'स्‍कायफॉल'ने पाडला पैशांचा पाऊस

WD
मागील पन्नास वर्षांपासून बाँड पटांबाबत आंतरराष्ट्रीय जनमानसात असलेले आकर्षण आज देखील तितकेच कायम आहे. 1 नोव्हेंबर रोजी रिलीज झालेल्या 'स्कायफॉल' या बाँडपटाने ब्रिटनमध्ये ओपनिंगलाच प्रचंड कमाई करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अवघ्या दोन दिवसांत स्कायफॉलने 3 कोटी 7 लाख पौंडांची कमाई केली असून त्याने हॅरी पॉटर अँड डेथली हॅलोजच्या भाग-2 चा विक्रम मोडीत काढला आहे. बाँडच्या या अनोख्या विक्रमामुळे पाश्चात्य सिनेसमीक्षकांच्या भुवया उंचावला आहेत.

बाँडपटांना पन्नास वर्षे पूर्ण झाली असताना ब्रिटनमधील लोकांनी नव्या सिनेमाला देखील अक्षरश. डोक्यावर घेतले आहे. या यशाने आम्ही पुरते भारावून गेलो आहोत, असे स्कायफॉलचे निर्माते मायकेल जी. विल्सन आणि बार्बरा ब्रोकली यांनी सांगितले. नव्या बाँडपटाचे वितरक आणि सोनी पिक्चरचे जेफ ब्लेक यांच्या मते मागील पन्नास वर्षांपासून जेम्स बाँडने एक नवा ब्रँड तयार केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या लक्षणीय यशाबाबत आम्हाला तरी फारसे आश्यर्च वाटत नाही. स्कायफॉलमधील हायटेक स्टंटबाजी या चित्रपटाची जमेची बाजू ठरली असून रोमान्सची कमतरताही त्यामुळे भरून निघते, असे मत बहुतेक समीक्षकांनी मांडले आहे. आगामी दिवसांमध्येही हा चित्रपट मोठी आर्थिक उड्डाणे घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा