श्रीगणेशाय नमः ॥ श्रीलक्ष्मीरमणाय नमः ॥
जय कृपासागरा जगजेठी ॥ तूं सगुणस्वरूप दाखविसी दृष्टी ॥ जैं भक्त पडती महासंकटीं ॥ तैं तूं न टळसी आपेंआप ॥१॥
सर्वांगीं दिससी घनसांवळा ॥ दिव्य पीतांबर कांसे पिंवळा ॥ पिंवळेंचि पदक वक्षःस्थळा ॥ त्यावरी रत्नकळा फांकती ॥२॥
पिंवळाचि मुकुट कनकदीप्ती ॥ देखोनि लज्जित निशापती ॥ पिंवळीं कुंडलें कानीं तळपती ॥ मकराकृती सुढाळ ॥३॥
पिंवळीच कंठीं मोहनमाळ ॥ मध्यें कौस्तुभ दिसे सुढाळ ॥ दृष्टीस देखोनि सर्व काळ ॥ भक्त प्रेमळ भुलले पैं ॥४॥
पिंवळा केशरी तिलक ललाटीं ॥ पिंवळीच अंगीं चंदनउटी ॥ पिंवळ्याच वळीनें क्षुद्रघंटी ॥ देखतांचि दृष्टी तल्लीन ॥५॥
पिंवळेंचि वस्त्र पांघरुण ॥ पिंवळेंच हातीं वीरकंकण ॥ पिंवळेंच अंगीं भूषण ॥ तुजकारण शोभती ॥६॥
पिंवळाच चरणीं वांकीतोडर ॥ पिंवळे शोभती वाळे नेपुर ॥ नखींचें तेज सर्व काळ ॥ भक्त प्रेमळ देखती ॥७॥
ब्रह्मादिकां दुर्लभ चरण ॥ ते प्राण जाहले दासाकारण ॥ जिहीं प्रपंचाचें टाकूनि भान ॥ वर्णिती सद्गुण पैं तुझे ॥८॥
मानापमान नाठवूनि चित्तीं ॥ जिहीं सांडिली लौकिक स्थिती ॥ जे निर्लज्ज होऊनि कीर्तनीं गाती ॥ ते तुज श्रीपती पावले ॥९॥
ज्यांनीं दुराशा टाकोनि मनें ॥ जे सारिखेंच लेखिती शेण सोनें ॥ स्वर्गसुखासी विटले मनें ॥ ते तुजकारणें आवडती ॥१०॥
जिहीं देहलोभ सांडोनि तत्त्वतां ॥ चहूं मुक्तींस हाणितल्या लाता ॥ ऐसी जयांची निरपेक्षता ॥ ते रुक्मिणीकांता तुज पावले ॥११॥
संकटीं पडतां भक्त प्रेमळ ॥ सगुणरूप धरिसी तत्काळ ॥ न विचारिसी काळवेळ ॥ तूं दीनदयाळा पावसी ॥१२॥
कलियुगीं बौद्धावतार जाण ॥ ऐसें बोलती शास्त्रपुराण ॥ त्याचें एक वेळमोडोनि वचन ॥ होसी सगुण स्वइच्छें ॥१३॥
जैसी साझवेळ न होतां पाहें ॥ वत्स मातेसी पिऊं जाये ॥ परी मोहें पान्हा घालिताहे ॥ निष्ठुर न होये सर्वथा ॥१४॥
तेवीं अवताराची न येतां वेळ ॥ तुज बोलाविती भक्त प्रेमळ ॥ तयांची मानोनि कळकळ ॥ बोलसी तत्काळ गुजगोष्टी ॥१५॥
ऐसें एकनिष्ठ वैष्णवजन ॥ जिहीं तुज केलें आपुलें स्वाधीन ॥ त्यांचे वर्णावया सद्गुण ॥ उल्हास मनें धरियेला ॥१६॥
दीनदयाळ वनमाळी ॥ मीं तंव अघटित घेतली आळी ॥ तूं निजांगें बैसोनि हृदयकमळीं ॥ स्वानंदनवाळी बोलविसी ॥१७॥
जैसा पिता पुत्राचा धरूनि हस्त ॥ खडे मांडोनि ओनामा शिकवित ॥ तेवीं बुद्धीचा चालक तूं रुक्मिणीकांत ॥ लिहविसी ग्रंथ मजहातीं ॥१८॥
गोवर्धन उचलोनि आपण ॥ गोपाळां दिधलें थोरपण ॥ तेवीं माझी करूनि बुझावण ॥ ग्रंथरचना तूं करविसी ॥१९॥
मी मंदबुद्धी पंढरीनाथा ॥ धड निरोप तोही न ये सांगता ॥ त्या मुखें वदविशी भक्तकथा ॥ हें आश्चर्य चित्तां वाटतें ॥२०॥
कवणे वेळे वर्तलें कायी ॥ तें म्यां सर्वथा देखिलें नाहीं ॥ लिहितां अटक पडली कांहीं ॥ तूं देसी लवलाही आठवण ॥२१॥
तूं बुद्धिप्रकाशक शारंगधर ॥ सर्व हा भार घातला तुजवर ॥ हरोनि मीपणाचा बडिवांर ॥ ग्रंथ साचार वदविसी ॥२२॥
मागील अध्यायाचे अंतीं ॥ विठ्ठलस्मरण करितां प्रीतीं ॥ कुपण उठविलें सत्वरगती ॥ तें कथानक श्रोतीं परिसिलें ॥२३॥
तो चमत्कार अद्भुत देखोन ॥ बहुत सन्मान करिती जन ॥ मग तुकोबा अरण्यांत जाऊन ॥ करी चिंतन श्रीहरीचें ॥२४॥
दांभिक लौकिक प्रतिष्ठा ॥ मानी जैसी श्वानविष्ठा ॥ टाकोनियां सन्मानचेष्टा ॥ करी एकनिष्ठा हरिभजन ॥२५॥
जेणें लोक पिशाच म्हणती ॥ कुटिल स्वमुखें निंदा करिती ॥ तैसीचि धरूनि विदेहस्थिती ॥ जाऊनि एकांतीं बैसत ॥२६॥
कोणी निजमुखें करिती स्तवन ॥ तेथूनि सत्वर जावें पळून ॥ आपणासी कोणी ठेवितील दूषण ॥ तेथें करीत श्रवण बैसावें ॥२७॥
कोणी पक्वान्नें करूनि नाना ॥ आदरेंकरूनि देतील भोजना ॥ तरी तें सर्वथा न ये मना ॥ विवेकें रसना आंवरीत ॥२८॥
कोणी दुर्बळ अनाथ दीन ॥ त्यानें वाढिलें भाजीचें पान ॥ तें देहनिर्वाहापुरतें जाण ॥ आवडीकरून भक्षावें ॥२९॥
बल्लाळाच्या वनाआंत ॥ दिवसा एकांतीं जाऊनि बैसत ॥ रात्रीं येऊनि ग्रामांत ॥ कीर्तन करीत सप्रेम ॥३०॥
दोन मास असोनि आपुलें नगरीं ॥ गेलें नाहींत निजमंदिरीं ॥ कांता गार्हाणें घरोघरीं ॥ लोकाचारीं देतसे ॥३१॥
ऐका साजणी एक मात ॥ माझें कर्म बहु विपरीत ॥ घरधनी न करीच आपुली परत ॥ बैसतो अरण्यांत जाऊनी ॥३२॥
टाकूनियां धंदा उदीम ॥ कीर्तनीं नाचतो निजप्रेम ॥ हृदयांत आठवी पुरुषोत्तम ॥ भजनीं नेम धरियेला ॥३३॥
दोन महिने गांवांत असोनी ॥ भ्रतार आला नाहीं सदनीं ॥ मी चिंतातुर होऊनि मनीं ॥ झुरतें साजणी रात्रंदिवस ॥३४॥
कधीं भेटेल तुम्हांप्रती ॥ तयासी सांगा धर्मनीती ॥ कीं तुवा टांकिलें कांतेप्रती ॥ जाहली फजीती जनांत ॥३५॥
ऐसीं शेजारिणीं लागोनी ॥ नित्य सांगतसे गार्हाणीं ॥ तों एके दिवसीं उदकालागूनी ॥ घागर घेऊनि चालिली ॥३६॥
कुंभांत भरूनि जीवन ॥ परतोनि घरा येतां जाण ॥ तों तुकोबा करूनियां स्नान ॥ देवालयांत चालिले ॥३७॥
कांता लवलाहें जाऊनियां जवळी ॥ पदरीं धरिला तत्काळीं ॥ मर्यादा टाकूनि ते वेळीं ॥ काय बोलिली तें ऐका ॥३८॥
तूं निर्लज्ज निःशंक होऊनि मनीं ॥ कीर्तनीं नाचतोसी निशिदिनी ॥ घरासी न येसी परतोनी ॥ मी तळमळ मनीं करीतसें ॥३९॥
लोकलज्जा धरूनि पाहीं ॥ घरीं मोकलितें नित्य धायी ॥ त्वां आमुची वाट केली कायी ॥ सांग लवलाहीं ये समयीं ॥४०॥
यावरी कांतेप्रती बोले वचन ॥ तुझिया मायबापें केलें लग्न ॥ त्यांहीं आम्हांसी दिधलें नाहीं पाहोन ॥ तरी वस्त्र अन्न पुरवूं कासया ॥४१॥
कांता म्हणे मग तुकयासी ॥ पाहिलें तरी सांग कवणासी ॥ येरू म्हणे आमुचे मायबापांसी ॥ निरविलें तुजसी निजकांते ॥४२॥
यावरी कांता उत्तर बोलिली ॥ तुझीं मायबापें मरोनि गेलीं ॥ तीं कोठें धुंडोनि पाहूं वहिलीं ॥ जीं मसणीं जाळिलीं निजकरें ॥४३॥
यावरी निजभक्त बोले काय ॥ पांडुरंग पिता माझा होय ॥ विश्वजननी रुक्मिणी माय ॥ अचळ अक्षय सर्वदा ॥४४॥
सृष्टीसी होती जैं उत्पत्ती ॥ तेणें काळें ते न वाढती ॥ विश्वास येतां प्रळयगती ॥ ते नाश न पावती सर्वथा ॥४५॥
घटांत आकाश बिंबतां जाण ॥ त्यास नाहीं दुजेपण ॥ नाश होतां घटाकारण ॥ तें गेलें फुटोन म्हणों नये ॥४६॥
तेवीं आमुचीं बाप माये ॥ त्यांचें चित्तीं आठवीं पाये ॥ तीं अन्नवस्त्र पुरवितील पाहें ॥ न धरीं संशय सर्वथा ॥४७॥
मग कांता म्हणे प्राणेश्वरा ॥ आतां चलावें निजमंदिरा ॥ तेणें पिशुनांसी होईल उजगरा ॥ संसार बरा तुमचेनि ॥४८॥
मी श्रीहरीचे पाय आठवीन ॥ तेच पुरवितील वस्त्र अन्न ॥ परी तुम्हीं घरीं बसून ॥ श्रीहरिभजन करावें ॥४९॥
भ्रतार म्हणे ते अवसरीं ॥ माझें वचन ऐकसील जरी ॥ तरी भाक देईं वो निजकरीं ॥ येतों मंदिरीं आतांचि ॥५०॥
कांतेनें वचन देऊनि देखा ॥ घरासी आणिला वैष्णव तुका ॥ आश्चर्य वाटलें गांवींच्या लोकां ॥ बोलती एकमेकां परस्परें ॥५१॥
चार दिवस वैराग्य दाखवून ॥ आपुली प्रतिष्ठा वाढविली त्यान ॥ पुनः मायेसी वरपडा होऊन ॥ प्रपंचीं जाऊन पडियेला ॥५२॥
रेक म्हणती जाहलें यथास्थित ॥ प्रपंचींच साधे परमार्थ ॥ तुकयानें आपंगिलें निजकांतेतें ॥ तेणेंच समाधान चित्त आमुचें ॥५३॥
जाऊनि बैसतां गिरिकपाटीं ॥ कोण चढला देखा वैकुंठीं ॥ यापरी लोक बोलती गोष्टी ॥ विवेक पोटीं न करितां ॥५४॥
कोणी निंदिती कोणी स्तविती ॥ उत्तम अथवा अधम म्हणती ॥ परी तुकयासी नाहीं हर्ष खंती ॥ आनंद चित्तीं सर्वदा ॥५५॥
ते दिवसीं होती हरिदिनी ॥ तुकोबा बैसोनि वृंदावनीं ॥ कांतेसी सन्निध बोलावूनी ॥ म्हणे ऐकें श्रवणीं हरिकथा ॥५६॥
मग सन्मुख बैसवोनि तिजला ॥ निजकरीं टाळ वीणा घेतला ॥ अकरा अभंग उपदेश केला ॥ तो सज्जनीं ऐकिला असेल ॥५७॥
त्याचाचि अन्वय आणोनि ध्यानीं ॥ मीही बोलतों आपुली औषधी ॥ तेवीं तुकयाचे अभंगांची अर्थसिद्धी ॥ मी मंदबुद्धी सांगतों ॥५८॥
नातरी व्हावया अमृतसिद्धी ॥ तेथें वैद्य देती आपुली औषधी ॥ तेवीं तुकयाचे अभंगांची अर्थसिद्धी ॥ मी मंदबुद्धी सांगतों ॥५९॥
गंगेंत ओहळ मिळालिया पाहें ॥ त्यासी अपवित्र सर्वथा म्हणों नये ॥ कीं परिसासी लोह भेटलिया काये ॥ काळिमा न राहे तयासी ॥६०॥
त्यांत संतांचें अनुपम वचन ॥ अर्थ पाहतां सखोल गहन ॥ परी किंचित वदेन त्यांचे कृपेन ॥ तें परिसा सज्जन निजप्रीतीं ॥६१॥
मग कांतेसी सन्मुख बैसवून ॥ म्हणे नरदेह हें क्षेत्र जाण ॥ येथें येऊनि केलिया हरिस्मरण ॥ तरी पिकेल दारुण निजभाग्यें ॥६२॥
जिहीं परमाथ न केला दृढ ॥ त्यांची केवळ जाहली बूड ॥ वाहूनि प्रपंच काबाड ॥ झिजविलें हाड व्यर्थचि ॥६३॥
ऐशीं टक्के दिवाणदारा ॥ देणें लागतो याचा सारा ॥ नाहीं तरी काळोजी हुद्देदारा ॥ दाखवी दरारा बहुसाल ॥६४॥
त्याचेंचि भय पावोनि मनीं ॥ दाहा टक्के टाकिले झाडोनी ॥ बाकी सत्तर त्यालागूनी ॥ ऐवज नयनीं दिसेना ॥६५॥
दाहा टक्के म्हणशील कोणते ॥ ते आशंका वाटेल निजचित्तें ॥ तरी दशइंद्रियें क्षेत्राआंत ॥ झडलीं प्रस्तुत जाण वो ॥६६॥
अपशब्द आणि रसाळ स्तुती ॥ सारिखेंचि वाटे श्रवणाप्रती ॥ नेत्रांसी सोनें आणि माती ॥ सारिखींचि दिसतीं माझिया ॥६७॥
साखर आणि वृंदावन ॥ जिव्हेसी नाहीं अधिक उण ॥ पुंगळवेल आणि बकुळसुमन ॥ घ्राणासी लागती सारिखीं ॥६८॥
इंद्रियांत मन चंचळ पाहीं ॥ तें स्थिरावलें विठ्ठलपायीं ॥ तैसींचि कर्मइंद्रियें देहीं ॥ कर्तेपण नाहीं तयांसी ॥६९॥
ज्यांचा विषय न कळे त्यांसी ॥ तीं सहजचि दहा झाडिलीं ऐसीं ॥ बाकी सत्तर उरले तयांसी ॥ ऐवज मजपासीं सांगतों ॥७०॥
पांडुरंग चौधरी जाण येथींचा ॥ म्हणे झाडा करावा सकळ बाकीचा ॥ हृदयचोहटां बैसोनि साचा ॥ बोलतो वाचा ते ऐका ॥७१॥
म्हणतो हांडेंभांडें गुरें शेखीं ॥ देऊनि झाडीं आपुली बाकी ॥ हेचि बुद्धि करूनियां निकी ॥ होईं निष्कळंकी म्हणतसे ॥७२॥
हें यासी न देतां निजकांते ॥ तरी लपावयासी स्थळ कोणतें ॥ याविण स्थळ न दिसे रितें ॥ विवेकचित्तें विचारीं ॥७३॥
हा विश्वव्यापक जगजेठी ॥ याजभेणें पळतां उठाउठीं ॥ दुजा कोणी घालील पाठीं ॥ न दिसे दृष्टीं सर्वथा ॥७४॥
काय तें गव्हाण हिंडावें किती ॥ पाठ घेतली याच्या दूतीं ॥ आधींचि कुळवाडी केली नसती ॥ तरी कां मजप्रती गांजिता ॥७५॥
तरी बेबाक होऊनि सर्वोपरी ॥ येथेंचि असावें निरंतरीं ॥ स्वइच्छा देईल जे मजुरी ॥ ते भक्षूं निजकरीं सकळिक ॥७६॥
यानें नागवूनि सोडिले किती ॥ ते संसारा आले नाहीत मागुती ॥ ये भेणेंकरूनि पदरीं सूती ॥ कोणी न घेती सर्वथा ॥७७॥
एकासी सद्गुरू घेतां निजमान ॥ केलें तयाचें निसंतान ॥ तयासी हांसती सकळ जन ॥ मानाभिमान टाकितां ॥७८॥
कसवटींत सरले जे निकटीं ॥ तयांसी घालितो वैकुंठीं ॥ माझीही तैसी घेऊनि पाठी ॥ केली साठी जीवाची ॥७९॥
ऐसें पहिलें कळलें असतां ॥ जाणोनि जाहलों मी नेणता ॥ जेणें निर्दयपणें गांजिलें बहुतां ॥ त्याचे हातां सांपडलों ॥८०॥
आतां विवेक करूनि मानसीं ॥ उदास होई संसारासी ॥ नास आरंभिला माझिया जीवासी ॥ मग अनुमानासी कासया ॥८१॥
जरूर दिसोनि आलें सहज ॥ मग कां नावडे सांग तुज ॥ उपास रोकडे येती मज ॥ आतां कासया लाज धरावी ॥८२॥
देहाचा लोभ करिलिया पाहें ॥ तुझिया जीवाचें व्हावें काये ॥ मज तुज तुट कदा न होये ॥ ते ऐक सोये सांगेन ॥८३॥
मुलांलेंकुरां समवेत पाहीं ॥ उभयतां नांदों एकेचि ठायीं ॥ हा विचार ऐकसील जरी निश्चयीं ॥ तरी वियोग नाहीं सर्वथा ॥८४॥
म्हणसील लेंकुरें खातील काये ॥ हे चिंता सर्वथा करूं नये ॥ तयांचें अन्नवस्त्र तयांसी पाहें ॥ लिहिलें आहे विधीनें ॥८५॥
तूं आपुला गळा घेईं उगवुनी ॥ चुकवीं चौर्य़ायसीं लक्ष योनी ॥ गर्भवासाची चुकवीं जांचणी ॥ तों विचार कानीं ऐकें वो ॥८६॥
मी तुज टाकूनि पळतों निराळा ॥ कीं ऐवज देखोनि बांधिती गळा ॥ तुझे हातींचे मुजाईम मजला ॥ होऊनि घाला घालितील ॥८७॥
धर्मदूतांचा अवघड मार ॥ देखोनि जीव कांपे थरथर ॥ आतां माझी चाड असली जर ॥ व्हावें उदार सर्वस्वें ॥८८॥
काय करूं या निजसंचिता ॥ साठी पडिलीसे जीववितां ॥ हे माझी करणी नव्हे सर्वथा ॥ पंढरीनाथा आवडलें ॥८९॥
मोकळा भिकारी जाहलों पाहें ॥ तरी पुढां पाठ घेतलीच आहे ॥ त्यासी सर्वथा करुणा नये ॥ नागवण होये निश्चयेंसीं ॥९०॥
भोंपळा घेऊनि प्यावें जीवन ॥ जेवावया देवें लाविलें पान ॥ तरी तुवां चित्त वाड करून ॥ सर्वस्वदान करावें ॥९१॥
ऐसा निश्चय करिसील चित्तीं ॥ तरी भले लोक तुजला मानवती ॥ उभयलोकीं वाढेल कीर्ती ॥ तो विचार चित्तीं ऐक वो ॥९२॥
बरग पडोनी मेलीं गुरें ॥ भांडीं नेलीं म्हणावीं चोरें ॥ नाहीं जाहलीं मज लेंकुरें ॥ ऐसें कठिण अंतर करावें ॥९३॥
सर्वस्वें निरसोनियां आस ॥ कठीण करीं निजमानस ॥ उपमा समान वज्र जैसें ॥ धैर्य चित्तास करावें ॥९४॥
किंचित प्रपंचीं विषयसुख ॥ हें निःशेष थुंकोनि टाकितां देख ॥ परमानंदधणी पावसी अनेक ॥ जे सनकादिक इच्छिती ॥९५॥
हे सायास चुकती बहु मोटे ॥ भवबंधन आपोआप तुटे ॥ अंतीं सोहळे होती गोमटे ॥ वैकुंठवाटे चालतां ॥९६॥
तें सुख होईल उभयतांसी ॥ सोहळे करितील देवऋषी ॥ जडित विमानीं सन्मानेंसीं ॥ विष्णुदूत आपणासी बैसविती ॥९७॥
संत महंत सिद्ध किन्नर ॥ हे पुढें येतील सामोर ॥ विमानीं बैसवोनि सादर ॥ नामघोषगजर करितील ॥९८॥
मायबाप पडतां दृष्टीं ॥ चरणीं घालूनि दृढ मिठी ॥ तेथें करून सुखगोष्टी ॥ असों निकटीं त्यांपासीं ॥९९॥
तें सर्व सुखाचें पुरवावया कोड ॥ म्हणूनि चित्त करीं तूं वाड ॥ टाकूनि प्रपंचकाबाड ॥ परमार्थ दृढ साधावा ॥१००॥
तूं देव पाहावया सायास करीं ॥ नाशिवंताची आस न धरी ॥ प्रातःकाळीं उठोनि झडकरी ॥ स्नान करीं अनुतपें ॥१॥
सोमवार द्वादशी पर्वकाळ ॥ उदयीक पावला उत्तम काळ ॥ तरी मन शुद्ध करूनि उतावेळ ॥ ब्राह्मण सकळ पाचारीं ॥२॥
संकल्प करूनि विधियुक्तीं ॥ गृह लुटवावें द्विजांहातीं ॥ पुढें मिळेल कैशा रीतीं ॥ हा उद्वेग चित्तीं करूं नको ॥३॥
मायबाप सखा जिवलग ॥ आपुलें शिरीं आहे पांडुरंग ॥ तो सर्व पुरवील निजांगें ॥ आपदा मग होऊं नेदी ॥४॥
तो सन्निध आहे मजजवळीं ॥ परी दूर सांगतों पाल्हाळीं ॥ तूं देखोनी काय जाहलीस आंधळी ॥ चिन्हें सकळी न जाणसी ॥५॥
तो पांडुरंग हृदयीं प्रकटला देख ॥ म्हणूनि नावडे विषयसुख ॥ मनाच्या ओढी खुंटल्या अनेक ॥ सगुण स्वरूप न्याहाळितां ॥६॥
कनक कांता पदार्थ दोन ॥ जनांसी आवडाती जीवाहून ॥ आम्हांसी ते पाषाणाहूनि हीन ॥ काय तूं खूण नेणसी ॥७॥
भूक ताहान निश्चयें राहिली जाण ॥ सज्जन सोयरे आणि हें वन ॥ वृक्ष वल्ली आम्हांकारण ॥ दिसे समान सारिखेंचि ॥८॥
तो जवळी आहे रुक्मिणीपती ॥ म्हणोनि सुखदुःखें समान वाटती ॥ तोडोनि विषयांची नैश्चल्यभ्रांती ॥ भजन प्रीतीं करावें ॥९॥
हें सद्गुरूचे कृपेंकरून ॥ देवें बोलविलें मजकारण ॥ त्वांही सादर केलें श्रवण ॥ तरी तैसेंच वर्तून दावींका ॥११०॥
प्रसन्न होऊनि रुक्मिणीवर ॥ माझा तंव केला अंगीकार ॥ आतां सर्वथा आणिक विचार ॥ नव्हे साचार निश्चित ॥११॥
या वचनीं धरूनि विश्वास ॥ बळकट होईं घालूनि कांस ॥ आतांचि जाहला तुज उपदेश ॥ कांहीं सायास न करितां ॥१२॥
करूनि सडा संमार्जन ॥ श्रृंगारीं तुळसीवृंदावन ॥ अतीत ब्राह्मणाचें पूजन ॥ सद्भावें जाण करावें ॥१३॥
काया वाचा मनोभावेंसीं ॥ होईं वैष्णवांची अनन्य दासी ॥ विठ्ठलनाम निजप्रेमेंसीं ॥ अहर्निशीं घेईं कां ॥१४॥
हा स्त्रीउपदेशाचा आशय जाण ॥ सहज आलें अनुसंधान ॥ अवलंबिलें असे संपूर्ण ॥ संतसज्जन जाणती ॥१५॥
एकादश अभंग मुख्य देखा ॥ निजमुखें बोलिला वैष्णव तुका ॥ त्याजवरी ओंवीबद्ध टीका ॥ अर्थ नेटका निर्वाळिला ॥१६॥
तीं मुळींचीं पदें पाहूनि निगुती ॥ अर्थ ध्यानासी आणिजे संतीं ॥ तेणेंप्रमाणें जे का वर्तती ॥ ते तरती निश्चितीं सभाग्य ॥१७॥
निजकांतेचें करूनि मिष ॥ केला साधकांसी उपदेश ॥ जेणें तुटोनि भवबंधपाश ॥ शांतिसुख अनायास ये हातां ॥१८॥
जैसी चातकाची देखोनि आर्ती ॥ गगनीं उगवला रोहिणीपती ॥ परी प्रकाश न वंची कोणाप्रती ॥ समान स्थिती तयाची ॥१९॥
तेवीं कांतेसी उपदेश केला ॥ अर्थ नाहीं कोणासी वंचिला ॥ जो स्वभावें घेईल त्याजला ॥ असे ठेला स्वतःसिद्ध ॥१२०॥
तें वचन कानीं पडतां निश्चित ॥ तेणें द्रवलें तिचें चित्त ॥ मग अनुसंधानीं लावूनि प्रीत ॥ श्रवण करीत निजप्रेमें ॥२१॥
आणिक श्रीहरीचे वर्णूनि गुण ॥ चार प्रहर केलें जागरण ॥ मग उदयासी येतां अरुण ॥ रुक्मिणीरमण ओंवाळिला ॥२२॥
जाऊनि इंद्रायणीच्या तीरीं ॥ स्नान सारिलें ते अवसरीं ॥ कांता येऊनियां मंदिरीं ॥ द्विजांसी झडकरी पाचारिलें ॥२४॥
भांडीं गुरें वस्त्र अन्न ॥ सकळ घेऊनि गेले ब्राह्मण ॥ तेथें जटिल संन्यासी येऊन ॥ मंदिर धुंडोन पाहातसे ॥२५॥
तंव कांहींच न दिसे निश्चितीं ॥ मग चुलीची राख घेतली प्रीतीं ॥ सर्वांगासी चर्चिली विभूती ॥ देखूनि हांसती सकळिक ॥२६॥
म्हणे चवदा रत्नें वांटिते वेळ ॥ शंकरा लाधलें हालाहल ॥ तेवीं निर्दैवाचें प्राक्तन केवळ ॥ दिसोनि आलें आपणासी ॥२७॥
इतुकें करूनि ते अवसरीं ॥ तुकोबा चालिले बाहेरी ॥ तिळमात्र अन्न नाहीं घरीं ॥ म्हणोनि कांता उद्विग्न ॥२८॥
कालची एकादशी निराहार ॥ क्षुधेनें पीडिती मुलेंलेंकुरें ॥ म्हणूनि अंतरीं चिंतातुर ॥ म्हणे कैसा विचार करावा ॥२९॥
तंव गांवची महारीण होती दीन ॥ तिचें रूप धरी माता रुक्मिण ॥ तुकयाचें सत्त्व पाहावयाकारण ॥ वस्त्र मागोन पाहावें ॥१३०॥
ऐसें म्हणोनि विश्वजननी ॥ बाहेर निघाली तये क्षणीं ॥ तुकयातें देखोनि नयनीं ॥ काय बोलिली तयासी ॥३१॥
घर लुटविलें विप्रांहातीं ॥ मी तुमच्या घरची महारीण राबती ॥ कांहीं उरलें असेल तयां हातीं ॥ तरी द्यावें मजप्रती मायबापा ॥३२॥
तों वाडियामागूनि परसाआंत ॥ लुगडें वाळतां देखिलें तेथ ॥ तें तुकयानें ओढोनि त्वरित ॥ तिजकारणें दिधलें ॥३३॥
गांवींचे लोक देखोनि मनीं ॥ विस्मित जाहले तये क्षणीं ॥ म्हणती याणें विपरीत केली करणीं ॥ घातलें पाणी संसारा ॥३४॥
त्यांनीं घरीं सांगतां मात ॥ ऐकोनि कांता क्रोधभरित ॥ म्हणे प्राक्तन माझें विपरीत ॥ जाहली लोकांत अपकीर्तीं ॥३५॥
वाड्यांत मिळाल्या शेजारिणी ॥ त्यांजवळ देतसे गार्हाणीं ॥ दुःख कोणा सांगों साजणी ॥ तळमळ मनीं करी तसे ॥३६॥
दोन मासपर्यंत जाण ॥ भ्रतारें त्यागिलें मजकारण ॥ परतोनि घरीं नयेच जाण ॥ गांवांत असोन साजणी ॥३७॥
नानापरींचे त्रिविध जन ॥ मागें पुढें बोलती न्यून ॥ म्हणोनि काल समजावून ॥ घरासी घेऊन मी आलें ॥३८॥
रात्रीं मांडोनि कीर्तन ॥ त्याणें मज घातलें मोहन ॥ नानापरींचे दृष्टांत देऊन ॥ बोलिला वचन तें ऐका ॥३९॥
मायबाप विठ्ठलरखुमाई ॥ त्यांचे पाय आठवीत जायीं ॥ तीं अन्नवस्त्र देतील समयीं ॥ सायास कांहीं न करितां ॥१४०॥
त्यांचा विश्वास म्यां धरून ॥ सकळ लुटविलें धनधान्य ॥ भांडीं गुरें सर्व देऊन ॥ उदास होऊन बैसलें ॥४१॥
नेसतें वस्त्र आणिलें धुवोनी ॥ तें परसांत वाळूं घातलें साजणी ॥ तें महारिणीस दिधलें ओढोनी ॥ तुम्हीं तों नयनीं देखिलें ॥४२॥
मी करूनियां मोलमजुरी ॥ लेंकुरें पोशीत होतें बरीं ॥ त्यांचें तों बाहेर बरव्यापरी ॥ चाले परभारीं प्रारब्धें ॥४३॥
यापरी काळ कडे लागतां ॥ म्यां वायांचि बुद्धि केली वृथा ॥ घरासी आणिलें प्राणनाथा ॥ मुकलें अर्था सर्वस्वें ॥४४॥
पाय आठवितां निशिदिनीं ॥ अन्नवस्त्र देतील मजलागोनी ॥ ऐसा विश्वास त्याचें वचनीं ॥ आपुलें मनीं जाणिला ॥४५॥
चिंतन केलें दोन तीन वेळ ॥ तों दरिद्र पातलें तत्काळ ॥ लेंकुरें करिती तळमळ ॥ अन्न न मिळे म्हणोनी ॥४६॥
ऐसा पायांनीं केला घात ॥ म्हणोनि संतप्त जाहलें चित्त ॥ तरी आतां मी जाऊन देउळांत ॥ करीन विपरीत तें ऐका ॥४७॥
घरधनी पायांची वर्णिती थोरी ॥ ते फोडोनि टाकीन ये अवसरीं ॥ मग पाषाण घेऊन मस्तकावरी ॥ चालिली लवकरी देउळांत ॥४८॥
म्हणे रुक्मिणीपतीचे चरण ॥ ब्रह्मादिक करिती ज्यांचें ध्यान ॥ नारदादि करिती ज्यांचें गायन ॥ वर्णिती थोरपण जयांचें ॥४९॥
त्यांवरी पाषाण घालोनि पाहें ॥ मी फोडूनि टाकीन लवलाहें ॥ ऐसा चितीं करून निश्चय ॥ महाद्वारासी जातसे ॥१५०॥
हें जाणोनि पंढरीनाथ ॥ देउळामाजी थरथरां कांपत ॥ तो भक्तवत्सल दीननाथ ॥ लीला दावीत दासासी ॥५१॥
जेणें मत्स्यरूप धरूनी ॥ शंखासुर मारिला समुद्राजीवनीं ॥ तो तुकयाचे स्त्रियेस भिऊनी ॥ चक्रपाणी कांपत ॥५२॥
जो कूर्म होऊनि घननीळ ॥ पाठीवरी धरिला मंदराचळ ॥ तो सप्रेमभक्तीचें देखोनि बळ ॥ कांपे चळचळ निजांगें ॥५३॥
जो वराहरूप धरून श्रीहरी ॥ वसुधा धरिली दाढेवरी ॥ तो लीलानाटकी वैकुंठविहारी ॥ निजभक्तांसीं भीतसे ॥५४॥
जो बळेंच प्रगटोनि स्तंभाआंत ॥ हिरण्यकशिपु विदारला दैत्य ॥ तो निजभक्ताचें भय बहुत ॥ वागवी चित्तांत आपुल्या ॥५५॥
दानाभिमानें फुगला बळी ॥ मग त्रिविक्रम होऊनि वनमाळी ॥ तयासी घातलें पाताळीं ॥ तो कांपत देउळीं थरथरां ॥५६॥
जो रेणुकेच्या उदरासी येऊनी ॥ निःक्षत्रिय केली सकळ अवनी ॥ तो निजभक्तासी चक्रपाणी ॥ भयभीत होऊनि कांपत ॥५७॥
सकळ सुरवरांसी जिंकिलें जेणें ॥ तो दशकंठ निवटिला रघुनंदनें ॥ ऐसा प्रतापी भक्तभूषण ॥ भयेंकरून कांपत ॥५८॥
कंस चाणूर महादैत्य ॥ स्वहस्तें निवटी श्रीकृष्णनाथ ॥ तो तुक्याचे कांतेचें भय बहुत ॥ असे वागवीत मानसीं ॥५९॥
धर्में डवडवला चक्रपाणी ॥ देखोनि विस्मित जाहली रुक्मिणी ॥ म्हणे कवण चिंता उपजली मनीं ॥ मजलागोनि सांगावें ॥१६०॥
यावरी म्हणे चक्रपाणी ॥ आजि चिंता उद्भवली आमुचें मनीं ॥ जे तुकयाची कांता सक्रोध होऊनी ॥ पाषाण घेऊनि येतसे ॥६१॥
निजकरें फोडावे आमुचे चरण ॥ ऐसा निश्चय केला तिनें ॥ यासी उपाय करावा कवण ॥ हें मजलागोन कळेना ॥६२॥
रुक्मिणी म्हणे संकट काये ॥ येथोनि पळावें लवलाहें ॥ एवढी वेळ चुकवोनि पाहें ॥ परतोनि यावें मागुती ॥६३॥
यावरी म्हणे जगज्जीवन ॥ आपुले तें स्वाधीन नाहीं जाण ॥ मी जाहलों असें भक्तांआधीन ॥ त्यांचे आज्ञेनें वर्ततसें ॥६४॥
बाळक पदर धरितां पाहें ॥ पित्यासी बळें सोडवितां न ये ॥ तो निजमोहें थोकलाचि राहे ॥ तैसेंचि आम्हां हें जाहलें ॥६५॥
मिलिंद निजमुखें कोरी काष्ठासी ॥ परी कमळिणी सर्वथा न फोडवे त्यासी ॥ अडकला राहे निजमोहेंसीं ॥ गति तैसी मज जाहली ॥६६॥
आपण गेलिया येथून ॥ तरी तुकयाचें मोडेल मन ॥ मूर्ति न देखतां सगुण ॥ तो देईल प्राण आपुला ॥६७॥
त्याचें मनोगत राखिलें जरी ॥ तरी कांता येऊनि ये अवसरीं ॥ पाषाण घालील पायांवरी ॥ हे चिंता अंतरीं मज वाटे ॥६८॥
इकडे पत्नी सक्रोध मानसीं ॥ सत्वर येतसे देउळासी ॥ देखोनि तुका पुसे तिजसी ॥ कोठें जातेसी मज सांग ॥६९॥
येरी तयासी उत्तर देतसे ॥ तुझा पिता रुक्मिणीकांत ॥ तेणेंचि माझा केला घात ॥ पाय चित्तांत आठवितां ॥१७०॥
तुवां उपदेशिलें मजकारण ॥ आठवीत जाईं त्याचे चरण ॥ मग पुरवील वस्त्र अन्न ॥ तें म्यां वचन ऐकिलें ॥७१॥
विश्वासें वचन धरूनि चित्तीं ॥ घर लुटविलें विप्रांहातीं ॥ मुलेंलेंकुरें अनाथ दिसती ॥ अन्नवस्त्र त्यांप्रती मिळेना ॥७२॥
ऐसा पायांनीं केला घात ॥ म्हणोनि चालिलें देउळांत ॥ त्यांवरी पाषाण घालोनि त्वरित ॥ फोडीन निश्चित ये समयीं ॥७३॥
ऐसी पत्नीची ऐकोनि मात ॥ मोहें द्रवलें तुकयाचें चित्त ॥ म्हणे इनें तों मांडिलें विपरीत ॥ म्हणोनि अश्रुपात लोटले ॥७४॥
तरी इजसवेंचि जाऊनि आपण ॥ नम्र बोलावें विनीत वचन ॥ कीं क्रोध नावरेचि तुजकारण ॥ तरी मजवरी पाषाण घालीं कां ॥७५॥
ऐसें विचारूनि चित्तीं ॥ मागूनि चालिलें सत्वरगती ॥ हें जाणोनियां वैकुंठपती ॥ चिंता करिती मानसीं ॥७६॥
पहिले थरथरां होते कांपत ॥ ते उगेचि राहिले निवांत ॥ देखोनि रुक्मिणी झाली विस्मित ॥ मग विनोदें पुसत देवासी ॥७७॥
म्हणे देवाधिदेवा पंढरीनाथा ॥ मघां चळचळां कांपत होतां ॥ आतां आश्रय जाहला कोणता ॥ हा संशय चित्ता वाटतसे ॥७८॥
कोण तुमचा प्राणसखा ॥ जिवलग पातला पाठिराखा ॥ म्हणोनियां वैकुंठनायका ॥ निवांत राहिलां ये समयीं ॥७९॥
मग म्हणे दीनदयाळ ॥ आणिकचि अरिष्ट ओढवलें सबळ ॥ तुकया आपुला भक्त प्रेमळ ॥ आली कळकळ माझी तया ॥१८०॥
