संकष्ट चतुर्थी व्रत कथा

रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (09:03 IST)
एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला चंद्र उपहासाने हासला. ते पाहून गणपतीला चंद्राचा फ़ार राग आला. गणपतीने चंद्राला शाप दिला की "आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!" 
 
शेवटी चंद्राने मोठे तप करुन श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतले. चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले. पण वर्षातून एक दिवश "भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी" तुझे तोंड कोणी पाहणार नही आणि जो कोणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. 
 
त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशीं माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हां गणपतीने सांगितले की, त्याने संकष्ट चतुर्थी व्रत" करावे, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्या मुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खॊटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने "संकष्ट चतुर्थी व्रत" केल्यामुळे गेला, अशी कथा आहे. 
 
आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे, हे एक साधे, सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे. श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगारकी संकष्ट चतुर्थी विशेष फ़लदयी व महत्वाची मानतात. प्रत्येकाने निदान वर्षांतून या दोन तरी अवश्य कराव्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती