(अंतरा) गाईचे वाचवा प्राण । अबलासी द्या जिवदान । राखा वडिलांचा मान । चला उठा उठा तरुण हो ! वेळ ही का दवडिता ? ॥३॥ (अंतरा) आळवा प्रभूसी ध्यानी । मागा यश या संग्रामी । घ्या उडी उधळवा उर्मी । तुकड्याचि आस ही पुरी, होउ द्या का तोडता ? ॥४॥
२४
किती बघशि अंत आमुचा ? श्रीहरी ! ये धावुनी । सुख नाहि जगी तुजविना, भाव हा घे पाहुनी ॥धृ॥
(अंतरा) जग नाशिवंत हे चळले । मेंढरावाणि खळबळले । हे जया ज्ञानिया कळले । नच राहि जरा तुजबिना, दया मनि घे निरखुनी ॥१॥ (अंतरा) हा विषय विषासम भासे । लागलो तुझ्या अम्हि कासे । नच त्रास कुणाचा सोसे । या अशा लेकरा करी, सख्या घे ये उचलुनी ॥२॥ (अंतरा) कोवळे मनाचे आम्ही । संस्कारजन्य अति कामी । लागलो अता तव नामी । तुकड्यादास भेट दे हरी ! चित्त झुरते गाउनी ॥३॥
२५
प्रभु ! बोल बोल अनमोल, प्रेम तू का सोडला ? । विपरीत असा हा काळ, भारता का ओढला ? ॥धृ॥
(अंतरा) शेतीत पिके ना होती । ऋतु काळवेळ ना बघती । दुःखद विघ्ने कोसळती । हे सर्व दिसुनिया असे, बघवते हे का तुला ? ॥१॥
(अंतरा) अन्नान्न भरतभू झाली । कांचने होति ओतियली । ती वेळ कुठे रे ! गेली ? । रुसलासि अम्हावरि काय, कृपा कर का ओढला ? ॥२॥ (अंतरा) अति शूर धुरंधर होते । प्राणापरि जपसी त्याते । ते भक्त तुझे का होते ? । लेकरा विसरुनी अता, मार्ग हा का मोडला ? ॥३॥
(अंतरा) देवळे स्मशाने झाली । अबलांची इभ्रत गेली । दास्यात भरतभू पडली । तुज कसे शोभते हरी ! ब्रीद-पथ का सोडला ? ॥४॥
(अंतरा) गर्जती पुराणि ज्ञाते । राखील प्रभू आम्हाते । किती वेळ ? सांग तरि बा ! ते । तुकड्याची हाक घे आता, प्रेम अधि का जोडला ? ॥५॥
२६
क्षण एक धरीना धीर, कसे मन हे बावरे । करु काय सुचेना काहि, जरा तरि ना आवरे ॥धृ॥
(अंतरा) जरि योग-याग बहु केले । मन-पवन समाधी नेले । वनि निर्जनि घर बांधियले । तरि व्यर्थ तयांची कास, खास विषयी हावरे ॥१॥ (अंतरा) जगि तीर्थधामही नाना । दरिकंदरि ऋषिच्या स्थाना । जी मोहविती शरिरांना । ना राहि जरा टिकुनिया, कुसंगाने पाझरे ॥२॥
(अंतरा) सत् संग सुगम यासाठी । व्हावया वृत्ति उफराटी । परि बोध पाहिजे गाठी । विश्वास असा तुकड्यास,अनुभवा दे भाव रे ! ॥४॥
२७
हरिभजनाची नुरली जागा, स्वतंत्रतेच्या परी । उलटली परवशता ही पुरी ॥ गुलामगिरिच्या कर्कशा बेड्या, पडल्या पायी करी । धडकले परधर्माचे अरी ॥ तन-मन-धन हे नेति हरुनिया, हसवुनि अस्वलिपरी । लावती आग घरीचे घरी । (अंतरा) हिंदुचा नाश व्हावया चिंतिती मनी । अति दुर्बल केला देश चहुबाजुनी । वाटतो धाक हा गिळतिल कोण्या क्षणी । रक्षणकर्ता कोणिच नुरला, या पुढती कुणितरी । सखा हा भारत चिंता करी ॥१॥
गजांत-लक्ष्मी डुलली जेथे, सौभाग्याच्या गुणे । न होते काहि कुणाला उणे । सौख्य नांदले अखंड जेथे, रामराज्य दणदणे । खेळले सैनिक निर्भयपणे ॥ तपोबलाच्या आत्मिय ऊर्मी, भक्त-उरी सणसणे । भोगिले वैभव भारत-भुने । (अंतरा) उतरला राहु आणि केतू हा अवकली । अन्नान्नदशा ही भारतभू पावली । ही परवशतेच्या भरी दुःखि जाहली । असा हिंदुनो ! वीर तुम्ही, कुणि गर्जा या अवसरी । सखा हा भारत चिंता करी ॥२॥
काय वाचता पुराण पोथ्या, राम-रावणी कथा । त्यातुनी काय काय ऎकता ? ॥ गेला रावण निघुनी आता, सोय काय चिंतिता ? । दुसरा झाला हा मागुता ॥ सुर-असुरांचा झगडा नेहमी, चालतसे भोवता । रहावे सावध अपुल्या हिता । (अंतरा) सांगतो राम हा उपासकांच्या प्रती । व्हा उभे धर्मरक्षणा, त्यजा दुर्मती । यश येइल तेव्हा हिंदूंच्या भोवती । करा करा तातडी मिळोनी, वेळ नसे ही बरी । सखा हा भारत चिंता करी ॥३॥
मारुतिच्या अंकिल्या मुलांनो ! आर्याच्या बंधुनो ! । सिंधुच्या मर्यादित बिंदुनो ! ॥ कंसारीच्या गोपाळांनो ! नंद-नंद-कंदुनो ! । लाडक्या देवांच्या हिंदुनो ! ॥ शूर वीर श्रीछत्रपती शिवरायाच्या बिंदुनो ! । उभी व्हा तरुणांनो ! बंधुनो ! ॥ (अंतरा) हा धर्म-ध्वज घ्या करी, जपा मिळुनिया । कमवाच आपुला हक्क हक्क म्हणुनिया । आळवा अंतरी देवदेवतासि या । तुकड्यादास म्हणे तोडा ही, गळफासाची सुरी । सखा हा भारत चिंता करी ॥४॥
२८
बोल बोल बा ! बोल भारता ! चिंतातुर का असा ? हाल-बेहाल तुझी लालसा ॥धृ॥
स्वातंत्र्याच्या उन्नत शिखरी निर्भय सेना तुझी । सोडुनी आज दशा का अशी ? ॥ वेदांताची उंच गर्जना, भार ऋषींचे तसे । सोडुनी वन-वन का फिरतसे ? ॥ भारतमय श्रृंगार तुझा तो काय कुठे लोपला ? बावरा फिरशी का एकला ? ॥ (अंतरा) तव मुकुत भक्त-हिरकणे विखुरले कसे ? । तव हृदय-कवच पंडीतहि जागी नसे । कर-कमालीची तरवार वीर ना दिसे । धैर्य-तेज-विजयता लीपलो, प्रसंग दुर्दैवसा । सांग बा ! प्राप्त जाहला कसा ? ॥१॥
तुझ्या कीर्तीची ध्वजा पहाता आयुष्यही ना पुरे । गंज-अधिगंज पुराणे भरे ॥ रत्नजडित किति कनक रुप्याचे जडाव तव साजिरे । गजावर लक्ष्मि भरार्या करे ॥ सदा सुखी आनंदित जनता, वीर वृध्द-लेकुरे । खेळती सिंह जसे वनि फिरे ॥ (अंतरा) श्रीमंत-संत आणि राव-रंक एकसे । नच भेद कुणाला तयी कधी गमतसे । अधिकारान्वघि ते आरुढले, समरसे । अघोर संकट दिसे अचानक, जशी उतरली नशा । नसातुनि रंग दिसे भलतिसा ॥२॥
कष्ट करीता ढोरासम ही पिके न शेती जरा । द्रव्य व्यसनात होतसे चुरा ॥ विषयांधासम फिरती तरुणहि, तरुणी दुसर्या घरा । शांति ना मना तयांच्या जरा ॥ ऋतु काळ ना बघे, कधी जल, उष्ण वाढती मधे । वाहती वेळ-अवेळी नदे ॥ (अंतरा) काय ही दुर्दशा आली ग्रहणे जशी । निर्जली निर्फली दुर्बल झाली कृषी । ती गजांतलक्ष्मी पळे, गमे परकिसी । चिन्ह दिसेना बरे, ऊठ तरि सावध होई कसा । कळेना काय ? स्वस्थ तू असा ॥३॥
निरिक्षुनी पाहता तुजकडे दिसशी वेड्यापरी । कोण हे ओढिति तुज बाहेरी ? ॥ परिस्थितीच्या लाल धुरंधर ज्वाला भवतालुनी । पोहोचल्या पेट घेत आतुनी ॥ निसर्ग वन साजिरे, धैर्य-बलवीर वृक्ष कडकडे । अग्निने जागि जळोनी पडे ॥ (अंतरा) कुणि शांतविता नाहीच तुझ्या बाजुला । हे पुत्र असुनिया करिती अरि-गलबला । ओढती आप आपुल्याकडॆ तुजला । काळ वेळ ही अशी पातली, पाहतो का प्रभु असा ? । पुढे तरि देइल का भरवसा ? ॥४॥
भयाण ऎशा कठिण प्रसंगी साथ कोण दे तुला ? बोल हा आठवतो का खुला ? ॥ राहु-केतुच्या कचाटियातुनि बंध तोडुनी तुझे । कोण उचलतील बा ! हे वझे ? ॥ अर्धोन्मिलितापरी प्राण तव, छिन्न-भिन्न गमतसे । कोण तव यश घेइल सायसे ? ॥ (अंतरा) दे हाक रामकृष्णासम व्हाया उभे । तुझि सत्य हाक ही कळेल त्यांच्या सभे धावतील ओढाया असुरांच्या जिभे । तुकड्यादास म्हणे पाहवेना, अम्हा त्रास हा असा । मिळो स्वातंत्र्य पुन्हा जगदिशा ! ॥५॥
२९
राष्ट्र-सुखाची कळकळ निर्मळ वाहताना अंतरी । नसू दे स्वार्थ सख्या ! तिळभरी ॥धृ॥ पर सुखदुःखे मान आपुली, निष्कामी हो उनी । कार्य कर न्याय-नीती सेवुनी ॥ सद् धर्माच्या तत्त्व-तंतुला तोडु नको धावुनी । रुढीला नाचु नको घेउनी ॥ (अंतरा) राष्ट्रीय बंधु-भावना रमू दे जगी । वाढवी प्रेम आपुल्य-पराच्या मधी । जातिंचे कडक निर्बंध ढिले कर अधी । स्वैरपणे रंगु दे वीर स्वातंत्र्य धराया करी । लावि ही ध्वजा दिगंतावरी ॥१॥
तत्त्व शोधल्याविणा कुणाची करू नको खंडणा । अधिकसा मांडु नको फड दुणा । निसर्ग-जग हा बाग प्रभुचा, रमवी मनि भावना । दुःखवू नको कुणाच्या मना । फुले फळे ही सुंदर निघतिल, कोण जाणतो खुणा ? सुगंधे रुंजू दे मन्मना ॥ (अंतरा) वाहु दे लाट ही जोराची आतुनी । कुणी उठा उठा हो ! या पुढती धाउनी । करु राष्ट्र-धर्म-हा जागा अपुल्यातुनी । ऎक्यपणाचे बाहु उभारुनि करू गर्जना बरी । होउ दे तरुण-वृत्ति बावरी ॥२॥
वेळ अवेळहि पाहुनि वर्तन ठेवावे आपुले । कर्म आचरोनि समयी भले ॥ देश सुखी व्हावया पाहिजे कार्य-क्रम चांगले । पाहिजे सदा मनी शोधिले ॥ पूर्वज अमुचे कार्यप्रसंगी कसे कसे वर्तले । चलावे थोरांच्या पाउले ॥ (अंतरा) ही याद असू दे, विसरु नको चालता । जरि काळ आडवा आला कर पालथा । सोड ही आता तरि भोळिव निर्जीवता । तुकड्यादास म्हणे घे कानी, तोड उरीची सुरी । पडु दे प्राण प्रसंगावरी ॥३॥
३०
श्रीकृष्णाच्या मुखोग्दताचा आठव होता मना । उसळती वीर-बोध-भावना ॥धृ॥
अन्यायाला सहन करूनी जगणे नाही बरे । मरावे धर्म रक्षुनी खरे ॥ पूर्वजांचिया कुळा पहा हा, कलंक नाही बरा । करावा नाश लढोनि पुरा ॥ क्षत्रिय-धर्मा शोभे जैसी रीत धरावी उरा । फिरु नये रणांगणाहुनि घरा । (अंतरा) विश्वासुनि सांगे कृष्ण आपुल्यापरी । ठसविता शब्द हे विजय होय भुवरी । या करा तातडी वेळ नसे ही बरी । उभा ठाकला वीर कुरुक्षेत्रात, करी गर्जना । वाजती रण-वाद्ये दणदणा ॥२॥
भारतभूच्या तरुणासाठी बोध देउनी सखे । जाहले जय घेउनि पारखे ॥ सांभाळाया इतिहासासी नित्य जपा सारिखे । विरु नका होउनि हृदयी फिके ॥ कर्तव्याची ज्योत जागती सदा असु द्या मनी । बोध घ्या गीताजयंतीतुनी ॥ (अंतरा) धन्य तो दिवस जै कृष्ण बोधि अर्जुना । थरथरा कापती शत्रुंच्या भावना । पुण्यात्मे करिती पुष्पवृष्टि त्या क्षणा । तोचि दिवस आजिचा गडे हो ! स्मरण व्हावया जना । धरा हृदयाशि नंद-नंदना ॥३॥
शरिरे कितिदा तरी गळाली, बोध गळेना कधी । नाहि त्या नाशक कुणि औषधि । धन वडिलांचे सांभाळाया अधिकारा घ्या अधी । बोध द्या तरुणा हृदयामधी ॥ उठ उठा रे गोपाळांनो ! करा संघ आपुला । प्रार्थुया परमेशा-पाउला ॥ (अंतरा) हा सोडुनि पळता बोध व्हाल पातकी । पूर्वजा दुःख बहु, पाहुनिय घातकी । अनुभवा आणता सर्वचि होती सुखी । तुकड्यादास म्हणे जागे व्हा, विसरु नका हो खुणा । रंगवा रणांगणी जीवना ॥४॥
३१
चला गडे हो ! चला पंढरी, भाव धरुनिया मनी । विठोबा भेट देइ धावुनी ॥धृ॥
पुंडलिकाने करुनि कमाई, देव आणिला जगी । पहाया चला घेउनी सगी ॥ संसाराच्या सरोवरी ते, सौख्य न मिळते कुणा । विचारा विचारा करुनी मना ॥ (अंतरा) मनपणा सोडुनी हो उनिया मोकळे । देहभाव सगळा ओसंडावा बळे । मग रूप पहावे विटेवरी सावळे । आनंदाची नुरते सीमा, पहा पहा पर्वणी । निघा हो निघा अहंतेतुनी ॥१॥
वाटे भू-वैकुंठ उतरले, चंद्रभागेच्या तिरी । न दुसरे स्थान असे भूवरी ॥ सुकृत ज्यांचे उदया येई, ते जन वारी करी । विसरती भव-भय दुरच्या दुरी ॥ चहु मार्गांनी विठ्ठल विठ्ठल ध्वनी उठे अंबरी । वाटतो प्रेमभाव अंतरी ॥ (अंतरा) कडिकोट किले मजबूत बांधल्या गढ्या । निर्भये भक्तजन मार्गि घालत उड्या । नाचती लोळती घेउनिया सोंगड्या । काळ जाइना फुका, लाजतो यम पाहुनि दूरूनी । भक्ति जे करिती हृदयातुनी ॥२॥
आषाढी-कार्तिकीस येती, अफाट जन भक्तिने । रंगती हरुनि भेद उन्मने॥ दिंडी-पताका, मृदुंग-वीणे, असंख्यसे वाजती । कुंठते कर्णि ऎकता मती ॥ धो धो कर्णे, टाळ-झांजरी, आणिक वाद्ये किती । गर्जती भक्त मुखे अगणिती ॥ (अंतरा) पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ऎकता । ती अफाट सेना डोळ्याने पाहता । पालख्या पादुका क्षणही सहवासिता । देहभाव हरतसे, काय मी सांगु पुढे काहणी ? पहा रे ! पहा एकदा कुणी ॥३॥
करुनि कृपा श्रीज्ञानदेव बोलले ग्रंथिच्या खुणा । जयांनी तुटति जीव-यातना ॥ सुलभ व्हावया मार्ग तुकोबा अभंग वदती जना । अभंगी लागे मन चिंतना ॥ एकनाथ एक नाथ आमुचा उदार होउनि मना । प्रगटवी गुप्त-गुह्य भावना ॥ (अंतरा) वसविली अशी ही पावन-भू भूवरी । सुख संतांचे माहेर खरी पंढरी । मी बघता झालो देहिच वेड्यापरी । तुकड्यादास म्हणे नरदेही घ्या सार्थक करवुनी । वेळ ही दवडु नका हो कुणी ॥४॥
३२
अशुध्द शेतीवरी पिकेना सुंदर फल रे गड्या ! । शुध्द कर मृतिका नरबापुड्या ! ॥धृ॥
वर-वर घेउनि पिके, बुडविले शेत कसे त्वा अरे ? । अता का घेशि कर्म-नांव रे ? ॥ वाढविले शेतात वृक्ष बहु, काम जयांचे नसे । उडविले पैसे, खाली खिसे ॥ पूर्वपुण्य तव उदय पावुनी शेत मिळाले बरे । हरे जरि करशिल सुखहाव रे ! ॥ (अंतरा) श्रीमंत संत तो धनी जगी धरवरी । जा शरण तयाला चरण धरी वरवरी । घे मत त्याचे मग शेत पिके भरपुरी । विवेकशस्त्रा घेउनि हाती, वृक्ष तोडि शुर गड्या ! । शुध्द कर मृतिका नरबापुड्या ! ॥१॥
धर नांगर, ज्ञानाग्नि चक्षुने जाळि अज्ञ-वृक्षया । पालवी-खोड मुळासह तया । बैल कामक्रोधादि जुंपुनी, माया-जू धर वरी । साफ कर देह-शेत अंतरी ॥ असत्य दिसते सत्य जये, ते फेकि विषय बाहिरी । फळे मग ब्रह्म पीक भूवरी । (अंतरा) हो धन्य सुखे खाउनी फळे निर्मल । फलरूप दिसे मग शेत कुणी पाहिल । पाहुनि करी जग तुझेचि हे राहिल । ब्रह्मफलाच्या रुपे दिसे तनु-शेती चांगुल गड्या ! । शुध्द कर मृतिका नरबापुड्या ! ॥२॥
देह-शेत हे अशुध्द जाणुनि, शुध्द करी रे ! तया । धरी सत्संग स्वच्छ व्हावया ॥ पुण्यपिके ही संस्कारे तू शेतीवरि कमविली । नष्ट कर्मात स्पष्ट गमविली ॥ विषय वृक्ष हे पाच जाण रे ! कुबुध्दि-जलि वाढले । शस्त्र लावुनि न ते काढले ॥ (अंतरा) शेतिने बध्दपण आले गा ! तुजवरी । मारिती श्रृंग कामादि बैल गुरगुरी । होउनी स्वार तुजवरी दिली नोकरी । घेइ तुती श्रीगुरुनामाची, मारि तयासी गड्या ! शरण तो मग येईल तुकड्या ॥३॥
३३
विरह न साहे सख्या ! तुझा हा, भेट एकदा तरी । पाहु दे मूर्ति स्वरुप-गोजिरी ॥धृ॥
व्याकुळ हे जिव-प्राण आमुचे, घ्याया तव दर्शना । येउ दे दया जरा तरि मना ॥ अगम्य महिमा तुझी वर्णिली, पूर्ण करी कामना । भेट रे ! भेट पतितपावना ! ॥ (अंतरा) फेक हा मोहमायापट जडभूमिचा । मालवी घनांधःकार भेद उर्मिचा । झळकवी दिवा झळझळीत ज्ञानाग्निचा । जीवभाव हा निरसुनि माझा, अंतःकरण मंदिरी । पाहु दे मूर्ति स्वरुप-गोजिरी ॥१॥
सप्तचक्ररत्नांकित ज्याच्या भ्रमती दारावरी । वायु अजपाजप अक्षय करी ॥ वृत्ति-अंकुरी ज्ञानवृक्ष हा खुलवुनि पल्लव-फुला । तुझ्या दर्शना धाव घे भला ॥ (अंतरा) नच वेळ करी तू हरी ! भेट एकदा । ना कधी तुला मग विसरिन मी सर्वदा । इच्छा पुरविच ही, दावि आपुल्या पदा । तुकड्यादासा तुजविण हे जग, फोल दिसे भूवरी । पाहु दे मूर्ति स्वरुप-गोजिरी ॥२॥
३४
हरिभजनाची रुची जयाच्या हृदय-कमली लागली । तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥धृ॥
अभ्यासाने वाढत वाढत अंतरंगि पोहोचली । नशा अलमस्त उरी दाटली ॥ काय करावे, काय त्यजावे, बुध्दि हे विसरली । फकिरी शरिरावर धावली ॥ (अंतरा) बेतुफान लाटा चढती नयनावरी । कुणि द्या अंजनही ना उतरे बाहिरी । करि गुंग धुंद, डुलविते शरीरा पुरी । मन-वृत्ती ही वेडिच झाली, हरिच्या पदि लागली । तयाची प्रपंच-रुचि फाकली ॥१॥
अफाट सैनिक जमले मार्गी शस्त्र घेउनी भले । टाळ आणि मृदंग, तंबुरि खुले ॥ विठ्ठल नामे करित गर्जना अंतरंगि रंगले । नाचती घडि घडि सुख चांगले ॥ धो-धो वाद्यहि रणवाद्यासम समरांगणि गर्जले । विठुचे सैनिक येती खुले ॥ (अंतरा) पालख्या-पताका घड्या-चौघड्या किती । कोंदला नाद बहु, टाळ-वाद्य अगणिती । भेरिया नगारे मृदंगही वाजती । असंख्य गर्दी, अपुर्व शोभा, धन्य धन्य ती घडी । निघाले दरबारी तातडी ॥२॥
गजबजली चौफेर पंढरी, सैन्यभार लोटला । ध्वनी-प्रतीध्वनी एक ऊठला ॥ मस्त हत्तिसम थै-थै नाचत सैनिक येती पुढे । जय जय ज्ञानदेव कडकडे ॥ ज्ञानदेव सोपान निवृत्ती मुक्ताई चे धडे । गर्जती तुकाराम चौघडे ॥ (अंतरा) नच रीघ उरे पै-पाय मुंगि जावया । जन असंख्य येती सैनिक हे पहावया । दणदणे विठूचे महाद्वार नादि या । वाटे की वैकुंठ उतरले मृत्युलोकिच्या थडी । निघाले दरबारी तातडी ॥३॥ पंढरपुरचे निर्मळ दैवत आहे आमुच्या घरी । वाडविलास त्याचि चाकरी ॥ आजे-पणजे वारिच करिता पंढरीस अर्पिले । विठूच्या दरबारी ठेविले ॥ खांदि पताका, हाति टाळ आणि गळा माळ तुळशिची । मुखी नामावलि पंढरिची ॥ (अंतरा) भाग्याचे आम्हा पंढरपुर भेटले । आषाढिस जाता हे सोहळे पाहिले । मन उन्मत्त झाले मस्त डोलु लागले । तुकड्यादास म्हणे साधा तरि, एकवेळ ती घडी । निघाले दरबारी तातडी ॥४॥
३६
चल ऊठ हरी ! तव झोप द्वाड ही आम्हा ! करु ना दे कामाधामा ॥धृ॥ तू निजला रे ! नीजरूप घेवोनी, टेकती असूर निशानी । कुणि कोणाला ना पुसती अभिमानी. निती सोडलि ज्यांनी त्यांनी । ऋषि गोंधळले मठी मंदिरी रानी. त्रासले कामदेवानी । (अंतरा) मातामरि सुटल्या गावा । खंडोबा भैरवबाबा । काँलरा प्लेग वाघावा । उघड रे हरी ! नेत्र जरा घनश्यामा ! करु ना दे कामा धामा ॥१॥ बघ लोकांची दैना ही अति भारी, अन्नान्नि मरति नरनारी। दुःखद विघ्ने कोसळताती सारी, जनता ही जर्जर भारी । बहु चोरांची दाटी, डाके-मारी, नाटके तमाशे द्वारी । (अंतरा) पेटती अग्निच्या ज्वाला । धरणिकंप होतो भू-ला । अति पूर नदी-नाल्याला । पहा पहा जरा मधुसुदन विश्रामा ! करु ना दे कामा धामा ॥२॥ तव गोधन रे ! असुरांनी कापाचे, तुज नेत्रि कसे हे बघवे ? । तव भारतभू पारतंत्र्य गाठावे, शोभते कसे हे बरवे ? । (अंतरा) निंदक भक्ता छळताती । कोणि ना कुणाला पुसती । ऋतु काळवेळ ना बघती । ना सोसवते दुःख सख्या घनश्यामा ! करु ना दे कामा धामा ॥३॥ करि पावन रे ! जीव दशे हे पडले, पाहण्या तुला जे अडले । रुप दाखिव रे ! ध्यान जयांचे नडले, तव प्रेम अंतरी जडले । योगींद्र मुनी सनकादिक हे आले, दर्शनार्थ उत्सुक झाले । (अंतरा) चल ऊठ येइ सामोरी । मिटवि या तमाची थोरी । सुखवि ह्या भक्त नरनारी । दे तुकड्याला तव पद-पंकज-प्रेमा, करु ना दे कामा धामा ॥४॥
३७
असुरासी मानवबाणा, पुरवील आस ही कोणा ! वाटते ? ॥ ज्या दया-मया मुळि काही, उपजली जराशी नाही । क्षणभरी ॥ इतिहास मागचा ऎसा, वाचुनी पहा थोडासा । बंधुनो ! ॥ (अंतरा) जे दुष्ट, मनाचे भ्रष्ट , राहती स्पष्ट । दया ना त्यांना, दया ना त्यांना । सोडतील कैचे प्राणा, आपुल्या ? ॥१॥
मानवी बुध्दिचे पाश, होतील क्षणि तरि नाश । खात्रिने ॥ होईल त्रास थोडासा, परि दयार्द्रता गुण साचा । मानवी ॥ क्रोधे जरि मनि जळजळला, तरि सारासारे वळला । शूर तो ॥ (अंतरा) परि क्रूर, न होई दूर, त्रास दे फार । गांजिती नाना, गांजिती नाना । पाहती लवविण्या माना, आमुच्या ॥२॥
भस्मासुर जव बल दावी, तव युक्ति प्रभुस शोधावी । लागली ॥ घाबरले शंकर भोळे, पळती त्या रानोमाळे । पाहुनी ॥ मदमत्त हत्तिसम झाला, मरणास्तव बुध्दि त्याला । फावली ॥ (अंतरा) विष्णुनी, वेष घेउनी, बनुनी मोहिनी । गर्वि असुरांना, गर्वि असुरांना । जाळिले त्याचि हातांना, लावुनी ॥३॥
हा आजवरीचा खेळ, मग मिळेल कैचा मेळ । आमुचा ? ॥ यासाठी एकचि आहे, सुचतो मज तो सदुपाय । अंतरी ॥ दैवि-शक्ति प्रगट करावी, अभ्यासे हृदयी ल्यावी । आपुल्या ॥ (अंतरा) मग राम, पुरवि हे काम, देइ आराम । भक्त लोकांना, भक्त लोकांना । मानवा मिळे जिवदाना, निश्चये ॥४॥
धर्माची इभ्रत जावी, मंदिरे स्मशाने व्हावी । पाहता ॥ अबलासि क्रूर भेटावे, सति-सेव दुजाकरि जावे । पाहता ॥ गाइचे रक्त वघळावे, नेत्रांनी आम्हि बघावे । पाहता ॥ (अंतरा) हे कसे, शोभते असे ? दुःख मरणसे । दया हो प्राणा, दया हो प्राणा । का दया तुम्हा यावी ना, बंधुनो ! ॥५॥
या उठा उठा सगळेची, आळवा प्रभू-हृदयासी । गर्जुनी ॥ तो सखा आमुचा आहे, संकष्टी भक्ता राहे । रक्षुनी ॥ धावुनी ये ब्रिद हे त्याचे. पाहिजे आर्त जीवांचे । सर्वही ॥ (अंतरा) मग चक्र, धरी करि शक्र, चिरोनी नक्र । पाडि असुरांना, पाडि असुरांना । हा त्या देवाचा बाणा, सर्वथा ॥६॥
चाहुल द्या लागू कानी, सांगू त्या प्रभुसि कहाणी । आपुली ॥ अपराधाविण मनुजांना, मारणे शास्त्र हे कोणा । सांगते ? ॥ आपुले हक्क मिळवावे, न्याये हे कथिले देवे । अजवरी ॥ (अंतरा) मग पाश, कसा आम्हास, बनवितो दास । प्रभु असताना, प्रभु असताना ? तुकड्याची वार्ता कानी, घ्या जरा ॥७॥
सांगा मम कहाणी त्यांना, चुकवा देशाची दैना । आमुच्या ॥ सोपले तुम्हावर त्यांनी, शिव छत्रपति राजांनी । शेवटी ॥ (अंतरा) या उठा निर्भये दटा, भूमि चोर्हाटा । धरा गाठोनि, धरा गाठोनी । धरि राहु नका रे ! कोणी बंधुनो ! ॥१॥
रक्त हे देशभक्तीचे, उसळवा वीर-शक्तीचे । आपुल्या ॥ घ्या करा संघ निर्माण, धर्माकरिता द्या प्राण । अर्पुनी ॥ ज्वानीच्या कर्तव्याला, द्या ज्योत चेतवा ज्वाला । धावुनी ॥ (अंतरा) फडकवा, रंग भगवा, करोनी नवा । दिवा लावोनि, दिवा लावोनी । या या रे ! पुढती कोणी, तरुण हो ! ॥२॥
दीनावर हल्ला करणे, हे पाप घोर थोराने । वर्णिले ॥ दुष्टासी दंडण देणे, हे पुण्यमयाचे लेणे । वर्णिले ॥ हे ज्ञान सांगते गीता, मग का ऎसे रे ! भीता ? तरुण हो ! ॥ (अंतरा) घ्या मनी, उठा जागुनी, प्रभू तो धनी । जिवी चिंतोनि, जिवी चिंतोनी । तुकड्याची वार्ता कानी । घ्या जरा ॥३॥
३९
व्हा पवित्र अपुल्या देही, याविण मार्ग कुणि नाही । शांतिचा ॥धृ॥
आचरा तसेची लोकी, होउनी मनी निःशंके । सर्वही ॥ स्वच्छता घराची ठेवा, शेजार तसाची करवा । आपुला ॥ कैचणे उकिरडे काढा, मळ होइल हृदयी गाढा । त्यासवे ॥ जा दिशेस दुर गावाच्या, ना बसा जवळ कोणाच्या । खंडरी ॥ (अंतरा) आपुल्या परीच लोक हे, समजणूक हे, धरुनि रहा हि, धरुनि रहा ही ॥ याविणा० ॥१॥
पावित्र्य आचरे अंगी, तो भक्त म्हणा सत् संगी। रंगला ॥ तो थोर म्हणा वृत्तीचा, पावित्र्याचि आश्रम ज्याचा । वर्तनी ॥ स्वच्छ खादि अंगी घाली, हाताने कष्टुनि केली । जाणुनी ॥ गायिसी मनोभावाने, पाळितो स्वतः अंगाने । लक्षुनी ॥ (अंतरा) घरि सडा, पडे धडधडा, बनुनि निर्भिडा, झाडि मार्गाहि झाडि मार्गाहि, मज गमे मिळत स्वर्गाही, त्यागुणे ॥२॥
पावित्र्य रूप देवाचे, पावित्र्य अंग दासाचे । सर्वया ॥ तुळसी-वृंदावन दारी, भरि रांगोळी जरदारी । चमजती ॥ घर आजुबाजुनी साफ, ना जरा काटि आणि कुंप । सडविले ॥ अरुणोदय होण्यापूर्वी. कामे आटोपी सर्वी । आपुली ॥ (अंतरा) धन्य तो, घरधनी भला, दिसतसे मला, मनी ममताहि, मनी ममताहि, ज्या मत्सर तिळही नाही, अंतरी ॥३॥
बघताच पहाटे कोणी, आटपली स्नाने ज्यांनी । आपुली ॥ गीतापाठासी बसला, घालितो नमन सूर्याला । दंडसे ॥ धरि पुत्र-पौत्र सर्वांना, शिकवीत आपुला बाणा । बोधुनी ॥ अहो ! करा आचरा ऎसे, तरी भक्त बना देवाचे । निश्चये ॥ (अंतरा) ना तरी, बोलणे परी, न घरी आचरी, थोर तो नाहि, थोर तो नाही, ज्या शुध्द भावना काही, ना वसे ॥४॥
तुकड्याची ऎका वार्ता, हा प्रसंग कानी पडता । आचरा ॥ आचरा नि दुसर्या सांगा, सकळ गावि ऎसे वागा । बापहो ! ॥ तरि वाट मिळे शांतीची, खुंटेल रीत भ्रांतीची यामुळे ॥ घ्या कर्म आपुले हाता, व्हा तयार गावाकरिता । आपुल्या ॥ (अंतरा) सांगुनी, सतत वर्तुनी, प्रेम देउनी, बना हो ! ग्वाहि, बना हो ! ग्वाही, तरि देव सुखाला देई, आमुच्या ॥५॥
४०
हा खेळ प्रभूच्या घरचा, मिटवाया हात कुणाचा । ये पुढे ? ॥धृ॥
ही निसर्ग बागहि त्याची, तोडाया छाति कुणाची । ये पुढे ? ॥ मोलाविण अग्नि-पाणी, देतो या लोकी कोणी । ये पुढे ? ॥ (अंतरा) हा नसे, नसे परि दिसे, भास व्यर्थसे, खेळ मायेचा, जाणता कोणहो याचा ? ये पुढे ॥१॥
