Sankashti Chaturthi Mahatmya संकष्टी चतुर्थी महात्म्य
शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (20:00 IST)
श्रीगणेशायनमः ॥ जयजयाजी पंचवदना । दावी तव सुताच्या आनना ॥ पाहतांच पुरती मनकामना । भवबंधना तोडीतसे ॥१॥
अंगीं चर्चित सिंदुर । जो कां कॄपेचा सागर । भक्तजनांचे माहेर । जो कां साचार दीनबंधू ॥२॥
मूषकवाहनीं बैसून । हस्तीं त्रिशूळादि धारण । करीत विघ्नांचें छेदन । चरणीं वंदन तयाच्या ॥३॥
जो कां सद्गुरु चैतन्यघन । देउनी ज्ञानाचें दर्पण । प्रकाशविलें आत्मज्ञान । केलें समाधान जीवींचें ॥४॥
तयांचे कां न धरावें चरण । कैसी न यावी आठवण । जगन्नाथ भरला परिपूर्ण । हरिलें भान जगताचें ॥५॥
तया चरणीं माझें मस्तक । जो कां त्रैलोक्याचा नायक । जेथें तो एक मी एक । पूज्यपूजक भाव असे ॥६॥
जो यादवकुळीं जन्मोनी स्पष्ट । गोकुळवासी जनांचे कष्ट । हरोनी केलें संतुष्ट । संहारिले दुष्ट कंसादी ॥७॥
जेणें केलें कालियामर्दन । शुद्ध केलें यमुना जीवन । तया कृष्ण चरणी माझें नमन । लागलें ध्यान मनोभावें ॥८॥
तया कृष्णाचें करितां स्मरण । काळ जाय मनीं दडपोन । क्षमा दया शांति येवोन । पावती समाधान ते ठायीं ॥९॥
जैसा उदकावरी तरंग । पाहतां पाहतां पावे भंग । तैसा विन्घांचा प्रसंग । निर्घिन्घ सांग करितसे ॥१०॥
जैसी सागराची लहरी । येत जात एक सरी । तैसीं संकटें नानापरी । येतां निवारी गजवदन ॥११॥
तया गणपतीचें व्रत देख । आधीं तिथिनिर्णय ऐक । जो कां होय सुखदायक । चालती सकळिक जयारीतीं ॥१२॥
श्रावण कृष्णामाझारीं । तृतीयायुक्त चतुर्थी अवधारीं । चंद्रव्यापिनी असेल जरी । तरी व्रतातें करावें ॥१३॥
दोन्ही दिवस चंद्र व्यापिनी तिथी असोनी पूर्व दिनी करिती । मातृविद्धा तयास म्हणती । आहे शास्त्रमत ऐसेची ॥१४॥
दुसर्या दिनीं पंचमीयुक्त । चंद्र व्यापिनी चतुर्थी होता । तरी ते न करावी निश्र्चित । ऐसें शास्त्रांत सांगितलें ॥१५॥
तया दिनी काय करावें । पुढें सांगती स्कंद भावे । ते श्रोतेंजनीं ऐकावें । व्रत आचरावें तयापरी ॥१६॥
ऋषी अवघे मिळोन । प्रश्न करिती स्कंदालागुन । दरिद्र शोक कष्ट नाशन । वैरीजन छळिताती ॥१७॥
विद्या कांही नसे जयासीं । पुत्र न होय स्त्रियांसीं । ऐशा दुःखें पीडा जनांसीं । दूर कैशी होय सांगा ॥१८॥
ऐसा ऋषिंचा ऐकोनि प्रश्न । स्कंद पावला समाधान । जनकल्याण व्हावया लागून । तयासी वचन बोलतसे ॥१९॥
सुखप्राप्ति व्हावी सकळिकां । ऐसा उपाय सांगतो ऐका । संकष्टी व्रतें गणनायका । भजतां होय निर्विघ्न ॥२०॥
यथाविधि तया व्रतासी । आचारिता भक्ति भावेंसी । सकळ मनोरथ निश्र्चयेंसी । पूर्ण होतील तत्कालिक ॥२१॥
हें व्रत पूर्वीं श्रीकृष्ण सांगत । संकटापासोनी व्हावया मुक्त । गांजिले जे कां पंडुसुत । तया अद्भुत निवेदिलें ॥२२॥
पांडवांसी द्यूतीं जिंकुनी । कौरवें धाडिलें काननीं । तें दुःख न साहे म्हणोनी । सांगे कानीं धर्माच्या ॥२३॥
