तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतींच्या रोपांची विष्णू किंवा विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्ण यांच्याशी विवाह. भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा त्यांचे व तुळशीचे लग्न लावतात. भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे व तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.
घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची किंवा कुंडीची रंगरंगोटी करतात व तिला छान सजवितात. स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा केली जाते. त्यानंतर त्यांना हळद तेल लावून मंगलस्नान घालण्यात येतं. तुळशीला नवीन वस्त्र पांघरले जातात. दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवतात. मुहूर्तानुसार बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करण्याची पद्धत असते.