अत्री ऋषी आणि अनुसूया एकदा महादेव आणि पार्वती यांच्याकडे जेवणाचं आमंत्रणं घेऊन जातात. सर्वांना जेवायला बोलावतात. कार्तिक घरी नसतो पण गणपती असतो. छोट्या गणपतीला घेऊन यायचा ते आग्रह करतात. पण पार्वतीला गणेशाची क्षुधा माहीत असते म्हणून ती त्यांना सांगते की ती व महादेव येतील आणि कार्तिक परत आला की पुन्हा एकदा सगळे येतील. पण अत्री पुन्हा त्यांना गणपतीला घेऊन यायचा आग्रह करतात आणि पार्वतीचा नाईलाज होतो.
महादेव आणि पार्वती च जेवण संपतं पण गणेशाचं ताव मारणं सुरू राहतं. पार्वती त्याला खुणावत असते आणि बस म्ह्णून सांगायचा प्रयत्न करते पण गणपती च सगळं लक्ष जेवणात. अनुसूयाला पण आता काळजी वाटायला लागते कारण सर्व प्रकार संपत आलेले असतात. तरीही गणपतीची काही थांबायची चिन्हे दिसत नाहीत. आणि एकदाचे सगळं जेवण संपतं पण अजून गणपतीची भूक काही भागलेली दिसत नाही. मग अनुसूया स्वयंपाक घरात जाते आणि घरी जे असतं त्यातून एक सारण तयार करते आणि त्याला पिठाच्या आत बंद करून घेऊन येते. आणि गणपतीला सांगते की, "मी माझ्याकडे जे सर्व होतं (पूर्ण) ते श्रद्धापूर्वक यात घालून आणलं आहे त्याचा स्वीकार कर".