विमान हवेत असताना दोन्ही पायलट 28 मिनिटं झोपले आणि...
मंगळवार, 12 मार्च 2024 (11:00 IST)
विमान हवेत आहे आणि पायलटच झोपी गेला तर...? ही कल्पनाच किती भयानक आणि थरकाप उडवणारी वाटते. पण हे असंच खरंखुरं घडलंय.153 प्रवाशांना घेऊन उड्डाण घेतलेल्या विमानाचा मुख्य वैमानिक आणि सह-वैमानिक अशा दोघांनाही डुलकी लागली. नुसती डुलकीच नव्हे, तर तब्बल 28 मिनिटं हे दोघेही उडत्या विमानात झोपले.
ही घटना इंडोनेशियात घडली असून अधिकाऱ्यांनी स्थानिक एअरलाइन बॅटिक एअरची चौकशी सुरू केली आहे.
ही घटना जानेवारी महिन्यात घडली असून या दोन्ही वैमानिकांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे.
25 जानेवारी 2024 रोजी सुलावेसीहून राजधानी जकार्ताला जाणाऱ्या या विमानातील वैमानिकांच्या निष्काळजीपणामुळे विमान आकाशात आपला मार्ग चुकले.
नेमकं काय घडलं ?
इंडोनेशियाच्या वाहतूक मंत्रालयाच्या अहवालानुसार, विमानाने टेकऑफ केल्यानंतर मुख्य वैमानिकाला काही वेळासाठी आराम करायचा होता. त्यामुळे त्याने सह-वैमानिकाला सांगून आराम करण्यासाठी डोळे बंद केले.
दुसरीकडे सह-वैमानिकाचीही आदल्या रात्री झोप झाली नव्हती. कारण त्याच्या पत्नीने महिनाभरापूर्वीच जुळ्या मुलांना जन्म दिलाय. या नवजात बाळांची काळजी घेण्यात त्याने मदत केल्याने तोही थकला आणि त्याचाही चुकून डोळा लागला.
त्याच दरम्यान जकार्तामधील एअर ट्रॅफिक कंट्रोलने बॅटिक एअर A3210 विमानामधील वैमानिकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळला नाही. जवळपास 28 मिनिटं ते वैमानिकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते.
एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटरमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर 28 मिनिटांनंतर मुख्य वैमानिकाला जाग आली आणि त्याने पाहिलं की सह वैमानिक झोपलेला आहे. हे दृश्य पाहून त्याला धक्काच बसला.
मुख्य वैमानिकाने तात्काळ सह वैमानिकाला उठवलं कारण विमान आपला मुख्य मार्ग चुकले होते. यानंतर दोघांनी एअर ट्रॅफिक कंट्रोल सेंटरशी संपर्क साधून विमानाची दिशा बदलली आणि ठरलेल्या मार्गाने विमानाचा प्रवास सुरु केला.
उड्डाणपूर्व वैद्यकीय चाचण्यांच्या निकालांनुसार, दोन्ही वैमानिक उड्डाणासाठी तंदुरुस्त होते. त्यांचा रक्तदाब आणि हृदय गती सामान्य होती. शिवाय त्यांनी कोणत्याही अंमली पदार्थांचे सेवन केले नव्हते.
एव्हिएशन तज्ज्ञ एल्विन लाइ यांनी बीबीसी इंडोनेशियाशी बोलताना सांगितलं की, वैमानिकांना उड्डाण करण्यापूर्वी विश्रांतीची संधी मिळाली होती. मात्र ही विश्रांती पुरेशी होती का? हे तपासण्यात अपयश आले आहे.
अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल बॅटिक एअरला फटकारले असून इंडोनेशियन हवाई वाहतूक प्रमुख एम क्रिस्टी अंडा मुर्नी यांनी सांगितलं आहे की, बॅटिक एअरने आपल्या क्रूच्या विश्रांतीच्या वेळेकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. यावर बॅटिक एअरने म्हटलंय की, ते पुरेशा विश्रांती धोरणासाठी आणि सर्व सुरक्षा शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी वचनबद्ध आहेत. 2019 मध्ये याच एअरलाइनचा वैमानिक बेशुद्ध झाल्यानंतर, विमानाला आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते.