्य असल्याचे म्हटले आहे. या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, असे आवाहन त्यांनी केले.

खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन खान गंडापूर यांनी शोकसंतप्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आणि पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली. ते म्हणाले, निरपराध नागरिकांना लक्ष्य करणे अत्यंत दुःखद आणि निषेधार्ह आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती