1962 मधील तिसरी लोकसभा निवडणूक मुंदडा कांडमुळे गाजली. पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जावई, खासदार फिरोज गांधी यांनी मुंदडाकांडचा पर्दाफाश केला. यामुळे नेहरू सरकारमधील अर्थमंत्री टी. टी. कृष्णम्माचारी यांना राजीनामा द्यावा लागला. याच कारणामुळे पंडित नेहरू आणि फिरोज गांधी यांच्यात दुरावा निर्माण झाला. अर्थात ही घटना दुसर्या लोकसभा निवडणुकीनंतर म्हणजे 1957-58च्या दरम्यानची आहे नंतर 1960 मध्ये फिरोज गांधी यांचे हृदविकाराने निधन झाले.
तिसर्या निवडणुकीत पंडित नेहरू यांच्यावर घराणेशाहीचा आरोप झाला. कारण त्यांनी 1959 मध्ये कन्या इंदिरा गांधी यांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते. इंदिरा गांधी यांच्या दबावाखालीच केरळमध्ये निवडून आलेले कम्युनिस्ट सरकार बरखास्त केले गेले. या ठिकाणी नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखालील कम्युनिस्ट पार्टीचे सरकार सत्तेवर होते. या पार्श्वभूमीवर 1962 मध्ये लोकसभेची तिसरी निवडणूक झाली. 494 जागांसाठी 11 कोटी 99 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 55.42 इतकी होती. या निवडणुकीसाठी सरकारी तिजोरीतून एकूण 8 कोटी 80 लाख रुपये खर्च झाला. निवडणुकीच्या मैदानात एकूण 1985 उमेदवार उतरले होते, त्यापैकी 856 जणांची अनामत रक्कम जप्त झाली. एकूण 66 महिलांनी ही निवडणूक लढविली, त्यापैकी 31 महिला लोकसभेवर पोहोचल्या. 19 महिला उमेदवारांनी अनामत रक्कम गमावली. काँग्रेस पक्षाने 488 जागा लढविल्या होत्या, तपैकी 361 जागांवर त्यांना विजय प्राप्त झाला. एकूण मिळालेल्या मतांची टक्केवारी 64.72 इतकी होती. तीन उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. दुसर्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यावेळी देखील भारतीय कमुनिस्ट पार्टी दुसर्या क्रमांकावर राहिली. त्यांनी 137 जागा लढविल्या होत्या, त्यापैकी 29 जागांवर त्यांना विजय मिळाला. भाकपला 9.94 टक्के मते मिळाली. त्यांच्या 26 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. तिसर्या क्रमांकावर स्वतंत्र पार्टी होती. एकूण 18 जागांवर त्यांना विजयं मिळाला. मिळालेल्या मतांची टक्केवारी 7.89 इतकी होती. स्वतंत्र पार्टीने एकूण 173 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते, त्यापैकी 75 जणांची अनामत रक्कम जप्त झाली. जनसंघाच्या जागांमध्ये 1957च्या तुलनेत तीनने वाढ झाली. त्यांनी 196 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 14 जागांवर विजय मिळाला. 114 जणांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत थोडी वाढ झाल्याचे दिसून आले. प्रजा सोशालिस्ट पार्टीच्या खात्यात 12 आणि सोशालिस्ट पार्टीच्या खात्यात 6 जागा गेल्या. पीएसपीला 6.81 टक्के तर सोशालिस्ट पार्टीला 2.69 टक्के मते मिळाली होती. पीएसपीचे 168 आणि सोशालिस्ट पार्टीचे 107 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. दोन्ही पक्षांकडून अनामत रक्कम गमावलेल्या उमेदवारांची संख्या अनुक्रमे 69 आणि 75 इतकी होती. प्रादेशिक पक्षांनी 28 आणि अन्य मान्यताप्राप्त पक्षांनी 6 जागांवर विजय मिळविला. एकूण 479 अपक्ष उमेदवार मैदानात होते. त्यापैकी 20 जण निवडून लोकसभेवर पोहोचले तर 378 जणांची अनामत रक्कम जप्त झाली.
पहिल्या दोन निवडणुकीवर उच्च मध्यमवर्गीयांचा वरचष्मा होता. तिसर्या निवडणुकीत मात्र शेतकरी आणि ग्रामीण पार्श्वभूमी असलेले खासदार लोकसभेवर निवडून गेले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची सरशी झाली असली तरी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या समाजवादाला धक्का बसला. तिसर्या लोकसभेची स्थापना जून महिन्यात झाली. त्यानंतर तीन महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबरमध्ये भारत आणि चीन यांच्यात युध्द झाले. मुंदडाकांडमुळे राजीनामा दिलेले तेव्हाचे अर्थमंत्री टी.टी. कृष्णम्माचारी 1962च्या निवडणुकीत पुन्हा विजयी झाले. पंडित नेहरूंच्या विरुद्ध रिंगणात उतरलेले समाजवादी नेते डॉ. लोहिया पराभूत झाले. नेहरू यांना एकूण 1 लाख 18 हजार 931 मते मिळाली, तर डॉ. लोहिया यांना 54 हजार 360 मते प्राप्त झाली होती. आधुनिकता, लोकशाही आणि समाजवादाचा राग आळवणारे पंतप्रधान पंडित नेहरू यांनी आपल्या मुलीला काँग्रेस अध्यक्ष बनविले. मागील दोन निवडणुकीप्रमाणे याहीवेळी अनेक दिग्गज लोकसभेवर निवडून गेले. यामध्ये इंद्रजित गुप्त किशन पटनायक, भागवत झा, तारकेश्वरी यांच्यासह अनेकांचा समावेश होता. पुढे इंद्रजित गुप्त लागोपाठ 10 वेळा लोकसभा निवडणूक जिंकण्याचा विक्रम केला. किशन पटनायिक हे तिसर्या लोकसभेत पोहोचलेले सर्वात कमी वयाचे सदस्य होते. दोन निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीत देखील अनेक दिग्गजांचा पराभव झाला. यामद्ये डॉ. राम मनोहर लोहिया, श्रीपाद अमृत डांगे, अटलबिहारी वाजपेयी, जे. बी. कृपलानी, काँग्रेसचे नेते ललित नारायण मिश्र, बिहारचे मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांचा समावेश होता.