40 कोटी रुपये, खोटं सोनं आणि शस्त्रं घेऊन या विमानानं कोणासाठी उड्डाण केलं होतं?

शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (22:07 IST)
झांबियाची राजधानी लुसाका येथे 5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 40 कोटी रुपयांची रोकड, बनावट सोने आणि शस्त्रास्त्रांनी भरलेलं एक रहस्यमय विमान सापडलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
या विमानाने दोन आठवड्यांपूर्वी इजिप्तची राजधानी कैरो येथून उड्डाण केलं आणि झांबियात उतरलं. हे विमान इजिप्त किंवा झांबिया या दोघांनीही भाडेतत्त्वावर घेतल्याचं मान्य केलेलं नाही. शिवाय विमानातील सामानावर कोणीच आपला हक्क सांगितलेला नाही.
 
या विमानासंबंधित अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरीत असल्याने अफवांनी जोर धरला आहे.
 
या प्रकरणात इजिप्त किंवा झांबियातील मोठे राजकारणी किंवा उच्च लष्करी अधिकारी सामील आहेत का? अशा प्रकारचं हे पहिलंच विमान आहे की यापूर्वी अशा शेकडो विमानांनी उड्डाण केलं आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
विमानातून प्रवास करणार्‍या पाच इजिप्शियन आणि सहा झांबियन नागरिकांना सोमवारी (28 ऑगस्ट, 2023) लुसाका न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.
 
इजिप्त आणि झांबिया या दोन्ही देशांतील नागरिकांवर तस्करी आणि भ्रष्टाचाराचे आरोप होत असतात. झांबियाच्या नागरिकांवर तर हेरगिरीचेही आरोप आहेत. न्यायालयात हजर केलेल्या झांबियातील नागरिकांमध्ये राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान असलेल्या स्टेट हाऊस मधील एक अधिकारी देखील आहे.
 
या घटनेत इजिप्शियन अधिकार्‍यांचा सहभाग असल्याचा आरोप Matsda2sh वेबसाइटने केला आहे. नाहीतर ही घटना उजेडातच आली नसती.
 
बातमी देणारा पत्रकार बेपत्ता
ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काही वेळातच साध्या वेशातील इजिप्शियन सुरक्षा दलांनी पत्रकार करीम असद यांच्या घरावर छापा टाकून त्यांना अटक केली.
 
सुरुवातीला करीम असद बेपत्ता होते. त्यांना कुठे आणि का नेलं याविषयी कोणालाच माहीत नव्हतं.
 
नंतर इजिप्शियन मुक्त पत्रकारांनी झांबिया पोलिसांनी जप्त केलेली कागदपत्रे सोशल मीडियावर प्रकाशित केली.
 
पत्रकार असद यांनी जे आरोप केले होते ते या कागदपत्रांवरून खरे असल्याचं स्पष्ट होतं. या प्रकरणात तीन इजिप्शियन लष्करी कर्मचारी आणि एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा संबंध असल्याचं दिसून आलं आहे.
 
सोशल मीडियावर इतर अनेक पत्रकारांनी असद यांच्या अटकेचा तीव्र निषेध केला. यानंतर दोन दिवसांनी असद यांना सोडण्यात आलं. त्यांना नेमकी कोणत्या कारणाने अटक झाली हे अद्याप गूढ आहे.
 
इजिप्तच्या अधिकार्‍यांनी एवढंच सांगितलं की, असद यांच्या वेबसाइटवर ज्या विमानाविषयी माहिती देण्यात आली होती ते विमान खाजगी असून त्याने कैरोमधून उड्डाण केलं होतं. थोडक्यात इजिप्शियन अधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही असं त्यांचं म्हणणं आहे.
 
ते विमान लुसाकाच्या केनेथ कोंडा विमानतळावर उतरल्यानंतर सर्वांच्या नजरा झांबियाकडे लागल्या होत्या.
 
स्थानिक वृत्तानुसार, एका झांबियन माणसाकडे सोनं असलेली पिशवी होती. सुरक्षा रक्षकांनी त्याला विमानातून आलेल्या इजिप्शियन लोकांना भेटण्याची परवानगी दिली होती.
 
ही परवानगी कोणी दिली याची कोणालाही माहिती नाही. पण झांबियातील वृत्तानुसार, तिथल्या सुरक्षा रक्षकांना काही रक्कम दिल्यामुळे त्या व्यक्तीला विमानात जाण्याची परवानगी दिली असावी.
 