धर्म, भीमा, अर्जुन नकुळ । सहदेव, द्रौपदी मिळोनी सकळ । व्रत चालविलें अचळ । जेणें तळमळ दूर होय ॥२४॥
द्वादश वर्षें अरण्यवास । पुढें एक वर्ष अज्ञातवास । तेथील हरावें संकटांस । पुन्हा विपिनास न यावें ॥२५॥
हा हेतु धरोनी मनीं । करिते झाले व्रतालागुनी । श्रावण वद्य चतुर्थी दिनीं । आंरभ करोनी चालविलें ॥२६॥
तया व्रते करोनी जाण । त्रयोदशअब्द पूर्ण नसोनी । पुनरपी अरण्य सेवन । गजाननें जाण दूर केलें ॥२७॥
ऐसा व्रताचा महिमा जाण । कृष्णें सांगितला कोठून । तें करावें निवेदन । करविणें श्रवण आम्हा आधी ॥२८॥
मग ऋषींचा प्रश्र्न ऐकोन । स्कंद सांगती तयालागुन । पार्वतीस हेरंब आपण । काय कारण सांगतसे ॥२९॥
कृतयुगीं हिमनगबाळा । टाकोनि निघाला शिवभोळा । वियोगजन्य दुःख ज्वाळा । जाळील कळिकाळा वाटतसे ॥३०॥
पार्वती झाली उदास । सोडील सर्व विलास । दृढ धरिलें वैराग्यास । लिहिलें प्राक्तन काय हें ॥३१॥
पतीनें कां केला कोप । काय अन्य जन्मींचें पाप । उभें राहिलें आपेंआप । मज मायबाप कोण तारी ॥३२॥
काय मी चुकल्यें पतिव्रताधर्म । किंवा काही काढिलें वर्म । किंवा चुकल्यें स्वधर्म । अवघा अधर्म चालविला ॥३३॥
वचनाचा केला अनादर । ब्राह्मणा छळिलें निर्धार । घडला होता अनाचार । म्हणोन मजवर कोप केला ॥३४॥
काय भक्तांलागीं छळिलें । काय पूजेंते विध्वंसिलें । काय गंगेतें निंदिलें । नंदिसी ताडिलें दंडानें ॥३५॥
मुखानें नये रामनाम । अंगीं धडाडला काम । ईश्वरीं नाहीं ठेविलें प्रेम । म्हणोनी सुखधाम हरपलें ॥३६॥
नाहीं केली देव पूजा । उच्छेदिलें देवद्विजां । तेणें मनोभंग झाला माझा । म्हणोनी दुःख पावल्यें ॥३७॥
काय विधुची केली निंदा । पन्नगासीं भोगविली आपदा । चिताभस्म लेपन अंगी सदा । हंसल्ये कदा तयासीं ॥३८॥
स्मशानीं असे सदा वास । गुंडाळिलें व्याघ्रांबरास । जाळुनि टाकिलें मदनास । धरिलें वैराग्यास म्हणवुनी ॥३९॥
श्वशुरगृहासीं वास केला । तेव्हा मायबाप बोलिला । म्हणोनी चित्तीं क्रोध आला । जाऊनि लपला कपाटीं ॥४०॥
ऐसे वदोनि वारंवार । नेत्रीं वाहे दुःखनीर । अंतरामाजी न टिके धीर । न सुचे व्यवहार करावया ॥४१॥
आतां सेवावें अरण्य । किंवा करावें देहपतन । किंवा तपालागीं जाऊन । घालूनि आसन बसावें ॥४२॥
पवन आणि चंदन । झोंबे अंगीं अग्निसमान । विधु तापवी देहालागुन । चंड किरण माध्यान्हीचा ॥४३॥
वाटे मजला वैरी वसंत । सुमन सुवास उग्र भासत । कोकिळास्वर कर्णी झोंबत । कर्कश काकवत दुःख देती ॥४४॥
अग्नीमाजी होमावा काय । कोठें पाहूं पतिराय । काय घडला न कळे अन्याय । काय उपाय करावा ॥४५॥
धरणीवरी अंग टाकी । कोण युक्ती सांगेल सखी । कैशी धुंडूं चतुर्दशलोकीं । हंसती न कीं मजलागीं ॥४६॥
ऐसी वियोगदु:खें करून । पोळली अंतःकरणी जाण । वैराग्यसंपन्न तपालागून । गेली कानन सेवावया ॥४७॥
वल्कलें करूनि धारण । माथां जटा गुंडाळून । कुंकुम मळवट भरून । घालून आसनी बैसली ॥४८॥
कांहीं दिवस वायु भक्षण । कांहीं दिवस फळें सेवन । कांहीं दिवस पर्णे जाण । सेवन दुर्वांचें ॥४९॥
कांहीं दिवस जलपान । कांहीं दिवस कंदमूळ भक्षण । कांहीं दिवस निराहार राहून कांहीं सेवन करीना ॥५०॥
कांहीं काळ ऊर्ध्व बाहू करून । कांहीं दिवस पंचाग्निसाधन । कांहीं दिवस उभे राहून । नाहीं शयन बहुकाल ॥५१॥
ब्रह्मांडीं प्राण नेऊन । केलें हटयोगाचें साधन । आकर्षण करूनि मन । इंद्रिय दमन बहुकाळ ॥५२॥
राजयोग साधनीं । निमग्न राहे निशिदीनीं । रामनाममंत्रें करोनी । काल वनीं काढिला ॥५३॥
अष्टांगयोगाच्या साधनीं । देह झिजविला तपें करूनी । परी प्राणेश्चरालागूनी । दया मनीं नयेचि ॥५४॥
जो भक्तीचा भुकेला । भावें करोनी बांधला गेला । तो हिमनगजेलागीं दुरावला । म्हणोनी झाला खेद चित्तीं ॥५५॥
आतां काय करावा उपाय । कैसा भेटेल पतिराय । चिंता करोनि झिजली काय । झाली तन्मय वृति ती ॥५६॥
तपें करूनि देह तापला । तीन्ही लोकीं कंप सुटला । इंद्र मनामाजीं दचकला । काय वर्तला अनर्थ ॥५७॥
ऐसें तीव्र तप स्त्रीनें केलें । नाहीं कोठें आयकिलें । शंकरें दर्शन नाहीं दिलें । तरी खचिलें घाटे ब्रह्मांड ॥५८॥
तों पाहिला नारदमुनी । पुसती झाली तयालागुनी । पूजन केले स्वस्थमनीं । लागली चरणी तयाच्या॥५९॥
इतुकियामाजी देवऋषी । पुसता झाला पार्वतीसीं । तुझी दशा कां गे ऐसी । आलीस वनीं काय काजें ॥६०॥
शरीर झालें जर्जर सेविलें कानन कां कठोर । पंचवदनाचा पडिला विचार । सांगे उत्तर लवलाहीं ॥६१॥
मग बोले शैलबाला । मी कांहीं अपराध न केला । परी पतीचा वियोग झाला । उपाय मजला सांगे आतां ॥६२॥
दरिद्यासी लाभतां चिंतामणी । मग हर्ष न माय गगनीं । तैसें झालें माझे मनीं । तुज नयनी देखतांची ॥६३॥
बहुकाल सेविलें कानन । तप केलें अनुदिन । परी मजला स्वामी अजून । भेटूनि नयन निववीना ॥६४॥
आतां यत्न काय करूं । मज सांगा जी निर्धारूं ॥ कोण्या कर्में परात्परू । होईल साचारू प्राप्त मज ॥६५॥
ऐसें बोलतां जगज्जननी । सुचला विचार एक मनीं । म्हणे गणपतीच्या व्रते करूनी । पावेल सदनी शंकर ॥६६॥
ऐसे बोलतां देघर्षी । जगन्माता म्हणे सांग मजसीं । तो बोले मुनीं तियेसीं । गजाननासी पूजावें ॥६७॥
मग करुनी गणपती स्तवन । आणिलें मनामाजीं ध्यान । चतुर्भुज रक्तवर्ण । केलें चिंतन तयाचें ॥६८॥
विशाल दोंदाची शोभा । स्मरतां संकटासरसा उभा । मांड्या कर्दळीचा गाभा । नयन शोभा पद्मापरी ॥६९॥
माथां शेंदुर शोभत । रत्नजडित मुगुट झळकत । पायीं घागरिया घाजत । येत नाचत झडकरी ॥७०॥
मग देउनीं आलिंगन । संतोषविलें तयाचें मन । कां माते सेविले कानन । संकट कवण पडियेलें ॥७१॥
म्हणे मातें काय काजा । कवणें गांजिला देह तुझा । कां केलासी धावा माझा । सांगे हितगुजा मजपाशीं ॥७२॥
ऐसें ऐकोनी वचनातें । सांगे पार्वती तयातें । पतीनें त्यागिलें मातें । सेविलें विपिनातें तयालागीं ॥७३॥
बहुत केलें तपाचरण । न सरे माझें पाप अजुन । वियोग दुःखे सरुन । सुख संपादन न होय ॥७४॥
भेटी न होय माझी । म्हणोनी आस केली तुझी । आतां प्राणपती होय राजी । ऐसें आजी व्रत सांगे ॥७५॥
