भारताशी युद्धाची खुमखुमी जिरविण्याची भयंकर उबळ पाकिस्तानला आली आहे. उभय देशात तणाव वाढल्यानंतर आता पाकिस्तानने आपल्या सैनिकांच्या सुट्या रद्द करून त्यांना कामावर बोलविले आहे.
लष्कराला अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला असून हवाई दलही दक्ष झाले आहे, असे वृत्त द न्यूजने दिले आहे. याशिवाय पूर्व सीमेवर तणाव वाढल्यास वायव्य सरहद्द प्रांत व ग्रामीण भागात तैनात केलेले सैन्य हलविण्याची तयारीही करण्यात आली आहे.
लाहोरनजिकच्या सीमेजवळ पाकिस्तानने सैनिकांच्या अनेक ब्रिगेड हलविल्या आहेत. याशिवाय नियंत्रण रेषा व आंतरराष्ट्रीय सीमेनजिकच्या महत्त्वाच्या चौक्यांजवळ सैन्य वाढविण्यात आले आहे. दहावी व अकरावी ब्रिगेड राजौरी व पुंछ भागात तैनात करण्यात आली आहे.
तिकडे भारतानेही पाकिस्तानी लष्करी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या सैनिकांनाही अतिदक्षतेचा इशारा दिला आहे, तसेच सीमा व नियंत्रण रेषेनजिक गस्त वाढवली आहे.