टेक्सासमध्ये शाळेत अंदाधुंद गोळीबार; 21 मृत्युमुखी

बुधवार, 25 मे 2022 (08:32 IST)
अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये एका शाळेत अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबारात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासमधल्या रॉब एलिमेंट्री स्कूल या ठिकाणी हा प्रकार घडला आहे.
 
रॉब एलिमेंटरी स्कूल हे टेक्सास राज्यात सॅन अँटोनिया शहरापासून 133 किलोमीटर अंतरावरील युवाल्डी येथे आहे. ही प्राथमिक शाळा असून इथे 5 ते 11 वयोगटातील मुलं शिक्षण घेतात.
 
हल्लेखोर 18 वर्षांचा होता. त्याचं नाव सॅल्व्हाडोर रामोस असं होतं असं टेक्सासच्या गव्हर्नरांनी सांगितलं. पोलिसांनी केलेल्या प्रतिहल्ल्यात तो मारला गेला.
 
या हल्ल्यात जीव गमावलेल्यांमध्ये बहुतांश दुसरी, तिसरी आणि चौथ्या इयत्तेतली मुलं आहेत. 7 ते 10 वयोगटातली ही मुलं असल्याचं सांगितलं जात आहे. 21 पैकी 18 मुलं होती तर 3 प्रौढांचाही मृतांमध्ये समावेश आहे.
 
हे भरुन न येणारं नुकसान- जो बायडन
स्वत:चं मूल गमावणं म्हणजे तुमचा अर्धा जीव गमावल्यासारखंच आहे. तुम्हाला किती अतीव दु:ख झालं असेल हे मी समजू शकतो. हे नुकसान कधीही भरून येऊ शकत नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे.
 
बायडन क्वाड संमेलनासाठी जपान दौऱ्यावर गेले होते. व्हाईट हाऊसमध्ये पोहोचताच त्यांनी आपली पत्नी जिल हिच्यासह या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला.
 
ते पुढे म्हणाले, "देवाच्या नावावर बंदुकांसाठी लॉबीइंग करणं आपण थांबवणार आहोत? मला याचा त्रास होतो आणि मी थकलोय. या घटनेचा आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही असं मला सांगू नका. 18 वर्षीय मुलगा दुकानात जातो, बंदूक खरेदी करतो हेच मुळात चुकीचं आहे. अशा प्रकारच्या दुर्देवी गोळीबाराच्या घटना जगात अन्यत्र क्वचितच घडतात.
 
बायडन म्हणाले, "शस्त्रास्त्रांसदर्भातील नव्या कायद्याच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या लोकांची आता वेळ आली आहे. आम्ही हे विसरणार नाही, आम्ही बरंच काही करू शकतो, आम्हाला आता करुन दाखवावंच लागेल हे त्यांना सांगण्याची वेळ आलीय."
 
नवी गन पॉलिसी हवी- कमला हॅरिस
या हल्ल्यानंतर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी अशा घटना भविष्यात पुन्हा घडू नयेत यासाठी नवी गन पॉलिसी आणण्याची मागणी केली आहे. वॉशिंग्टन येथिल कार्यक्रमात कमला हॅरिस म्हणाल्या, "दरवेळेस अशा घटना होतात आणि आपल्याला वेदना होतात. तरीही या घटना घडत आहेत. आता बास झालं. एक राष्ट्र म्हणून आपल्यामध्ये निर्णय घेण्याचं साहस असलं पाहिजे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी एक नवी गन पॉलिसी आणली पाहिजे."
 
आपल्या राष्ट्राला गन लॉबीमुळे अर्धांगवायू झालाय- बराक ओबामा
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
 
ते म्हणाले, "देशभरात पालक आपल्या मुलांना अंगाई गाऊन, गोष्टी वाचून दाखवून झोपवत असतील पण त्यांच्या मनात आपल्या मुलांनाही उद्या शाळेत, दुकानांमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारच्या घटनेला सामोरं जावं लागेल अशी भीती असेल."
 
बराक आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी दुर्घटनेत बळी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत.
 
"सँडी हूक दुर्घटनेनंतर 10 वर्षांनी, बफेलो येथिल घटनेनंतर 10 दिवसांनी आपलं राष्ट्र भीतीने नाही तर गन लॉबीमुळे आणि त्याविरोधात पावलं न उचलणाऱ्या राजकीय पक्षामुळे अर्धांगवायू झाल्यासारखं झालंय", असं ते म्हणतात.
 
तडफडणाऱ्या लोकांच्या आक्रोशाचं राष्ट्र- हिलरी क्लिंटन
टेक्सास येथिल घटनेवर राष्ट्राध्यक्षपदाच्या माजी उमेदवार हिलरी क्लिंटन यांनीही मत व्यक्त केलं आहे. आपण तडफडणाऱ्या लोकांच्या आक्रोशाचं राष्ट्र बनत चाललो आहोत असं त्यांनी ट्वीट केलंय.
 
बंदुक नियंत्रणाबद्दल त्या म्हणतात, "बंदुकांद्वारे आपल्या मुलांना ठार करणाऱ्या हिंसाचाराला थांबवण्यासाठी आपल्याला फक्त लोकप्रतिनिधींची गरज आहे."
Photo: ANI

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती