लग्न आणि मंगलाष्टक विधी -
गौरीहार पूजल्यावर वधूचा मामा वधूला लग्नासाठी आणायला जातो. बोहल्यावर दोन पाट अमोर समोर पूर्व पश्चिम ठेवलेले असतात. पाटावर तांदुळाच्या राशी काढून त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढतात. याला लग्नवेदी म्हणतात.
लग्नवेदीवर एका पाटावर वर हातात मोत्यांच्या नारळ घेऊन फुलांचा हार घेऊन उभा राहतो त्याच्या पाठीमागे त्याचा मामा उभा राहतो. आणि समोरच्या पाटावर वधू हातात मोत्याचे नारळ आणि फुलांचा हार घेऊन उभी राहते. मुलीच्या पाठी तिचा मामा उभा राहतो . तसेच वधू आणि वराच्या बहिणी ज्यांना करवली म्हणतात वधूच्या आणि वराच्या पाठी मागे एक बहीण हातात दिव्याचे ताट घेऊन उभी असते. ताटामध्ये कणकेने बनवलेले दोन मोठे दिवे तेवत ठेवलेले असतात.
दिव्याच्या वाती कापसाची नसून काळ्या कापडाच्या तुकड्याला पीळ देऊन बनवतात तिला काडवात म्हणतात. या काडवाती तेलात भिजवून ठेवतात. तसेच एक अजून बहीण हातात हळद आणि कुंकवाचे बोटे काढलेल्या पाण्याचा तांब्या घेऊन त्यात आंब्याची पाने लावून त्यावर नारळ ठेऊन घेऊन उभी राहते.
वर आणि वधूच्या मधोमध कापडी वस्त्राला आडवे धरून अंतरपाट धरला जातो.हा अंतरपाट दोन्ही बाजूला उभे भटजी धरतात या अंतरपाटावर कुंकवाने दोन्ही बाजूला स्वस्तिक काढले जाते. लग्नासाठी जमलेल्यांना रंग-बेरंगी तांदुळाच्या किंवा ज्वारीच्याअक्षता वाटप केले जाते. भटजी मंगलाष्टक म्हणाल्या सुरुवात करतात. प्रत्येक मंगलाष्टक संपल्यावर जमलेले सर्व आप्तेष्टअक्षता वर आणि वधूवर आशीर्वादाच्या रूपाने उधळतात.
मंगलाष्टक-
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
त्या नंतर अंतरपाट काढतात आणि वधू आणि वर हातातील पुष्पहार एकमेकांना घालतात. आणि जमलेले सर्व जण टाळ्यांच्या गजराने त्यांचे अभिवादन करतात. वधू आणि वर तुपात भिजवलेली अक्षता एकमेकांच्या डोक्यावर टाकतात.
आणि वधू, वराच्या मागे उभ्या असलेल्या करवल्या दिव्याने दोघांचे औक्षण करतात आणि ताब्यातील पाणी वर आणि वधूच्या डोळ्यांना लावतात. वधू आणि वराकडील बायका आलेल्या सर्व लोकांना पेढे देऊन तोंड गोड करतात आणि बायकांना हळदी कुंकू लावून पुष्प देऊन त्यांचे स्वागत करतात. अशा प्रकारे लग्न आणि मंगलाष्टक होतात.