इक्वेडोरच्या एका वृद्ध महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या लोकांना धक्का बसला जेव्हा ती महिला शवपेटीत श्वास घेताना आढळली.
बाबाहोयो शहरातल्या एका हॉस्पिटलने 76 वर्षांच्या बेला मॉन्टेया यांना मृत घोषित केलं. त्यांना हार्ट अॅटॅक आला होता.
मृत्यू झाल्याचं समजताच बेला यांच्या नातेवाईकांनी त्यांना शवपेटीत ठेवलं आणि अंत्यसंस्कारांसाठी नेलं.
तिथे त्यांना श्रद्धांजली वाहाण्याचा कार्यक्रम झाला. बेला जवळपास पाच तास शवपेटीत होत्या.
त्यानंतर दफन करण्याआधी त्यांचे कपडे बदलायचे म्हणून शवपेटी उघडण्यात आली तर ती वृद्धा श्वास घेण्यासाठी धडपड करताना आढळली.
या प्रसंगाचं वर्णन करताना बेला यांचा मुलगा गिल्बर्ट बालबेरन म्हणतात, “आई तिचा डावा हात हलवत होती, तिचे डोळे उघडले होते आणि ती श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती.”
तिथे जमलेल्या लोकांनी काढलेल्या एका व्हीडिओत बेला शवपेटीत झोपलेल्या आहेत आणि श्वास घेण्याचा प्रयत्न करत आहेत असं दिसतंय आणि बाजूला कोणातरी अँब्युलन्स अजून का आली नाही असं ओरडताना दिसतंय.
काही मिनिटातच तिथे अत्यावश्यक सेवेचे लोक पोचले आणि त्यांनी बेला मोन्टेया यांना शवपेटीतून उचललं, स्ट्रेचरवर टाकलं आणि त्याच हॉस्पिटलमध्ये नेलं जिथे त्यांना मृत घोषित केलं होतं.
इक्वेडोरच्या माध्यमांशी बोलताना त्यांच्या मुलाने सांगितलं की बेला आयसीयूमध्ये आहे पण स्टेबल आहेत.
“आईला ऑक्सिजन लावला आहे, पण तिची तब्येत स्टेबल आहे. डॉक्टरांनी तिच्या हाताला चिमटा काढला आणि तिने त्यावर प्रतिसाद दिला. डॉक्टरांच्या मते ही चांगली गोष्ट आहे,” गिल्बर्ट म्हणाले.
इक्वेडोरच्या आरोग्य मंत्रालयाने झाल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.
गिल्बर्ट यांनी म्हटलं की, मी सकाळी 9 वाजता आईला दवाखान्यात अॅडमिट केलं होतं आणि दुपारी बाराच्या सुमारास त्यांनी मला सांगितलं की ती गेली.
ते म्हणाले की हॉस्पिटलने डेथ सर्टिफिकेटही दिलं ज्यात असं लिहिलं की कार्डिएक स्ट्रोकमुळे त्यांचा मृत्यू झाला.
बेला मॉन्टेया या पहिला व्यक्ती नाहीयेत ज्यांना अधिकृतरित्या मृत घोषित केल्यानंतर त्या पुन्हा जिवंत झाल्या.
फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेच्या न्यूयॉर्क राज्यात एक 82 वर्षांची महिला तिला मृत घोषित केल्यानंतर जिवंत आढळून आली.