सोलापूर लोकसभेचा इतिहास

WD
आगामी मार्च-एप्रीलमध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन गॅझेट क्रमांक-42, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास लिहिताना अनेक पाने पुरणार नाहीत, पण हा अल्पसा प्रपंच इथे करीत आहोत, आपला भारत देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर देशामध्ये सर्व प्रथम 1952 साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यावेळेला आपला सोलापूर, नांदेड, पुणे जिल्ह्यातील काही भाग व उस्मानाबाद अशा चार जिल्ह्यांचा मतदारसंघ होता. हीच प्रथा 1957 सालीही होती त्यानंतर 1 मे 1960 ला भाषावार प्रांतरचना अंतर्गत महाराष्ट्र हे स्वतंत्रराज्य निर्माण झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 1962 ला तिसरी लोकसभा निवडणूक झाली. मात्र या निवडणुका झाल्या त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघ व पंढरपूर मतदारसंघ असे दोन मतदारसंघ स्वंतत्र झाले पैकी सोलापूर मतदारसंघ सर्वप्रथम 1962 ला स्वतंत्र झाला. या निवडणुकीत सोलापूरचे पहिले खासदार होण्याचा बहुमान सोलापूरचेच मडेप्पा बंडप्पा ऊर्फ अप्पासाहेब काडादी यांना मिळाला. त्यानंतर मात्र 1967 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी मात्र प्रथमच स्थानिक उमेदवार न देता मुंबईचे उद्योगपती असलेले सूरजरतन फत्तेचंद दमाणी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आणि दमाणी प्रचंड मताने निवडून आले. त्यानंतर मात्र देशाच्या राजकारणात अनेक उलाढाली झाल्या.

प्रामुख्याने काँग्रेसची सत्ता असल्याने तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी विकासकामाअंतर्गत अनेक योजना राबविल्या. त्यामध्ये प्रामुख्याने संस्थानिकांचे तनखे रद्द, बँक राष्ट्रियीकरण, गरिबी हटाव, कुटुंबनिोजन वगैरे. काँग्रेसपक्षातीलच एक गट इंदिराजींच्या या कार्यपद्धतीवर नाराज होऊन विरोधात गेला व पक्षात सिंडीकेट व इंडिकेट असे दोन गट पडले. हे सर्व घडत असताना 1970 साल उजाडले. विरोधकांच्या आव्हानामुळे इंदिराजींनी 1971 साली लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या व नियमाप्रमाणे 1972 ला लोकसभेच्या निवडणुका होण्याऐवजी 1971 ला मध्यावधी निवडणुका जाहीर झाल्या. ही 1971 ची सोलापूर लोकसभेची निवडणूक अतिशय अटीतटीची व चुरशीची झाली कारण यावेळेला काँग्रेसचे उमेदवार सूरजरतन दमाणी हे अतिशय धनाढय़ व मिल मालक होते. त्यांच्या विरोधात दैनिक संचारचे तत्कालीन संपादक रंगाअण्णा वैद्य यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले. ही 1971 ची लोकसभा निवडणूक अतिश रोमहर्षक ठरली. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. रंगाअण्णांना सोलापूर मतदारसंघात ग्रामीण व शहरी भागातून सर्व थरातून भरघोस पाठिंबा मिळत होता. मात्र दमाणींचा यावेळी निसटता विजय झाला व लोकनायक रंगाअण्णा अल्पमताने पराभूत झाले. मात्र रंगाअण्णांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर आला आणि एक रोमहर्षक इतिहास निर्माण झाला.

WD
त्यानंतर मात्र 1977ची लोकसभा निवडणूक ही वेगळ्या कारणाने गाजली. कारण देशांतर्गत आणीबाणीमुळे तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींवर संपूर्ण विरोधीपक्ष नाराज होऊन लोकनाक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाची स्थापना होऊन संपूर्ण देशात जनता लाट तार झाली आणि त्याचा परिणाम म्हणून जनता पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा माजी खासदार अप्पासाहेब काडादी यांनी दमाणी यांच्यापुढे आव्हान उभे केले. मात्र शेवटच्या फेरीत अगदी थोड्या मतांनी दमाणी यांच्या विजय होऊन हॅट्ट्रिक झाली. त्यानंतर देशामध्ये मुरारजी देसाई पंतप्रधान झाले. पण हे सरकार जास्त काळ टिकले नाही. लगेच 1980 साली मध्यवधी निवडणूक जाहीर झाली. त्यावेळेला इंदिरा काँग्रेसतर्फे सोलापूरचे स्थानिक उमेदवार गंगाधरपंत कुचन हे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर मात्र एखादा दुसरा अपवाद वगळता सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचीच सरशी झाली.

त्यानंतर 1985च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सोलापुरातीलच्या धर्मण्णा सादूल हे निवडून आले व नंतर राजीव गांधींच्या निधनामुळे 1991 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव होऊन भारतीय जनता पक्षाचे लिंगराज वल्याळ निवडून आले. त्यानंतर 1995 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे निवडून आले. त्यानंतर मात्र देशपातळीवर काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर 1999 साली झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आनंदराव देवकते, राष्ट्रवादीचे अरळप्पा ऊर्फ मुकेश अब्दुलपूरकर व भारतीय जनता पक्षाचे प्रतापसिंह मोहिते-पाटील असा तिरंगी सामना झाला आणि त्यामध्ये भा.ज.प. चे प्रतापसिंह मोहिते पाटील निवडून आले. त्यानंतर पाच वर्षानी झालेल्या 2004 सालच्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्ंमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वलाताई शिंदे या काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून भा.ज.प.चे सुभाष देशमुख निवडून आले. त्यानंतर 5 वर्षानी 2009 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी भा.ज.प.चे शरद बनसोडे यांचा प्रचंड मतांनी पराभव केला आणि ते केंद्रात मंत्री झाले. सध्या ते भारताचे गृहमंत्री आहेत.

इतिहासाचे पृथक्करण केले असता सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये 1962 व 1967 या दोन निवडणुका सोडल्यानंतर 1971 च्या निवडणुकीमध्ये रंगाअण्णा वैद्य यांच्या रूपाने अभिव्यक्ती स्वातंत्रची जागरुकता निर्माण झाली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

वेबदुनिया वर वाचा