विमानात गेल्यानंतर त्या व्यक्तीने आपले काही सोने विमानात बसलेल्या एका व्यक्तीला विकले. त्यानंतर त्यांनी आणखी सोन्याची मागणी केली.
 
सुरक्षा पथक तपासणीसाठी विमानात येण्यापूर्वी ती व्यक्ती विकत असलेलं सोनं खरं होतं की बनावट याविषयी अजून स्पष्टपणे सांगता येत नाही.
 
अटकेने खळबळ उडाली
विमानात प्रवास करणाऱ्या इजिप्शियन नागरिकांकडून दोन लाख डॉलर्सपर्यंतची देयके स्वीकारल्याबद्दल काही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
 
शिवाय या अधिकाऱ्यांनी कोणालाही अटक न करता विमान उड्डाण करण्यास परवानगी दिली, यासाठी त्यांना पैसे दिल्याचे आरोप होत आहेत.
 
विमानात झालेल्या कथित पैशाच्या व्यवहाराचा खुलासा होताच सुरक्षा रक्षकांच्या दुसऱ्या गटाने विमानात घुसून विमानातील सर्वांना अटक केली.
 
हे सोनं खरं की खोटं?
लाखो डॉलर्सची रोकड, अनेक पिस्तुले, 126 राउंड दारूगोळा आणि 100 किलोपेक्षा जास्त सोन्याची बिस्कीटं घेऊन ते विमानात काय करत होते याचे स्पष्टीकरण संशयितांना देता आलेले नाही.
 
विशेषतः ही सोन्याची बिस्किटं एक प्रकारचं गूढ आहे.
 
तपासणीत असं आढळून आलंय की ही बिस्कीटं तांबे, निकेल, कथील आणि जस्त यांच्या मिश्रणातून बनविली गेली होती. ती दिसायला सोन्यासारखीच होती पण सोन्याची नव्हती. विमानातील इजिप्शियन लोकांना घाट्याचा सौदा करावा लागला असं दिसतं आहे.
 
ताब्यात घेतलेल्या 10 लोकांपैकी एकाची बाजू मांडणारे झांबियन वकील माकेबी झुलू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, पोलिसांनी सुरुवातीला सांगितलं की त्यांना फक्त 1.1 कोटी डॉलर्स मिळाले आहेत. ती रक्कम नंतर 70 लाख डॉलर्स आणि शेवटी 57 लाख डॉलर्स इतकी कमी करण्यात आली.
यामागे आणखीन एक कारण सांगितलं जातंय की, सुरक्षा दल येण्यापूर्वी एकूण रोख रकमेपैकी निम्मी रक्कम विमानातून गायब करण्यात आली होती. जर हे खरं असेल तर या घटनेत सहभागी असलेल्या लोकांनी विमानतळावर 50 लाखांहून अधिक डॉलर्सची रोकड लंपास केली आहे असं म्हणता येईल.
 
अटकेनंतर कैद्यांना मिळणाऱ्या असमान वागणुकीबद्दल आपण चिंतित असल्याचंही झुलू यांनी सांगितलं.
 
हे गुपित कसं उलगडणार ?
झुलू म्हणतात की, एका झांबियन व्यक्तीला आणि तीन परदेशी लोकांना तुरुंगात टाकण्यात आलं आहे. तर सहा इजिप्शियन लोकांना अतिथीगृहात ठेवण्यात आलं आहे.
 
दुसरीकडे, विमानात सोन्याची पिशवी घेऊन जाणारी व्यक्ती सर्व गुपितं उघड करेल आणि झांबिया पोलिसांना त्यांच्या तपासात मदत करेल.
 
अलीकडच्या काही दिवसांत बनावट सोनं तयार करणार्‍या कारखान्यातील काही झांबियन नागरिकांना अटक करण्यात आली होती. आता आणखीन लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.
 
इजिप्शियन थिंक टँक इजिप्त टेक्नोक्रॅट नुसार, इजिप्तमधील 300 हून अधिक कंपन्या काळा पैसा अधिकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
तर काहींच्या मते, राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतेह अल-सिसी सत्तेवर आल्यापासून देशातून पैशांची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.
 
राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांचं सरकार कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. या भीतीने इजिप्तचे काही वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि व्यापारी आपला पैसा देशाबाहेर पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत, असं काहींचं म्हणणं आहे.
 
पण हे कितपत खरं आहे हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही.
 
शेवटी हा खटला सुरू झाल्यावरच सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा आहे. पण यातून आणखी नवे प्रश्न उपस्थित होण्याची देखील शक्यता आहे
 






Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती