संत निवृत्तीनाथांचे अभंग 21 ते 30
सोमवार, 13 जून 2022 (12:38 IST)
नाहीं यासि गोत नाही यासी कूळ । शेखीं आचारशीळ कोण म्हणे ॥ १ ॥
बाळरूपें हरि गोकुळीं लोणी चोरी । त्या यशोदा पाचारी थान द्यावया ॥ २ ॥
सोंवळा हरि वागवी शिदोरी । तो गोपालांच्या करी काला देतु ॥ ३ ॥
निवृत्ति संपूर्ण काला देतु जाण । ब्रह्मसनातन गोकुळींचें ॥ ४ ॥
गोपाळ संवगडे आले वाडेकोडें । असंख्य बागडे हरिरूपीं ॥ १ ॥
बिंबली पंढरी हरीरूपीं सार । अवघाचि श्रृंगार विठ्ठलराजु ॥ २ ॥
कालया कौशल्या नामदेव जाणे । तेथीलीहे खुणे निवृत्तिराजु ॥ ३ ॥
ज्ञानदेव सोपान जगमित्र नागा । नहरहि वेगा झेलिताती ॥ ४ ॥
वैकुंठ सांवळे मजि भक्त मेळे । काला एक्या काळें करिताती ॥ ५ ॥
निवृत्ति संपूर्णता घेउनि उद्गारु । सेविता उदार हरिराणा ॥ ६ ॥
आनंद सर्वांचा काला अरुवार । नामया साचार फुंदतसे ॥ १ ॥
राहिरखुमाई सत्यभामा माता । आलिया त्वरिता काल्यामाजी ॥ २ ॥
उचलिला नामा प्रेमाचें फुंदन । नुघडी तो नयन कांही केल्या ॥ ३ ॥
बुझावित राही रखुमादेवी बाही । पीतांबर साई करू हरी ॥ ४ ॥
ज्ञानासी कवळु सोपानासी वरु । खेचरा अरुवारु कवळु देत ॥ ५ ॥
निवृत्ति पूर्णिमा भक्तीचा महिमा । नामयासि सीमा भीमातीरीं ॥ ६ ॥
तंव आनंदला हरि परिपूर्ण लोटला । मुक्ताई लाधला प्रेमकवळु ॥ १ ॥
चांगयाचे मुखीं घालीत कवळू । आपण गोपाळु दयासिंधु ॥ २ ॥
दिधलें तें तूं घेई पूर्ण तें होई । सप्रेमाचे डोही संतजन ॥ ३ ॥
नामया विठया नारया लाधलें । गोणाई फावलें अखंडित ॥ ४ ॥
राही रखुमाई कुरवंडी करिती । जिवें वोंवाळिती नामयासी ॥ ५ ॥
निवृत्ति खेंचर ज्ञानदेव हरि । सोपान झडकरी बोलाविला ॥ ६ ॥
नघडुनिया दृष्टि नामा पाहे पोटी । आनंदाची सृष्टि तया जाली ॥ १ ॥
घेरे नाम्या कवळु आनंदाचा होसी । तुजमाजि निवासि हरि आहे ॥ २ ॥
नामा पसरी मुख आनंदला तृप्त । कवळु पूर्णभरित हरिराज ॥ ३ ॥
निवृत्तीने सेविला कवळु हा हरि । तूंचि चराचरीं दिससी आम्हां ॥ ४ ॥
नुघडितां दृष्टि न बोले तो वाचा । हरिरूपी वाचा तल्लीनता ॥ १ ॥
उठि उठिरे नाम्या चालरे सांगातें । माझे आवडते जीवलगे ॥ २ ॥
कुरवाळीला करें पुसतसे गूज । घेई ब्रह्मबीज सदोदित ॥ ३ ॥
ज्ञानासि लाधलें निवृत्ति फावलें । सोपाना घडलें दिनकाळ ॥ ४ ॥
तें हें रे सखया खेंचरासि पुसे । गुरुनामी विश्वासे ब्रह्मरूपें ॥ ५ ॥
निवृत्ति म्हणे आतां अनाथा श्रीहरि । तूंचि चराचरी हेचि खुण ॥ ६ ॥
सत्यभामा माये अन्नपूर्णा होये । वेळोवेळां सूये कवळू मुखीं ॥ १ ॥
राहीरखुमाई आदिमाता मोहे । नामा तो उपायें बुझाविती ॥ २ ॥
घेरे नाम्या ग्रास ब्रह्मीचा गळाला । आवडसि गोपाळां प्रीतीहूनी ॥ ३ ॥
कुर्वाळितो हरि नुघडी तो दृष्टी । सप्रेमाच्यां पोटी अधिक होसी ॥ ४ ॥
धरूनि हनुवटी पाहे कृपादृष्टी । आनंदाचे सृष्टि माजि नामा ॥ ५ ॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगा हरि । यांसी परोपरी कवळू देतु ॥ ६ ॥
काला तंव निकटी श्रीरंग जाले । भक्तांचे सोहळे पुरविले ॥ १ ॥
वेणुनादीं काला एकत्र पैं जाला । दहींभात झेलाझेलीतु देव ॥ २ ॥
तोचि कवळु घेत नामयासी देतु । ज्ञानासी भरीतु पूर्णतोषें ॥ ३ ॥
निवृत्ति सोपान कालवले कालीं । खेचराची धाली ताहान भूक ॥ ४ ॥
वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला । विठ्ठलनामकाला पंढरीसी ॥ १ ॥
हरिनामा विनट हरि उच्चारीत । सप्रेम डुल्लत भक्तजन ॥ २ ॥
चालिला सोपान ज्ञानदेव निधी । मुक्ताई गोविंदीं तल्लीनता ॥ ३ ॥
निवृत्ति खेचर परसा भागवत । आनंदे डुल्लत सनकादीक ॥ ४ ॥
पांडुरंग हरि माजी भक्तजन । कैसें वृंदावन शोभतुसे ॥ १ ॥
ब्रह्मादिक ठेले विमानें अंबरीं । काला तो गजरीं पंढरिये ॥ २ ॥
सनकादिक देव देहुढापाउलीं । गोपाळ वांकुली दाविताती ॥ ३ ॥
पुंडलिका नाचे देवमुनी सर्व । भीमातीरीं देव प्रगटले ॥ ४ ॥
ज्ञानदेव सोपान विसोबा खेंचर । नरहरि सोनार नाचताती ॥ ५ ॥
निवृत्ति मुक्ताई चांगदेव गाढा । हरिचा पवाडा झेलिताती ॥ ६ ॥