स्तंभावीण रचना केली, गवसली बुध्दिची खोली । कोणत्या ? । पाण्यावर रचले भूला, साधते काय मनुजाला । कोणत्या ? ॥ रवि-चंद्र-तारका अधर, जडविता आलि का कोर । कोणत्या ? ॥ (अंतरा) सागरा, ऊत ये पुरा, ऊर्मिसी झरा । वाहतो कैचा ? पाहणारा साक्षी याचा । ये पुढे ॥२॥
कोण या-मुळाशी आहे ? हे बघता खाली हाय । जाणते ॥ हा जड-चैतन्य विवाद, जाणती योगि संवाद । जाणते ॥ एकाच शक्तिची वेली, गुंफलि ही जाणे बोली । जाणते ॥ (अंतरा) तो हरी, निराळा दुरी, दिसेना वरी । परी सर्वांचा, भेद हा जाणता त्याचा । ये पुढे ॥३॥
एकाच जिवाने केली, परि भिन्न-भिन्नता झाली । लोकि या ॥ कुणि सूर-असूर बनावे, कुणि खावे, कोणि द्यावे । लोकि या ॥ कुणि सुखी दुःखि कुणि भोगी, कुणि राहति जन्मी रोगी । लोकि या ॥ (अंतरा) ह्या खुणा, जाणि तो म्हणा, खरा शाहणा । पुत्र सद्गुरुचा, तुकड्यास प्रेम हा त्याचा । ये पुढे ॥४॥
४१
पाहतात तरी का कोणी ? तुझि दैना केविलवाणी । गायिगे ! ॥धृ॥
गेला तव रक्षक आता, श्रीकृष्ण जगाचा त्राता । गायिगे ! ॥ श्री दत्त गुप्त ते झाले, मज वाटे तुजवर रुसले । गायिगे ! ॥ (अंतरा) शिव हरे, लाविले पुरे, नेत्र साजिरे, बैसले ध्यानी, तुझि हाक घेइना कोणी । गायिगे ! ॥१॥
उरले हे हिंदूधर्मी, कृषिप्रधान देशी कर्मी । गायिगे ! ॥ त्यांचिया बुध्दिची गाणी, सांगतो ऎक गार्हाणी । गायिगे ! ॥ अति स्वार्थ तयांना झाला, धर्माचा आदर गेला । गायिगे ! ॥ (अंतरा) सुर्मती, तुला काढती, बाजारी किती, विकती हौसेनी, कटि खोचति रुपये नाणी । गायिगे ! ॥२॥
नच जरुर तुझी लोकाला, वाटते असेची मजला । गायिगे ! ॥ मग दूध कशाला देशी ? पुत्रासम सेवा करिशी । गायिगे ! ॥ किती गोड तुझा हा पान्हा, पाजशी दुष्ट लोकांना । गायिगे ! ॥ (अंतरा) किति प्रेम, तुझे हे नेम, अंतरी क्षेम, क्रोध ना आणी, नच उदार तुजसा कोणी । गायिगे ! ॥३॥
बघु नको अशी डोळ्यांनी, अग गायी ! केविलवाणी । मजकडे ॥ वाटते दुःख अति भारी, नेताति तुला हे वैरी हाकुनी । द्रव्याचा अपव्यय करुनी, पापांच्या राशी भरुनी । नेति हे ॥ (अंतरा) ना दया, जरासी मया, तया पापिया, उपजली ध्यानी, ठेवती सुरी तव मानी । गायिगे ! ॥१॥
जा सांग सुखे देवासी, “हिंदुची बुध्दि का ऎसी । घातली ? ॥ मी दूध देतसे यांना, तरि विकती माझ्या प्राणा” । सांग हे ॥ वत्सास जुंपती शेती, अणि माझी ऎशि फजीती । सांगहे ॥ (अंतरा) “अति उंच, हिंदुचा धर्म, परी हे कर्म, सोडुनी वर्म, पळति अडरानी । नुरला मम त्राता कोणी । सांग हे ॥२॥”
“गोपाळ कशाचे हिंदू, गो-काळाचा त्या छंदू । लागला ॥ मौजेने विकती मजला, अति स्वार्थ तयांना झाला । आवडी ॥ मज तोडतील जे काळी, मी देइन शाप उमाळी । हिंदुना ॥” (अंतरा) घ्या चला, विका आईला, रिकामी तिला, म्हणोनी कोणी, आवडेल का ही गाणी । आमुची ? ॥३॥
मज क्रूर समज तू आता, तरि काय करू मी माता ! सांग हे ॥ नच द्रव्य आमुच्या पाशी, घेतो तरि जोरच यासी । पाहिजे ॥ मनि तळमळ अतिशय वाटे, तव काळ कसा गे ! कंठे ? दुःख हे ॥ (अंतरा) करु काय, नाहि उपाय कष्टतो माय ! सांगतो कानी, तुकड्याची ऎका कोणी विनवणी ॥४॥
४३
किति गोड तुझी गुणनाथा, वाटते मधुर भगवंता ! अंतरी ॥धृ॥
जे भजति तुला जिवभावे, ते पुन्हा जन्मि ना याचे करिशि तू ॥ काय हे मीच सांगावे ? श्रुति-शास्त्र पुराणा ठावे । सर्व हे ॥ प्रत्यक्ष पाहता यावे, मग प्रमाण कैचे द्यावे । त्याजला ? ॥ (अंतरा) जे धीर, करिति मन स्थिर, देउनी शीर । रंगती गाता, रंगती गाता । ठेविशी वरद त्या माथा । श्रीहरी ! ॥१॥
जे तुझी समजुनी झाले, ते कळिकाळा ना भ्याले । सर्वथा ॥ सुखदुःख तयावरि आले, हसुनिया सहन ते केले । सर्वही ॥ गिरिपरी विघ्न कोसळले, तिळमात्र न मनि हळहळले ! भक्त ते ॥ (अंतरा) द्रौपदी, न भ्याली कधी, सभेच्या मधी । वस्त्र ओढिता, वस्त्र ओढिता । धांवला घेउनी हाता । अंबरे ॥२॥
प्रल्हाद भक्त देवाचा, ऎकिला चौघडा त्याच्या । कीर्तिचा ॥ केला बहु छळ देहाचा, परि सोडि न जप नामाचा । तिळभरी ॥ विष-अग्नि-व्याघ्र सर्पाचा, करविला कडे लोटाचा । यत्नही ॥ (अंतरा) किति प्रेम ? न सोडी नाम, जाउ द्या प्राण । तारिशि त्या हसता हसता । धावुनी ॥३॥
सम स्थान भक्त वैर्यासी, ही उदारता कोणासी । गवसली ? ॥ यशोदेसि ती पुतनेसी, भक्तासी ती कंसासी । दाविशी ॥ घेऊनि माग वेळेसी, भक्तांच्या वचना देशी । पुरवुनी ॥ (अंतरा) ती कणी, गोड मानुनी, पिशी धावुनी । विदुरा-हाता, विदुरा-हाता । निर्मळ प्रेमाचा दाता । तू हरी ! ॥४॥
वाढवू नका हो वृत्ती, मी कर्ता अथवा भोक्ता ॥धृ॥
सर्व हे कार्य देवाचे, सर्वस्वी त्याची सत्ता । मी केले काहिच नोहे सर्व हा हरी करवीता । (अंतरा) हा अनुभव सकळा ठायी । येतसे पदोपदि पाही । जीव हा आमुचा ग्वाही । मग व्यर्थ कशाची चिंता, वाहता आपुल्या माथा ? ॥१॥
आलिया प्रसंगे व्हावे, सावधान कार्यासाठी । भिउ नये कुणा तिळमात्र, इच्छितो हेचि जगजेठी । नीति-न्याय-बुध्दी अपुली, लावावी कार्यासाठी । (अंतरा) अन्याय न पहावा डोळा । गमवूच नये ती वेळा । फिरु नये भिऊनी काळा । हेचि ज्ञान देते गीता, अणि धर्मही सांगे चित्ता ॥२॥
जव अधर्म झाला लोकी, कोणी न कुणाला मानी । साधु संत छळले गेले, अन्याय नसोनी कोणी । कंसाच्या सत्तेखाली, पापांच्या झाल्या गोणी । (अंतरा) ना धर्म राहिला लोकी । साधूजन पडले धाकी । राक्षसी वृत्तिच्या हाकी । गडबडली सारी जनता, नच उरला वाटे त्राता ॥३॥
ऎकताच प्रभुने वार्ता, दुःख हे न बघवे त्यासी । भक्तांचा छळ पहावेना, ब्रीदाची लाज तयासी । ना चैन पडे क्षण एक, गडबडले वैकुंठासी । (अंतरा) गरुडास सोडुनी आले । वैकुंठ दुरावुनि ठेले । देह-भाव विसरुनि गेले । देवकिच्या उदरा येता, जाहला जगाचा त्राता ॥४॥
लीलेने गोपाळासी, पुरविले प्रेम देवाने । प्रेमाची करुनी मोहनी, पाडिली गोपिंना त्याने । होते जे कइ अवतारी, फेडाया आला उसणे । (अंतरा) मर्दुनी असुर प्राण्यांना । भुलविला गर्वमय बाणा । शिर उचलूच ना दे कोणा । दाखवी मालकी त्राता, आमुची या जगती सत्ता ॥५॥
निर्मळ रुप तव विमल सुदर्शन, दूर करी कळिकळा रे ! ॥२॥
मोरमुकुट पीतांबर शोभे, गळा वैजयंति माळा रे ! ॥३॥
तुकड्यादास म्हणे तव बोले, नाशे विषय-उमाळा रे ! ॥४॥
८३
मी पाहि तसा रुप धरशिल ना ? मज पावन तू हरि करशिल ना ? मी पाहता तुज तू दिसशिल ना ? मी हासता तू हरि ! हसशिल ना ? (अंतरा) सुंदर वनि वेलांच्या तळुनी । झुळझुळ नदि वाहे वळवळुनी । गर्द तरू हिरवळले मिळुनी । अधरि बंसि तू धरशिल ना ? ध्वनि मधुर कर्णि तू भरशिल ना ? ॥१॥
(अंतरा) मयुर-पिसारा मुकुटावरती । कांबळ खांदी, उरि वैजंती। कुंडल-शोभा झळके खुलती । मन्मंदिरि तू स्थिरशिल ना ? ह्या प्रेम-सुखी उध्दरशिल ना ? ॥२॥
(अंतरा) एकांताच्या हृदयाकाशी । मी पाहिन तव श्याम रुपासी । आळवीन तुज मग हृषिकेशी ! देह-भाव मग हरशिल ना ? मज तव स्वरुपी लिन करशिल ना ? ॥३॥
(अंतरा) नित्य असा मी करि अभ्यासा । स्फूर्ति सदा देशिल ना दासा ? । नाकरि हरि ! मम आस हताशा । कृपा-हस्त शिरि धरशिल ना ? हा तुकड्या अपुला करशिल ना ? ॥४॥
अजब ते घर, सुंदर साजाचे, दिसतसे औट हात साचे । तयाचे मधी, जगचालक नाचे, स्वरुप का बोलु अता वाचे । मुखे वदवेना, श्रमली वेदवाणी । दाविली अघटित ० ॥१॥
रत्न लाविले, आत दिव्य सात, तयांचा उजेड चकचकित । सदा झगमगे, न बोलवे मात, डुलतसे अजपा दिनरात । स्मरण स्फुरणाचे, आवाज घुमघुमित, त्रिवेणीसंगम झुरझुरत । सप्त हौदांचे, लहरावे पाणी । दाविली अघटित ० ॥२॥
बंद ठेविले, ते दसवे द्वार, नऊ खिडक्या त्या चौफेर । आत नांदती, स्त्रिया तिथे चार, तयांचे नावी घरदार । मनाजी गडी, करी कारभार, सदा पाहतसे व्यवहार । धनी सर्वांचा, एकविसा वरुनी । दाविली अघटित ० ॥३॥
गुंग जाहला, तया पुढे ज्ञानी, वृत्तिशून्यत्व अंगि बाणी । तेज फाकले, नच मावे नयनी, संशय विरले सर्व मनी । दंग होतसे, निज स्वरुपी प्राणी, सद्गुरु आडकुजी-ध्यानी । दास तो तुकड्या, सहज समाधानी । दाविली अघटित ० ॥४॥
१४७
किति सांगती, संत तुला बोध । सुटेना अजुनि कामक्रोध ॥धृ॥
काय तुज ठाव, असेल संतांचा ? अवेळी जाशिल रे ! साचा । शेवटी कुणी, साथ-संगतीचा, नसे कर शोध अंतरीचा । समज मानसी, कोण तू कवणाचा ? , सुसेवक होई संतांचा । कृपा घेउनी, तोडिशि ना नाद । सुटेना अजुनि ० ॥१॥
उदरिं नवमास, त्रासहि सोसोनी, अचानक पडला या भुवनी । स्मरण ते वेळी, केले स्थिर ध्यानी, अता का होशी अभिमानी ? जन्म पावला, झाला वयमानी, बाळपण खेळण्यास मानी । विषय सेविता, किति झाला बध्द । सुटेना अजुनि ० ॥२॥
पुरा मायेत, होउनिया दंग, सेविली विषयांची भांग । सुचेना काही, दुःखाचा रंग, धरिला वृध्दपणी संग । श्वास लागला, पुत्र म्हणे रोग ?, मांडिले बुडग्याने ढोंग । काढि येथुनी, न तोडिशी बंध । सुटेना अजुनि ० ॥३॥
भटकला, कितिक भटक्शी ?, न झाली खुशी विषय-भोगाची ? । रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥धृ॥
हे अजब वाटते पिसे, तुला रे ! नसे, हौस तरण्याची । मग ओरडशी जव येइल फेरि यमाची ॥ ना कुणी येइ रक्षण्या, समज शाहण्या ! गतिच देहाची । तुज कशी नसे रे ! बुध्दी अपरोक्षाची ? ॥ वरि-वरी दावितो ज्ञान, असे अज्ञान, गोष्ट अंतरिची । रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥१॥