"माझें व्रत संपादन । करितां संकट जाय निरसुन । पूर्वी सांगितलें तिथिप्रमाण । मास पक्षजाण सत्य तोचि ॥७६॥
तया दिनी व्रतारंभ । करितां भेटेल तुज सांब । पूजाविधान हेरंब । करीं अंबे संतोषें ॥७७॥
प्रात:काळी दंतधावन । मग करुनि माझे स्मरण । संकल्पें मातें प्रार्थून । व्रतस्थ जाण असावें ॥७८॥
आजी चंद्रोदयपर्यंत । मी राहोनि उपोषित । पूजन करीन एकचित्त । भोजनी रत होईन पुढें ॥७९॥
ऐसी प्रार्थना करुन । आंगासीं काळे तीळ लावून । स्नान नित्यनेमें सारून । उपोषित राहे जाण मग ॥८०॥
मोदक करावे एकविंशती । पांच अर्पावे देवाप्रती । पांचांचे वायन ब्राह्मणाहातीं । सेवीं निश्र्चिती शेष आपण ॥८१॥
धातु, पाषाण, मृत्तिका जाण । तयाची प्रतिमा करून । गणपती नामें तयाचें स्थापन । करील पावन सकळातें ॥८२॥
मग करावें आवाहन । मनी आणोनि करावें ध्यान । षोडशोपचारें पूजन । सांग संपादन करावें॥८३॥
अथर्वशीर्षाचे पाठ । एकविंशति करावे नीट । अक्षर वटिका म्हणोनि स्पष्ट । करावा संतुष्ट गजानन॥८४॥
वस्त्र उपवस्त्रादि सकळ । चंदन, सिंदूर परिमळ । रुई-मांदार पुष्पें सकळ । दुर्वा कोमळ अर्पाव्या ॥८५॥
मज दुर्वाची अतिप्रीती । सहस्त्रनामें अर्पावे एकचित्तीं । जयाची असेल शुद्धमती ॥ तोचि भक्ती करी ऐशी ॥८६॥
धूप-दीप-नैवेद्य जाण । मोदकादि करूनि पक्कान्न । समर्पूनि, उत्तरापोशन । करूनि, अर्पावा तांबूल ॥८७॥
मग ठेवी दक्षिणा फळ । प्रदक्षिणा मंत्रपुष्प सकळ । चरणीं ठेवीं शिरकमळ । भावें केवळ प्रार्थावे ॥८८॥
चंद्रोदय झालियावरी । मग विधूची पूजा करी । अर्ध्य देउनी त्रिवारी । प्रार्थना करी विधूची ॥८९॥
मग पंचमोदक वायन । द्यावें ब्राह्मणालागून । दक्षिणा तांबूल समर्पून । करावें वंदन द्विजातें ॥९०॥
करूनि ब्राह्मण संतर्पण । पात्री बैसावें आपण " । ऐसें सांगोनि विधान । गेला गजानन स्वस्थाना ॥९१॥
विनायकें सांगितलें मातेसी । कृष्णें विदित केलें पांडवांसी । स्कंदें सांगितलें ऋषीश्र्वरांसी । पावती कल्याणासी सकळिक ॥९२॥
पार्वतीनें केलें व्रतासीं । मनी धरोनी निश्र्चयासी । करितां पावली पतीसीं । स्कंदे ऋषीसीं सांगतसें ॥९३॥
पाहतां नयनीं पंचवदन । चरणी लागली जाऊन । शिवें गिरिजा उचलोन । वामांकीं बैसवून तोषविली ॥९४॥
ऐसें व्रताचें महिमान । जाणती पंडुनंदन । स्वयें हिमनगजा आपण । पावली समाधान पतिसंगें ॥९५॥
हें व्रत जे कोणी करिती । दरिद्र, शोक तयांचें जातीं । केलें कष्ट फळ देती । वैरी सोडिती वैरभाव ॥९६॥
विद्या प्राप्त होईल जाणा । पूर्ण होईल मनकामना । निपुत्रिक पावेल संताना । पीडितजना सुख होय ॥९७॥
धन धान्यवृद्धी अमूप । हरपोनी जाईल पापताप । करितां नाममंत्राचा जप । आपेंआप मोक्ष लाघेल ॥९८॥
जयाचा शास्त्रावरी विश्वास । तोचि होईल निर्दोष । शांती दयेनें भरेल मानस । क्षमा हृदयास उपजेल ॥९९॥
असो आतां हा पाल्हाळ । अंगी असावें भक्तीबळ । कृपा करील गिरिजाबाळ । श्रोतीं सकळ ऐकावें ॥१००॥
॥ श्रीसकलविघ्नहरणगजाननार्पणमस्तु ॥