आयफोनची निर्मिती करणारी अॅपल ही कंपनी भारतात आयफोन्सची निर्मिती करणार हे आता अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलं आहे. भारतात बंगळुरूमध्ये आयफोन्सची निर्मिती होईल.कर्नाटकचे माहिती-तंत्रज्ञान मंत्री प्रियांक खार्गे यांनी अॅपलबरोबरच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. अॅपलकडून प्रत्यक्ष आयफोन निर्मितीला कधी सुरूवात होईल, याविषयी प्रियांक खार्गे यांनी काहीही स्पष्ट केलेलं नसलं तरी भारतात बनलेला आयफोन बाजारपेठेत येण्यासाठी जून महिन्यापर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. बंगळुरूच्या पिन्या परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीत आयफोनची निर्मिती होणार आहे. तैवानच्या विस्ट्रॉन या कंपनीमार्फत इथे आयफोनची निर्मिती होणार आहे. चीन आणि तैवाननंतर आयफोनची निर्मिती करणारा भारत हा तिसरा देश होणार आहे.