कांता फोडील आपुले चरण ॥ म्हणोनियां मागें येतसे जाण ॥ कीं पत्नीस ऐसें बोलावें वचन ॥ घालीं पाषाण मजवरी ॥८१॥
म्हणोनि आपुलें दुःख विसरून ॥ त्याचीच चिंता वाटते दारुण ॥ यास उपाय करावा कवण ॥ हें मजकारण कळेना ॥८२॥
तिची तों आहे विरोधभक्ती ॥ विवेक विचार नाहीं चित्तीं ॥ अवचित मारील तुकयाप्रती ॥ हे चिंता मजप्रती वाटते ॥८३॥
पाषाण घालील पायांवरी ॥ मग त्याचे पाय दुखले जरी ॥ तरी कीर्तनीं नाचेल कैशापरी ॥ हे चिंता अंतरीं मज वाटे ॥८४॥
यावरी रुक्मिणी उत्तर देत ॥ तुम्ही कां उद्विग्न जाहलेति व्यर्थ ॥ जयावरी आपुली दया किंचित ॥ कळिकाळ कांपत तयासी ॥८५॥
जयासी प्रसन्न जाहला भास्कर ॥ त्यावरी सर्वथा न पडे अंधार ॥ कीं वस्तीस मिळालिया क्षीरसागर ॥ तो सर्वदा क्षुधातुर राहेना ॥८६॥
साधलिया अमृतसंजीवनी ॥ तरी रोग न बाधी त्यालागोनी ॥ तेवीं तुमचें नाम तुकयाच्या वदनीं ॥ असतां चक्रपाणी भय काय ॥८७॥
ऐसें बोलतां जगन्माता ॥ तों आली अवचित तुकयची कांता ॥ पाषाण ठेविला मस्तकावरुता ॥ देखिलें येतां महाद्वारीं ॥८८॥
ती अंतरीं प्रवेशतां सत्वर ॥ रुक्मिणीनें आड केलें द्वार ॥ तुकयासी ठेविलें बाहेर ॥ काय निमित्त पैं तेव्हां ॥८९॥
कांता संतापोन अंतरीं ॥ पाषाण घालील तयावरी ॥ म्हणूनि येतांच भीतरी ॥ तुकयासी बाहेरी कोंडिलें ॥१९०॥
यापरी चुकवोनि आघात ॥ भक्तांसी रक्षी पंढरीनाथ ॥ जैसें बाळक अग्नीसी धरूं जात ॥ तंव माता रक्षित तयासी ॥९१॥
तुकयाचें चित्तीं ऐसा भाव ॥ जे कांतेसी पावला पंढरीराव ॥ मजवरी रुसला रुक्मिणीरावो ॥ म्हणऊनि द्वार आड केलें ॥९२॥
कीर्तनीं जागला घनसांवळा ॥ आतां विश्रांति घ्यावया निद्रित जाहला ॥ मी जाऊन तेथें करीन गलबला ॥ कोंडिलें मजला यासाठीं ॥९३॥
आतां परतोन जावें घरा ॥ सर्वथा न करावा उजगरा ॥ किंवा राग आला रुक्मिणीवरा ॥ आड केलें द्वारा यासाठीं ॥९४॥
कीं कांतेची भक्ति विशेष जाण ॥ तीस अपंगी जगज्जीवन ॥ मज बाहेर दिधलें टाकून ॥ म्हणोनि रुदन करीतसे ॥९५॥
असो ते समयीं तिचें प्रेम वर्णितां ॥ तरी ग्रंथीं विशेष वाढेल कथा ॥ पायांवरी पाषाण उचलोनि घालितां ॥ तंव रुक्मिणीमाता बोलिली ॥९६॥
काय अपराध केला जगज्जीवनें ॥ म्हणोनि फोडितेसी याचे चरण ॥ तें सांग हो मजकारण ॥ संकोच मनीं न धरितां ॥९७॥
येरी म्हणे ऐकवो माये ॥ एकदोन वेळां आठविले पाये ॥ तों मंदिरीं न दिसे एकही ठाये ॥ संसारसोये मोडिली ॥९८॥
घरीं नाहीं वस्त्र अन्न ॥ मुलें लेंकुरें करिती रुदन ॥ म्हणोनि संतापलें मन ॥ फोडितें चरण यासाठीं ॥९९॥
पायांनीं केला आमुचा घात ॥ म्हणोनि संतप्त जाहलें चित्त ॥ ऐसी ऐकोनि तियेची मात ॥ रुक्मिणी बोलत तियेसी ॥२००॥
जें संसारांत पडेल उणें ॥ मी निजांगें पुरवीन तुजकारणें ॥ मग साडी चोळी मूठभर होन ॥ तिजकारणें दीधले ॥१॥
हें देतां पावली समाधान ॥ मग पाषाण दीधला टाकून ॥ तेव्हां वस्त्र करोनि परिधान ॥ धरिले चरण रुक्मिणीचे ॥२॥
मूठभर होन घेऊनि हातीं ॥ बाहेर आली सत्वरगती ॥ पुढिले अध्यायीं रसउत्पत्ती ॥ तरी सादर श्रोतीं परिसावें ॥३॥
हृदयीं बैसोनि रुक्मिणीकांत ॥ सवेंचि वदवीतसे यथार्थ ॥ महीपति त्याचा मुद्रांकित ॥ शरणागत दासांचा ॥४॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ एकोनपंचाशत्तमाध्याय रसाळ हा ॥२०५॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीभक्तविजय एकोनपंचशत्तमाध्याय समाप्त ॥