बहु फिरत फिरत येउनी, पावला झणी, तनू मनुजाची । धाडिली विचारा करिता-करिता साची ॥ वाचुनी बहूत पुरण, धरी अज्ञान, होत तू वाची । ना अनुभव ऎसा सर्व जनी बघलाचि ॥ रे ! जाण पशूपक्षि जे, ययानी किजे, धाव पुढच्याची । परि नसे फिकिर त्या खाण्याची दिवसाची ॥ जाहला नीच त्याहुनी, समज रे ! मनी, गोष्ट स्वहिताची। रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥२॥
सांगती संत ते बोध, तुला ये क्रोध, दुही सुजनाची । कर विचार आता, करि भक्ती ईशाची ॥ नवमास उदरि साहुनी, त्रासली मनी, जननि ते तुमची । का केली अपकीर्ति हो ! तिच्या नावाची ? ॥ तो तुकड्या सांगे सार, नसे आधार, स्थिति सर्वांची । रे ! कर सार्थकता अता तरी देहाची ॥३॥
१४९
बा ! प्रपंच-वन हे दाट, सुचेना वाट, चढाया घाट, तुझा श्रीहरी ! कर दया, आवरी माया अजुनी तरी ॥धृ॥
कधि काम-व्याघ्र खळबळे, क्रोधे जळफळे, आरळी मारी । धाव रे धाव ! करु कायच वाटे हरी ! ॥ आशा-तृष्णा ह्या नद्या, न वाहति सुद्या, ओढिती धारी । टाकताचि पाउल पुढे फजीती सारी ॥२॥
करु काय ? सांग सदुपाय, वाटतो पाय कठिण देवाचे । पाश हे कधी तुटतील पापि जीवाचे ? ॥ तुकड्यादास ठाव दे अता, नसे तारिता, तुझ्याविण कोणी । दे प्रकाश मज या भयाण काननस्थानी ॥३॥
१५०
श्रीहरी ! कोठवरि आता फिरविसी वाया ? जाहलो श्रमी बहु, नका दावु ती माया ॥ श्रीहरी ! ॥धृ॥
राहुनी प्रपंची जिवा नसे सुख काही । करिताचि कष्ट बहु शिणलो, या भव-डोही ॥ श्रीहरी ! ॥ पाहुनी द्रव्य-सुत-दार वैभवा ऎशा । भटकला जीव हा, न सुटे घरची आशा ॥ श्रीहरी ! ॥ मागता भीक श्वानासम पोटासाठी । हे हीन कर्म मारिते, आडवी काठी ॥ श्रीहरी ! ॥ (अंतरा) नच द्रव्य कधी घेउनी पाहिले डोळा । कष्टला जीव मम सर्व सोशिता ज्वाळा । घरधनी कशाचा घरचा बाइल-साळा । हा नर-जन्माचा, काळ लोटला वाया ॥ जाहलो श्रमी ० ॥१॥
कुणि बरे पाहिना, जावे दुसर्या दारा । काय सांगु वैभव ऎशा या परिवारा ? ॥ श्रीहरी ! ॥ तरि तुझे नाव मम न ये मुखी भगवंता ! । श्रीगुरु-कृपेने आठवला गुणवंता ! ॥ श्रीहरी ! ॥ आठवता ऎसे वाटे मज ते काळी । फेडील पांग हा येउनिया वनमाळी ॥ श्रीहरी ! ॥ (अंतरा) ते मधुर बोल ऎकवशिल श्रवणी कधी । येउ दे दया मम, शांतवि अपुल्या मधी । ऎश्वर्य जाउ दे, मज घे अपुल्या पदी । तुकड्यादास ठाव दे श्रीसद्गुरुच्या पाया ॥ जाहलो श्रमी ० ॥२॥
१५१
पावो सदा यशाला, हा आर्य-धर्म माझा । वदवो प्रभू अम्हाला, हा आर्य-धर्म माझा ॥धृ॥
सुत वायुचा प्रगटता, भानूसि छाव घाली । भूषवी अमीत भूला, हा आर्य-धर्म माझा ॥१॥
श्रीकृष्ण देवकीचा, कंसास ठार मारी । दावी रणात लीला, हा आर्य-धर्म माझा ॥२॥
श्रीराम दशरथाचा, सुखवी वनी ऋषींना। करि ठार रावणाला, हा आर्य-धर्म माझा ॥३॥
शिवराय क्षत्रियाचा, करि नाश दुर्जनांचा । कर्कश दिसे रणाला, हा आर्य-धर्म माझा ॥४॥
ऋषि रामदास झाले, शुक नामदेव आले । बहु बोधवी जनाला, हा आर्य-धर्म झाला ॥५॥
गुरु ज्ञानराज माझे, महाराष्ट्र-संत गाजे । प्रभु-मार्ग दे जनाला, हा आर्य-धर्म माझा ॥६॥
बाणोनी त्याग अंगी, निज राजमार्ग सांगी । विसरे कधी न त्याला, हा आर्य-धर्म माझा ॥७॥
या आदि-अंत नाही, हा सर्व काळ राही । श्रृतिसंमती निमाला, हा आर्य-धर्म माझा ॥८॥
नांदो सदा सुखाने, जयमाळ घालुनीया । भगवे निशानवाला, हा आर्य-धर्म माझा ॥९॥
सेवेस चित्त लागो, तुकड्याहि आस वाही । पुरवो प्रभू ! प्रणाला, हा आर्य-धर्म माझा ॥१०॥
१५२
सत्संगि चित्त लावी, विसरू नको नरा रे ! । व्यसनास त्यागुनीया, सत्संग साध जा रे ! ॥धृ॥
कोणि न येति साथी, जग सर्व हे फुकाचे । गुरु-संत मार्ग दावी, घे बोध निर्मळा रे ! ॥१॥
सुत-दार चालतीचे, पडतीस येति मागे । कवडी न देति कोणी, मग रामची सखा रे ! ॥२॥
हा देह नष्ट वेड्या ! टाकोनि जाय जीवा । मग सांग काय नेशी ? अपुल्यासवे गड्या रे ! ॥३॥
तुकड्या म्हणे समज हे, गुरुच्या कृपाप्रसादे । हो साक्षि या जगाचा, तरि मुक्त होशि बा रे ! ॥४॥
१५३
शिव भूपतीस माझा, सांगा निरोप जा जा ॥धृ॥
महाराष्ट्र धैर्यशाली, करवा पुन्हा विशाली । तुमची प्रथा बुडाली, या या पुन्हा समाजा ॥१॥
तरवार ती भवानी, नेली दुजे लुटोनी । अडवावया न कोणी, धावोनि घ्या तिला जा ॥२॥
भगवे निशाण तुमचे, जाते कि काय गमते । बघवे न ते अम्हाते, ताटस्थ त्यासि राजा ॥३॥
विरवृत्ति नष्ट झाली, भेकाड वृत्ति आली । क्षत्रियता निमाली, अति बोलकाचि वाजा ॥४॥