चीनने युद्धासाठी तयार रहावे - जिनपिंग

सोमवार, 31 जुलै 2017 (11:13 IST)
चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या जवानांना युद्धासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. इनर मंगोलियाच्या झुरिहे स्थित देशातील सर्वात मोठे सैन्य तळ असलेल्या पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए)चा आज 90 वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या भव्य परेडची चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पाहणी केली. त्यावेळी लष्कराचा गणवेश परिधान केलेले 64 वर्षीय शी जिनपिंग यांनी एका जीपमधून जवानांसमोरून फेरी मारली. शी जिनपिंग हे सेंट्रल मिलिट्री कमीशनचे प्रमुख आहेत. त्यांचे जगातील सर्वात मोठे लष्कर पीएलएवर संपूर्ण नियंत्रण आहे. या सोहळ्याचे सरकारी टीव्ही आणि रेडिओवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.
 
माओ त्सेतुंगच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी सीपीसीने त्यांच्या राष्ट्रीय मुक्ती आंदोलनाचा पुढाकार घेतला. तेव्हा पीएलएची स्थापना 1 ऑगस्ट 1927 साली झाली होती. यावेळी केलेल्या भाषणात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी पीएलएला युद्धाची तयारी करण्याचे आणि युद्धाला लक्षात ठेवून एक एक विशिष्ट दल उभारण्यास सांगितले.
 
चीनचे लष्कर हे सरकारच्या नाही तर सीपीसीच्या नेतृत्वाखाली काम करते. या परेडमध्ये जवळपास 12 हजार जवानांनी भाग घेतला होता. 129 विमाने आणि 571 उपकरणांचे प्रदर्शन करण्यात आले. या परेडमध्ये रॅकेटसह लाइट टॅंक, ड्रोन आदी शस्त्रांचे प्रदर्शनही करण्यात आले. ही परेड अशा वेळी आयोजित करण्यात आली आहे. जेव्हा सिक्किममधील डोकालाममध्ये भारत आणि चीनच्या जवानांमध्ये गेल्या एका महिन्यापासून तणाव वाढलेला आहे. डोकलामच्या व्यतिरिक्त उत्तर कोरियाची स्थिती आणि अमेरिकेद्वारे दक्षिण कोरियामध्ये तैनात केलेल्या टर्मिनल हाय एल्टिट्यूड एरिया डिफेंस (थाड) मिसाईलमुळे देखील चिंतेत आहे.

वेबदुनिया वर वाचा